Login

अनोखा साथी भाग 3

A Comedy Tail
भाग 3

"कांदाभजी? काय तू कसं काय खाऊ शकतोस? तू तर आत्मा आहेस ना? आत्म्याला कुठे भूक लागते?" अनुचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. ती बेडच्या बाजूने बाहेर आली आणि त्याच्याकडे पाहत म्हणाली.

"अगं जसं डोरेमॉन रोबोट असून सुद्धा 'डोरा केक' खाऊ शकतो, तसं मी भूत असून सुद्धा कांदाभजी खाऊ शकतो" पार्थने अजब लॉजिक लावून उत्तर दिलं

"अरे पण डोरेमॉन कार्टून आहे!" अनु वैतागून म्हणाली.

"आणि मी भूत आहे आपण दोघंही सायन्सच्या नियमांच्या बाहेर आहोत. सो, नो युक्तिवाद मला भूक लागलीये आणि मला तुझ्या हाताची भजी खायचीयेत, दॅट्स इट" पार्थ हवेत पलटी मारून सोफ्यावर पालथा झोपला.

अनु अजूनही चक्रावून त्याच्याकडे बघत होती. तिचा बॉयफ्रेंड मरून भूत झाला होता, पण त्याची खाण्याची हौस आणि नखरे अजूनही जिवंत माणसासारखेच होते.

"बरं बाबा, बनवते..." अनु किचनमध्ये गेली.

तिने बेसनाचं पीठ काढलं, कांदे चिरू लागली, तोच तिला पाठीमागून गार हवा लागली. तिने मागे वळून पाहिलं तर पार्थ चक्क हवेत तरंगत तिच्या मागे आला होता.

"तू आधी खाली उतर" अनुने हातातला चाकू दाखवत त्याला दम दिला.

"अगं खूप मजा येतेय असं लहानपणापासून हवेत उडायची इच्छा होती माझी. मला ना अगदी शक्तिमान झाल्यासारखं वाटतंय" पार्थने हवेतच आपले दोन्ही हात वर केले आणि तो एखाद्या लहान पोरासारखा गरागरा फिरू लागला.

"गाढवा, खाली उतर गॅस विझतोय ना तुझ्या हवेने" अनुने गॅसची बारीक झालेली ज्योत वाचवत त्याला जोराचा दम दिला.

"अरे हो, सॉरी सॉरी" पार्थ गांगरला आणि त्याने गरागरा फिरणं थांबवलं. पण तो जमिनीवर उतरण्याऐवजी किचनच्या ओट्यावर, जिथे मिक्सर ठेवला होता, तिथेच मांडी घालून हवेत तरंगत बसला.

"बरं ऐक ना अनु,भजी एकदम कुरकुरीत कर हं. आणि हो, चटणीत थोडं तिखट जास्त टाक," पार्थने ऑर्डर सोडली.

अनुने कढईत तेल तापत ठेवलं आणि कांद्याचं पीठ कालवायला घेतलं. ती स्वतःशीच हसली. दोन महिन्यांनंतर आज पहिल्यांदाच ती इतकी मोकळी ढाकळी बोलत होती, भलेही ती एका भुताशी बोलत होती.

"पार्थ, एक विचारू?" अनुने कढईत भजी सोडता सोडता विचारलं.

"विचार ना बेबी," पार्थ म्हणाला.

"तू खरंच आलायस का रे? की हा माझा काही भास आहे? मी जास्त विचार करतेय म्हणून मला तू दिसतोयस? तू खरंच माझ्यासोबत आहेस ना?"अनु एकदम इमॉशनल झाली. तिचा आवाज थरथरला आणि डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तिने हातातला चमचा बाजूला ठेवला.

क्रमशः


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →