लघुकथा लेखन स्पर्धा एप्रिल 2026
विषय: अनोखी भेट
विषय: अनोखी भेट
अनोळखी ओळख
©®haridasi
©®haridasi
नमः पार्वती पतये हर हर महादेव
वाराणसीचा दशाश्वमेध घाट, संध्याकाळची वेळ होती गंगेच्या पात्रात हजारो दिवे लुकलुकत होते अगदी आकाशात चांदण्या चमकाव्या तसच,गंगा आरती सुरु होती, शंखनाद, डमरूचा आवाज ते पवित्र मंत्र वातावरण पूर्ण भक्तिमय होत.
हे सगळं बघून ती भारावून गेली होती आजवर फक्त इंटरनेटवर पाहिलं होतं पण आज प्रत्यक्ष अनुभव घेत होती गर्दीतून वाट काढत पुढे जाताना खांद्यावर अडकवलेली तिची बॅग कुठे गायब झाली की कोणी गायब केली हे तिलाही समजलं नाही.
आरतीची सांगता झाली तसं ती भानावर आली आणि त्या क्षणाचा आनंद घेण्यासाठी म्हणून बॅग मध्ये टाकलेला फोन बाहेर काढण्यासाठी हात लावला तर बॅगच गायब ती घाबरून इकडे तिकडे कुठे पडली असेल तर म्हणून शोधायला लागली पण बॅग काही सापडली नाही बाकी लोक आपापल्या जगात मग्न होते कोणी फोटो काढत होत तर काही निघुन जात होते.
ती आता पूर्णपणे घाबरली होती नवीन शहर त्यात एकटीच आली होती त्यात हे अस झालं होतं काय करावं हे तिला सुचतच नव्हत चालता चालता तिचा पाय अडखळला आता आपण पडणार या भितीने तिने डोळे मिटून घेतले इतक्यात कोणीतरी तिचा हात पकडला.
"हेय सांभाळून पडली असतीस की"एका तरुणचा आवाज आला ते शब्द ऐकून तिला काय वाटलं असेल हे तीही सांगू शकली नसती एका परक्या ठिकाणी, परक्या भाषिक लोकांच्या गर्दीत मराठीतल ते वाक्य कानी पडणं म्हणजे जणू वाळवंटात पाणी मिळावं असच होत.
"मराठी?" तिने विचारलं
"अं,म्हणू शकता तसं" त्याने उत्तर दिलं पण ती अजूनही गोंधळलेली होती.
"माझी आई मराठी आहे त्यामुळे येते " त्याने सांगितलं
"अच्छा नाइस,थॅन्क्स फॉर हेल्प " ती
"एनी प्रॉब्लेम, काळजीत वाटत आहात तुम्ही सामान वगैरे हरवलं का?" त्याने विचारलं
"हो ते बॅग हरवली फोन, पैसे सगळ त्यातच होत" तिने सांगितलं
"ओह,आता ती परत भेटणं कठीणच आहे" तो काळजीने म्हणाला
"आता काय करु मी एकटीच आले होते मी दुसर कोणीही नाहीये आणि मला इथलं काहीच माहीत नाही "तिचे डोळे पाण्याने भरले होते.
"तुम्ही काशीमध्ये आहात, इथे कोणीच एकटं नसतं असो तुमची काही हरकत नसेल तर मी काही मदत करू का" त्याने विचारलं
"ठीक आहे, पण नाव, पत्ता काहीच विचारायचं नाही "तिने ठामपणे सांगितल
"ठीक आहे नाही विचारत पण हाक कोणत्या नावाने मारायची "तो म्हणाला
"ओवी" तिने सांगितलं
"छान नाव आहे, मी शिव " तो म्हणाला तसं ती क्षणभर चकित झाली विश्वनाथाच शहर,जवळच पवित्र गंगेचा प्रवाह आणि त्या शहराच्या आराध्य दैवताच नाव असलेला तो अनोळखी असूनही विश्वास ठेवावा वाटणारा,हा केवळ योगायोग आहे की नियतीचा काही इशारा या विचारांत ती हरवली.
"जास्त विचार करू नका खुप उशीर झालाय आधीच" तो बोलला तसं ती भानावर आली.
"आता काय करायचं?"
"आधी तुमच्या आईबाबांना कळवा" शिव
अरे हा तुमचा फोन मिळेल" ओवी
त्याने फोन दिला तसं तिने तिच्या आईला कॉल करून समजावलं त्यासाठी बरच बोलावं लागलं यात तिने हे सांगितलं नाही की सोबत तो आहे उगाच काळजी केली असती म्हणून नंतर एका फ्रेंडला कॉल करून काही पैसे मागवून घेतले त्याच्या नंबर वर जेणेकरून पुढचा खर्च भागेल.
तिचं बोलुन झालं तसं तिला भूक लागली असेल म्हणून तो तिला खायला घेऊन आला.
"तुमची आई मराठी आहे असं सांगितलं होत तुम्ही तर तुम्ही कधी आला होतात का आमच्या महाराष्ट्रात " तिने खाता खाता विचारलं.
"हो बऱ्याच वेळा कोल्हापूरची आहे ती त्यामुळे मी पण आलोय बऱ्याच वेळा तिच्यासोबत " त्याने सांगितलं
"एक प्रश्न विचारू? तुम्ही एवढी मदत का करत आहात?" तिच्या मनात बऱ्याच वेळापासून घोळत असलेला विचार तिने बोलुन दाखवलाच.
"शिव आहे ना मी, भक्तांची मदत करणं माझं कर्तव्यच आहे."तो मुद्दाम ती हसावी म्हणून बोलला आणि ती हसली पण.
"फक्त नाव ठेवलं म्हणून देव झालात का तुम्ही?" ओवी हसून म्हणाली.
"जोक्स अपार्ट पण आमच्या शहरात आलात तुम्ही आणि इथून जाताना येणाऱ्या लोकांनी चांगल्या आठवणीच घेऊन गेलं पाहिजे असं मला वाटतं हे फक्त एक शहर नाहीये ती एक भावना आहे " तो म्हणाला.
तिचं खाऊन झालं तसं ते त्याने स्वतःची ओळख वापरून तिची राहण्याची व्यवस्था केली होती आणि ती आहे तोपर्यंत तिला शहर दाखवणार असही ठरलं होतं.
त्या रात्री तिला जरा उशीराच झोप लागली तरी फिरण्याचा उत्साह इतका होता की ती वेळेवर उठून तयार झाली तोही अगदी वेळेवर पोचला त्या दिवशी आणि पुढचे काही दिवस त्याने तिला सगळ्या ठिकाणी नेलं अगदी तिथेही जिथे सहसा पर्यटक जात नाहीत.
आज तिच्या परत जाण्याचा आधीचा दिवस होता ते मनिकर्निका घाटावर आले होते हा घाट सर्वांपेक्षा वेगळा होता एकीकडे गंगा तर एकीकडे वाहणाऱ्या चिता जीवन आणि मृत्यचा संगम.
हे सगळं पाहून तिला जाणवलं अहंकार कितीही असला तरी अंतिम सत्य तर हेच होत.
"भीती वाटतेय का?" त्याने विचारलं.
"नाही एक गोष्ट मनात आली जर शेवटी इथेच यायचय तर सगळ मिळवण्याचा अट्टाहास का करतो आपण"ती बोलली.
"अट्टाहास तर आपल्या जिवंत असण्याचा पुरावा आहे ओवी,तोच नसेल तर काय अर्थ आहे जगण्याला पण अट्टाहास जेव्हा अहंकार किंवा लोभात बदलतो तेव्हा तो नक्कीच चुकीचा ठरतो"त्याने शांतपणे उत्तर दिलं.
