Login

अनोखा साथी भाग 6

A Comedy Tale
भाग 6

पार्थने बघता बघता प्लेटमधली सगळी भजी फस्त केली. त्याने तृप्तीची ढेकर दिली आणि सोफ्यावर पाठीमागे टेकून बसला.

"आहाहा आत्मा तृप्त झाला एकदम" पार्थ स्वतःच्या पोटावर हात फिरवत म्हणाला.

अनुने रिकाम्या प्लेटकडे आणि गॅसवरच्या जळालेल्या कढईकडे पाहिलं. मग तिने कंबरवेढा हात ठेवून पार्थकडे रोखून पाहिलं.

"खाऊन झालं?" अनुने विचारलं.

"हो, एकदम मस्त" पार्थने थम्ब्स-अप दाखवला.

"मस्त ना? मग आता ही भांडी कोण घासणार?" अनुने किचनकडे बोट दाखवत विचारलं.

व्हॉट? अनु तू तुझ्या मेलेल्या, स्वर्गातून आलेल्या पार्थला भांडी घासायला लावणार आहेस?"पार्थ नाटकीपणे म्हणाला.

"भजी कोणाला खायची होती? तुलाच ना? आणि जळालेली कढई कोणामुळे झाली? तुझ्यामुळे सो, नियम सर्वांना सारखेच आहेत. जिवंत असताना पण तू कामावरून पळ काढायचास आणि भूत झाल्यावर पण तेच नखरे? चाल, उठ" अनुने हुकूम सोडला.

"अगं पण मी भूत आहे माझ्या हाताला विम लिक्विड टोचेल ना" पार्थने रडवेला चेहरा केला.

"काही टोचणार नाही. मघाशी मिठी मारायला सेटिंग बदलली होतीस ना? आता भांडी घासण्यासाठी 'कामगार मोड' ऑन कर आणि मुकाट्याने किचनमध्ये चल," अनु

"काय नशीब आहे यार माझं लोक भूत झाल्यावर लोकांना घाबरवतात, हवेत उडतात, बदला घेतात आणि मी इथे येऊन जळकी कढई घासतोय"तो वैतागून हवेत तरंगतच किचनकडे गेला आणि त्याने हातात घासणी घेतली. एका भूताला विम बार लावून भांडी घासताना बघून अनुला तिचं हसू आवरत नव्हतं.

पार्थ वैतागून सिंकपाशी उभा होता. हाताने जळलेली कढई घासणं त्याला चांगलंच जड जात होतं. भांडी घासता घासता अचानक त्याच्या चेहऱ्यावर एक चमक आली, जणू त्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली होती.

"काय झालं रे? असं का हसतोयस?" अनुने संशयाने विचारलं.


"अनु आपण विसरलोच, की मी एक 'मॅजिकल' भूत आहे आता बघ माझी जादू" पार्थने मोठ्या गर्वाने म्हटलं.

त्याने हातातली घासणी खाली ठेवली आणि हवेत आपलं एक बोट गरागरा फिरवायला सुरुवात केली. त्याला वाटलं होतं की चित्रपटातल्यासारखी भांडी आपोआप घासून स्वच्छ होतील आणि जागेवर जाऊन बसतील.
पण झालं उलटंच.

साबणाचा फेस कमी होण्याऐवजी एकदम वेगाने वाढू लागला. बघता बघता फेसचा डोंगर तयार झाला. तो फेस गॅस ओट्यावरून सरकत थेट संपूर्ण किचनमध्ये पसरू लागला. इतकंच नाही, तर त्याचे मोठे-मोठे फुगे हवेत सगळीकडे उडू लागले.

क्रमशः
तुम्हाला हवंय का हे भुत भांडी घासायला



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →