Login

उपरती - भाग १

प्रेमात आंधळेपणाने घेतलेला निर्णय
उपरती - भाग १

"बाबा तुम्ही मीरासाठी एवढा पैसा का खर्च करता? दोन-तीन वर्षांनी ती लग्न होऊन सासरी जाणारच आहे ना! तेव्हाही तिच्या लग्नासाठी पैसा खर्च करावा लागेल."

"अरे सुहास मीरा तुझी बहीणच आहे ना! मग असं कसं म्हणतोस तू! तुझ्यासाठी आम्ही काही कमी पैसा खर्च केला का? तुला इंजीनियरिंगला ॲडमिशन मिळवण्यासाठी डोनेशन दिलं ते तू विसरलास!"

"बाबा माझ्यासाठी पैसा खर्च करणं हे खूप वेगळं आहे. मी मुलगा आहे आणि उद्या मी खोऱ्याने पैसे कमावेन ते आपल्या घरासाठीच वापरता येतील ना. उद्या तुमच्या म्हातारपणी मीरा तुम्हाला बघायला येणार नाही मीच तुम्हाला बघणार आहे ना!"

"सुहास अरे काल-परवापर्यंत मीरासाठी तू कासावीस व्हायचास. मीरासाठी आपण हे घेऊया, मीरासाठी आपण ते घेऊया असं बोलायचास. तिच्यासाठी वेगवेगळे ड्रेसेस, भेटवस्तू आणायचास. तुम्हा बहीण-भावांचं प्रेम अगदी उतू जायचं. आज तिच्याबद्दल तू असं बोलतोस. इतका कसा काय बदललास!"

"बाबा आधीची गोष्ट वेगळी होती आणि आताची गोष्ट खूपच वेगळी आहे."

"जेव्हा मीराला कळेल तू तिच्याबद्दल असं बोलतोस तेव्हा तिला काय वाटेल याचा जरा तरी विचार केला आहेस का?"

मीराबद्दलच्या सुहासच्या भावना एकाएकी बदलल्या नव्हत्या. त्याच्या आयुष्यात आता सुजाता आली होती. तिच्यावर त्याचं मनापासून प्रेम होतं. हे सर्व तिनेच सुहासच्या डोक्यात भरवलं होतं. याआधी मकरंद आणि मनिषा यांचा संसार सुहास आणि मीराच्या अस्तित्वाने परिपूर्ण झाला होता. ते एक सुंदर चौकोनी कुटुंब होतं. सुहास आणि मीरामधील प्रेम अद्वितीय असंच होतं. घरात शिरल्यावर सुहासला मीरा दिसली नाही किंवा मीराला सुहास दिसला नाही तर दोघेही एकमेकांबद्दल विचारायचे. लहानपणी दोघांपैकी एकाला कोणी खाऊ दिला तर ते एकमेकांसाठी राखून ठेवायचे. आज त्याच मीराबद्दल सुहास असं बोलतोय ह्याचं मकरंदला खूपच आश्चर्य वाटत होतं.

दोघांना वाढवताना मकरंद काय किंवा मनिषा काय कधीही मुलगा मुलगी हा भेदभाव केला नाही. मीराने कॉम्प्युटर सायन्स केल्यानंतर तिला परदेशात जाऊन एम एस करायचं होतं म्हणून बाबांनी तिच्यासाठी पैसे उपलब्ध करून दिले होते. त्या वेळी सुहासने त्यांना दुजोरा दिला होता. मीरा परदेशात गेली त्यादिवशी तर सुहास तिला मिठी मारून रडला होता. ती गेल्यानंतर मीराची अनुपस्थिती त्याला कायम जाणवत होती. कितीतरी वेळा तो व्हिडिओ कॉल करून तिच्याशी बोलायचा. ती पण तिथे असली तरी कायम घरच्यांशी संपर्कात राहायची.

एक दिवस सुहासने मीराला व्हिडिओ कॉल वर स्वतःच सांगितले की तुझा कोर्स संपला की तू लगेच आपल्या घरी यायचं आहेस. मीराने त्याला स्पष्ट सांगितलं,

"मला आता इथे जॉब मिळतोय त्यामुळे मी इथेच राहणार आहे. ऑफिस दूर असल्यामुळे मी एक सेकंड हॅन्ड कार घेणार आहे. सध्या बाबा मला त्यासाठी पैसे देतील मग मी त्यांना परत करेन."

"बाबा हे मला काहीच बोलले नाहीत. हे बघ आता बाबा तुला काहीच देणार नाहीत कारण आतापर्यंत तुला भरपूर पैसे देऊन झालेत."

दोघांचे तिथेच आपापसात खूप वादविवाद झाले. त्यानंतर सुहासने तिच्याशी चक्क अबोला धरला. मकरंद आणि मनीषाला हे अनपेक्षित होतं. त्यांना खूप मोठा धक्का बसला. त्याहून मोठा धक्का त्याने आई-बाबांना दिला तो म्हणजे एक दिवस सकाळीच तो दोघांना म्हणाला,

"बाबा आपल्या बिल्डिंगमधील सुजाता वर माझं मनापासून प्रेम आहे आणि आम्ही दोघं आता लवकरच लग्न करणार आहोत." आई बाबा दोघेही एकदम बोलले,

"काsssय! अरे आम्ही तुला आता एवढे परके झालो का की तू तुझ्या लग्नाचं पण आम्हाला काही सांगितलं नाहीस. अरे सुजाता आणि तिच्या कुटुंबीयांना आपण सगळेच इतकी वर्ष ओळखतो आहोत आणि ते कसे आहेत ते आपल्याला सर्वांना चांगलंच ठाऊक आहे. ती सुजाता तुला विकून खाईल. आताच तिला सांगून टाक तुला तिच्याशी लग्न करायचं नाही."

(आई बाबांच्या सल्ल्याप्रमाणे सुहास सुजाताला नकार देईल की आंधळे प्रेम त्याला पुढे जायला सांगेल पाहूया पुढील भागात)

क्रमशः

©️®️सीमा गंगाधरे
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →