"काय म्हणून माझ्या पोराने हिला बायको करून आणली काय माहिती..... एवढ्या सुंदर सुंदर पोरी होत्या.. पण नाही, याला हीच पसंत पडली.."
"अहो पण मीराताई, रूपा पण चांगली आहेच की.. बघते मी तिला.. चपळ आहे अगदी कामात ...तुमची कामे अगदी पटपट उरकून टाकते.."
"कामाचे काय घेऊन बसलात उषाताई... कामाला चार बायका लावता येतात ...त्या वाचून कोणाचे अडले आहे आजकाल..? पण कुठे हिला घेऊन जायचे म्हणजे लाज वाटते अगदी ... माझ्या पोराने हिच्यात काय पाहिले देव जाणे..."
" अहो लाज वाटण्यासारखे काय त्याच्यात...?? सूनच आहे तुमची... आणि इतकी ही काही वाईट नाही हो.. चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीत आहे म्हणे ... पगारही चांगला आहे, सावळी आहेत इतकेच..."
"सावळी???? तुम्ही सावळी म्हणता या रंगाला ???अहो एक वेळेस सावळी परवडली असती... पण ही तर टक्क काळी आहे..."
"अगं हळू बोल... आतच असेल ना ती??? ऐकू येईल ना तिला..."
"आले तर येऊ द्या ऐकू.... आम्हाला नाही नाही ते ऐकून घ्यावे लागले आहे... येता जाता पाहुणे मंडळी, नातेवाईक, आजूबाजूची मला विचारत असतात,' तुमचा प्रतीक इतका देखणा आहे . दिसायला त्याच्यापेक्षा उजवी बायको बघायची सोडून हे काय ध्यान गळ्यात मारले आहे त्याच्या...' मला तर बाई कानकोंडे झाल्यासारखे होते..."
"अहो मग लग्न करायचे आधीच प्रतीक ची समजूत काढायची ना... आता लग्न झाल्यावर कशाला गळा काढताय..??"
"त्या गाढवाला हीच अप्सरा आवडली, तर त्या पुढे काय करणार ?? जाऊ दे... कसेतरी मेले दिवस काढायचे... उद्या पोरं बाळ झाली तर हिच्या रंगावर जायला नको म्हणजे झालं... आईबापाने नाव पण काय शोधून ठेवलेले आहे रूपा ... अगदीच रूपवान मुलगी आहे!!!"
असे म्हणत थट्टा मस्करी करत मीराताई आणि उषाताई हसायला लागल्या...
कितीही खबरदारी घ्यायची म्हटली तरी ऑफिसला जाणाऱ्या रूपाच्या कानावर त्यांच्या गुजगोष्टी पडल्या... बिचारीच्या डोळ्यात पाणी आले असले तरी, नवीन लग्न आहे ... त्यात सासू आणि सासूच्या मैत्रिणींच्या गप्पांच्या मध्ये कशाला पडा... आणि आहेच आपला रंग असा, तर त्याला कोण काय करणार... असे म्हणून रूपा आपल्या वाटेने निघून गेली...
रूपाच्या माहेरची परिस्थिती तशी साधारणच... तिचे वडील बँकेत क्लार्क होते... त्यांना दोन मुलीच... एक रूपा आणि दुसरी विद्या... दोघींनीही त्यांचे रूप बाबा कडूनच उचलले होते...
दिसायला अगदी सर्वसामान्य असल्या तरी अभ्यासामध्ये अतिशय तल्लख होत्या... त्यामुळेच त्यांच्या वडिलांनी ठरवले की दोन्ही मुलींना उच्च पदवीधर करायचे आणि स्वतःच्या पायावर उभे करायचे आणि मगच लग्नाचे बघायचे... त्यासाठी स्वतःला किती कष्ट करायला लागले ,कर्ज उचलायला लागले तरी चालेल...
स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर रूपाने मल्टिनॅशनल कंपनीमध्ये जॉब मिळवला आणि अगदी गडगंज पगारावर नोकरीला लागली... तिचा पगार हाच एक तिची जमेची बाजू होती.. कारण रंगाने अगदीच डावी असल्यामुळे तिच्या आईला तिच्या लग्नाची सतत काळजी वाटून राहायची...
तिला नोकरी लागल्यानंतर स्वतःच्या वडिलांच्या डोक्यावर असलेले कर्ज फेडायचे होते आणि तिच्या नोकरीच्या पैशांमध्ये ते सहज होऊनही गेले असते ... पण तिचे वडील म्हणाले,
" बाळ... मला फक्त तुम्हाला दोघींना स्वतःच्या पायावर उभे करायचे होते आणि त्यासाठी कष्ट करायची माझी तयारी होती... या कर्जाची काळजी तुम्ही करू नका.. मला तुमच्या दोघांच्या डोक्यावर अक्षता पडलेल्या बघायचे आहेत..
मला तुमच्या भविष्याची आता काहीही चिंता नाही... कर्ज कसे फेडायचे, काय करायचे ते माझे मी बघतो.. पण आता लग्नासारख्या गोष्टीला विलंब नको.. स्थळे बघायला सुरुवात करावी असे मी म्हणतो.."
मला तुमच्या भविष्याची आता काहीही चिंता नाही... कर्ज कसे फेडायचे, काय करायचे ते माझे मी बघतो.. पण आता लग्नासारख्या गोष्टीला विलंब नको.. स्थळे बघायला सुरुवात करावी असे मी म्हणतो.."
"पण बाबा इतकी काय घाई आहे??? मला अगदी स्वतःच्या नावे थोडी सेविंग तरी करू द्या.. तुम्हाला दोघांना मला फिरवून आणायचे आहे.. माझी पण बरीच स्वप्न आहेत.."
"रूपा, तुझ्यासाठी मुलं बघायला सुरुवात केल्यानंतर पहिल्याच स्थळाकडून होकार यावा इतकी काही तू देखणी नाहीस हे लक्षात ठेव... त्यामुळे सहज तीन-चार वर्ष त्यामध्ये निघून जाणारच आहेत... आणि फिरायचे, इकडे तिकडे जायचे, कर्ज फेडायचे ते कसे, आम्ही बघून घेऊ.. पण आता तू तुझे स्वप्न पूर्ण करत बसलीस तर अजून एक दहा वर्षे तरी इथेच राहावे लागेल तुला ... आणि नंतर कशीतरी तडजोड करून बीजवराशी लग्न करावे लागेल.." तिची आई मध्येच बोलली.
ते ऐकून रूपाला आणि तिच्या वडिलांना वाईट वाटले.. तिचे वडील म्हणाले,
"या जगात अजूनही सौंदर्यापेक्षा स्वभावाला, कर्तुत्वाला महत्त्व देणारे लोक आहेत.. त्यामुळे माझ्या लेकीच्या मनाला लागेल असे काही बडबडत जाऊ नको.. मी तिच्यासाठी अगदी योग्य मुलगा शोधून शोधून काढेन.. काळजी करायची गरज नाही.."
वडिलांच्या अशा बोलण्यामुळे रूपाला दिलासा मिळायचा..
तिचा बायोडेटा काढल्यानंतर एक दोन स्थळांकडून भेटीसाठी चौकशी झाली.. पण नंतर मुलीचे फोटो बघून लोक परस्पर नकार कळवायचे..
काहीच दिवसानंतर एका ओळखीतल्या माणसाकडून प्रतीकचे स्थळ त्यांना आले,
बायोडेटामध्ये प्रतीक चा फोटो बघून रूपाची खात्री पटली होती की हा मुलगा आपल्याला नकारच देणार.. पण तरीही तिच्या वडिलांच्या सांगण्यावरून आणि आईच्या हट्ट साठी ती स्थळाला भेटायला तयार झाली..
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
