प्रवेश :४
सकाळी पोह्यांच्या गोंधळानंतर
(स्थळ: किचन आणि जेवणाचे टेबल. सदानंद आणि रोहनने कसाबसा पोह्यांचा नाश्ता केला आहे. किचनमध्ये सांडलेली साखर, करपलेले पोहे आणि विस्कटलेली भांडी असा सगळा पसारा आहे. सदानंद चिडून हॉलमध्ये गेले आहेत. छाया किचन आवरायला जाते, सायली तिला थांबवते.)
सायली: आई, राहू दे तो पसारा. त्यांना समजू दे की त्यांनी केलेल्या दहा मिनिटांच्या कामाचा पसारा आवरायला तुला किती वेळ लागतो. तू आज काहीच हात लावायचा नाहीस.
छाया: (सायलीचा हात धरून, थकलेल्या स्वरात) सायली... या भागात सकाळी पोह्यांचं रामायण झालं ते बस्स झालं गं. आता शांत बस. करू दे मला सगळं नेहमीप्रमाणे. उगाच घरातली शांतता कशाला घालवतेस?
सायली: आई, ही कसली शांतता? ही तर तुझी घुसमट आहे.
छाया: (किचनचा पसारा आवरता आवरता) अगं, त्या दोघांना साधं मीठ सापडत नाहीये, चहाचं आधण कसं ठेवायचं हे कळत नाहीये. उपाशीपोटी कामावर आणि कॉलेजला जातील ती माणसं. मला नाही बघवत गं हे. मला सवय आहे हे सगळं करण्याची. शेवटी घर माझंच आहे ना?
सायली: आई, हे घर तुझं आहे तर मग तुझ्या हक्काचं काय? तुला साधं पार्लरला जायचं असेल तरी बाबांची परवानगी लागते. तू मोठ्या अभिमानाने सांगतेस की तू पार्लरला जात नाहीस कारण बाबांना आवडत नाही. आई, तू स्वतःचं हसू करून घेतेयस, तुला कळतंय का हे? बाहेरच्या जगात लोक तुला 'साधी' नाही, तर 'अडाणी' समजून तुझी थट्टा करतात.
छाया: (क्षणभर थांबते, डोळे पाणावतात) सायली... तू झालीस ना, तेंव्हा मी थोडी नाराजच झाले होते गं. मला तुझ्यात मी दिसत होते. मला भीती वाटली की माझं आयुष्य जसं या चौकटीत राबण्यात गेलं, तसंच तुझंही जाईल. तुलाही उद्या असंच कोणाचे तरी टोमणे ऐकावे लागतील... या विचाराने मी घाबरले होते.
सायली: (आईला जवळ घेत) म्हणूनच आई, मी आज उभी आहे. तू कोमेजली आहेस, पण मी तुला पुन्हा फुलताना बघू इच्छिते.
(इतक्यात सदानंद किचनच्या दारात येतात. त्यांच्या हाताला थोडं पोळलं आहे, ते फुंकर मारत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आता रागापेक्षा हतबलता जास्त आहे.)
सदानंद: (हळू आवाजात) छाया... पोहे करपले होते आणि मीठ पण विसरलो होतो आम्ही. पोह्यांच्या डब्यामागे मिठाचा डबा होता, पण आम्हाला दिसलाच नाही. दहा मिनिटं किचनमध्ये उभे राहिलो तर कंबर दुखायला लागली.
सायली: (सदानंद यांच्याकडे बघून) बाबा, हे तर फक्त नाश्त्याचं होतं. अजून पूर्ण दिवसाचं काम बाकी आहे.
सदानंद: (छायाकडे बघून) छाया, सायली बरोबर म्हणतेय. आजवर तुला फक्त 'गृहिणी' म्हणून राबवून घेतलं, पण तुझा कलाकार आम्ही विसरलो. उद्यापासून तू तुझे छंद जोपासायचे. त्यासाठी जेंव्हा हवं तेव्हा हवा तेवढा त्या छंदाला वेळ द्यायचा. छाया लाग कामाला... लवकरच तुझ्या चित्रकलेचे प्रदर्शन भरवणार आहोत आपण!
सदानंद :(सायली कडे बघत) सायली अग आईला आज पार्लेर मध्ये घेऊन जा पुर्ण मेकओव्हर कर तिचा. आज घर पुर्ण माझ्या ताब्यात.
सायली :बाबा तुम्ही बोलत आहात हे!
रोहन: (आत येत) आणि आई, उद्यापासून तू किचनमध्ये फक्त स्वयंपाक करायचा. जेवताना सगळे ताट आणि पाणी मी घेईन आणि जेवण झाल्यावर मागचं सगळं सायली आवरेल !
सदानंद: आणि बरं का आई (आजीकडे बघून), प्रदर्शनाचं उद्घाटन तूच करायचं. त्या दिवशी रिबन तूच कापणार! तुझी सून जेव्हा कलाकार म्हणून जगासमोर येईल, तेव्हा तुझा आशीर्वाद हवाय तिला.
(आजी जपमाळ थांबवतात आणि स्मितहास्य करतात. छाया आनंदाने सायलीला मिठी मारते.)
बाबा:सायली तुझ्या सारख्या सायली प्रत्येक छायाच्या पाठीशी अगदी छायेसारख्या उभ्या असतील तर काय बिशाद आहे बाबांची आणि रोहनसारख्या भावाची हूकूम सोडायची.
सायली:पण बाबा छायानं आपली स्पेस आपणच जपायला शिकली तर हि वेळ येणारच नाही. कशाला त्यांना सायली हवी.
रोहन :बापरे आता प्रत्येक घरात सायली असणार त्यापेक्षा मी लग्न नाही करत पण आपली सायली ज्यांच्या घरात जाईल त्यांच्या घरातील सदानंदचा मात्र आनंदच बरका!
सायली :रोहन आधी तुला ताळ्यावर आणणार, तुझं लग्न करणार आणि मग मी जाणार.
छाया :बापरे नको, नको लवकरच तुझं शुभमंगल बरका सायली. मी बदलले काळजी नको.
काय म्हणालीस, मदत सगळे एकमेकांना टाळी देत हसतात आणि पडदा पडतो
--- पडदा पडतो ---
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
