भाग 2
काही वेळाने अनुने हळूहळू आपले डोळे उघडले. तिचं डोकं प्रचंड जड झालं होतं. तिने उठून बसत आजूबाजूला पाहिलं. खोलीत सगळं काही अगदी शांत होतं. नेहमीप्रमाणे लाईट्स चालू होत्या आणि खोलीत कोणताही धूर नव्हता.
ती बेडवरून खाली उतरली आणि कपाळावर हात मारून घेत स्वतःशीच म्हणाली, "हॅशशश म्हणजे ते सगळं स्वप्न होतं तर! ऑफिसच्या स्ट्रेसमुळे आणि आईशी झालेल्या वादामुळे मला उगाच भास झाला वाटतं. पार्थ कसा परत येईल?"
तिने सुटकेचा श्वास घेतला तितक्यात एक ओळखीचा, मधाळ आवाज आला
"हॅलो अनु बेबी"अनु जागीच थिजली.तिने मान वळवून पाहिलं तर पार्थ चक्क बेडवर लोळत असल्यासारखा हवेत तरंगत होता.
"मम्मीऽऽऽऽ भूऊऊऊत!" अनुच्या घशातून एकाच वेळी एवढी मोठी किंचाळी निघाली की अख्खं घर हादरलं.
अनुच्या त्या अचानक आणि काठळ्या बसवणाऱ्या आवाजाने पार्थ हवेतच दचकला. त्याचा हवेतला तोल गेला आणि तो धपकन खाली बेडवर आणि तिथून घसरून सरळ जमिनीवर पडला.
"आई शपथ लागलं ना भेंडी" पार्थने पाठीला हात
लावला आणि तोंड वेडवाकडं करत जोरात ओरडला.
लावला आणि तोंड वेडवाकडं करत जोरात ओरडला.
"तू तर मेला होतास ना? मग तू इथे कसा काय आलास? आणि तुला कसं काय लागतंय?" अनु घाबरून बेडच्या दुसऱ्या बाजूला खाली उतरली आणि स्वतःला लपवत फक्त तिचं डोकं वर काढून त्याच्याकडे बघू लागली.
पार्थ जमिनीवरून उठला, कपडे झटकले आणि वैतागून म्हणाला, "काय अनु तू पण आताच तर ढसाढसा रडत होतीस ना? कुठून का होईना पण परत ये ना प्लिज आता मी बिचारा तिकडे यमराजाचे कडक नियम तोडून, त्यांना कल्टी मारून, नरक-स्वर्गाच्या ट्रॅफिकमधून वाट काढत कसातरी इथे आलोय, तर तू माझं असं किंचाळून स्वागत करतेस?"
अनुने आता भीती बाजूला ठेवून डोळे मोठे केले, "अरे पण तुला नीट नॉर्मल माणसासारखं दरवाजातून यायला जमलं नाही का मूर्ख? कशाला ती धूर आणि लाईट चालू-बंद करायची स्टाईल मारायची गरज होती? मी मरणार होते ना धास्तीने"
"अगं ते माझ्या हातात नव्हतं भूतांच्या ट्रेनिंग मॅन्युअलमध्ये लिहिलंय, एन्ट्री नेहमी ग्रँडच पाहिजे त्यात माझी काय चूक?"पार्थ सोफ्यावर बसत म्हणाला.
"भूतांचं ट्रेनिंग मॅन्युअल? सिरियसली पार्थ? म्हणजे तुम्ही लोक तिथे गेल्यावर सुद्धा अभ्यास करता?"अनु
"येस बेबी तिथे 'भूत कसे बनावे' याचे क्रॅश कोर्सेस चालतात. पण ते जाऊ दे, आता हा फालतू प्रश्न सोड आणि मस्तपैकी गरमागरम कांदाभजी बनव बघू"
"कांदाभजी?काय तू कसं काय खाऊ शकतोस? तू तर आत्मा आहेस ना? आत्म्याला कुठे भूक लागते?" अनुचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. ती बेडच्या बाजूने बाहेर आली आणि त्याच्याकडे पाहत म्हणाली.
क्रमशः