"हे शहर रिकाम करायला शिकवत हे ऐकलं होत आज अनुभवलं सुद्धा " ती मनापासून म्हणाली.
"आठवण येईल ना आमच्या बनारसची " त्याने विचारलं त्याच्या मनात एक हुरहूर दाटून येत होती.
"नक्कीच हा अनुभव मी कधीच विसरणार नाही "तिच्या मनाची अवस्था काही वेगळी नव्हती.
"अजुन कशाची आठवण येणार नाही का " शेवटी तो बोललाच.
"हो येईल ना इथली गंगा आरती,तो घाट,या गल्ल्या आणि इथलं फूड सगळ मिस करेल मी"तिला माहित होत तो काय विचारत आहे तरी तिने उत्तर दिलं नाही.
"बस इतकंच?" त्याने पुन्हा विचारलं.
"अजून काय राहील बरं? माझा हरवलेला फोन आणि ती बॅग" ती खट्याळ हसून म्हणाली.
"आणि?" त्याने पुन्हा प्रश्न केला.
"आणि एक असा माणूस, ज्याच्यामुळे मी या परक्या शहरात सुखरूप आहे" शेवटी तिने कबूल केलं.
"थँक्स" तो समाधानाने हसला.
"खरंच, जेव्हा जेव्हा कोणी काशीचं नाव घेईल, तेव्हा तेव्हा माझ्या ओठांवर शिव हे नाव आपोआप येईल.
"पक्का ना? विसरणार तर नाहीस ना?"
"कधीच नाही " ती म्हणाली आता ते बोलता बोलता परत निघाले होते तिला थंडी वाजत होती म्हणून त्याने त्याच जॅकेट काढून दिलं.
या रात्री सुद्धा तिला झोप लागत होती काय विचार करून आली होती ती इथे आणि झालं काय होत किती अनपेक्षित होतं हे सगळं पण कदाचित अनपेक्षित गोष्टीचं जास्त सुंदर असतात ज्या अपेक्षित असतात त्यात कसली आलेय सुंदरता.
"बहुतेक लोक बरोबर बोलतात काशीत काही हरवत तर काही मिळतं."ती स्वतःशीच म्हणाली.
तिने थोडीफार सामान होत ते आवरलं म्हणजेच तिथे केलेली खरेदी तिने थोडा विचार केला आणि स्वतचं पूर्ण नाव आणि नंबर एका कागदावर लिहून त्याच्या जॅकेट मध्ये ठेवून दिलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी तिची ट्रेन होती ती परत निघाली होती तोही आलाच होता निरोप द्यायला तिने ते जॅकेट परत केलं आणि त्याने ते घातलं.
"एवढं तर सांग, तू आहेस कुठली?" शिवने शेवटी विचारलंच.
"जसं तुम्ही गंगेच्या किनारी राहता, तसं आम्ही गोदेच्या जवळ राहतो." तिने हसून सांगितलं.
निरोप घेताना तिला आणि निरोप देताना त्याला दोघांनाही भरून आल होतं शेवटी मनावर दगड ठेऊन एकमेकांना बाय बोलले.
दोघांच्याही मनात एक रुखरुख लागून राहिली होती पुन्हा कधी भेट होईल का?
दोघांच्याही मनात एक रुखरुख लागून राहिली होती पुन्हा कधी भेट होईल का?
ट्रेन निघून गेल्यावर शिव काही वेळ तिथेच उभा राहिला आणि नंतर बाहेर पडला सहज त्याने चालता चालता फोन खिशातून काढला तसं तो कागद बाहेर पडून हवेत उडत दूरवर गेला.
त्याला माहितीही नव्हत की तिने त्याला नंबर दिला होता ओळख सांगितली होती पण कदाचित नशिबाने त्यांना अनोळखीच राहू द्यायचं ठरवलं होत, शेवटी काय तर काही अपूर्ण कथा सुद्धा तितक्याच सुंदर असतात नाही का?
समाप्त
