Login

"उंबरठ्याबाहेरचे आकाश" अंक चौथा

Apali Space Apanch Japayachi Asate.
आई आणि सायली मधील संवाद
​(रात्रीची वेळ. हॉलमध्ये सदानंद आणि रोहन चिडून बसले आहेत. छाया आणि सायली किचनमध्ये ओटा आवरत आहेत. सायली ताटांची आदळआपट करत आपला राग व्यक्त करतेय, तर छाया शांतपणे काम करतेय.)
​छाया: (हळू आवाजात) सायली... पुरे गं आता.सकाळी पोह्याचे रामायण झाले बस्स झाले सायली, माझं ठरलेली कामं मला करू दे हतो तांब्या कशाला आदळतेयस? हळू आवर.
​सायली: (रागाने) का ग आई? मी काही चुकीचं बोलले का? तू दिवसभर राबतेस यांना स्वतःहून करता येत नाही? वरून तुलाच नाव ठेवतात?
​छाया: (सायलीचा हात धरून तिला थांबवते) सायली... शांत बस गं! नको घरात भांडणं वाढवू. बघ ना, तुझे बाबा आधीच संतापलेत. आजींचा पण रक्तदाब वाढला असेल. उगाच कटकट नको आता.
​सायली: आई, ही 'कटकट' नाहीये, हा तुझा हक्क आहे. तू का ग नेहमी माघार घेतेस? तुला भीती वाटते का त्यांची?
​छाया: (उसासा टाकून ) भीती नाही गं, पण सवय झालीये आता. २५ वर्ष झाली या संसाराला. त्यांनी कधी पाणी स्वतःहून घेतलं नाही की स्वतःचं ताट उचललं नाही. आता या वयात त्यांना बदलून काय होणार? तू गप्प बसलीस की घरात शांतता राहील.
​सायली: पण ही शांतता 'स्मशानशांतता' आहे आई! तू स्वतःला मारून ही शांतता विकत घेतेयस. तुला माहिती आहे का, तू जेव्हा 'शांत बस' म्हणतेस, तेव्हा तू त्यांना अजून सवलत देतेस तुझा अपमान करायला. तुला साधं पार्लरला जायला पण यांची परवानगी लागते, हे तुला पटतं का?
​छाया: (डोळे पाणावतात) मला काय वाटतं याला आता अर्थ उरला नाहीये सायली. मी एक 'होममेकर' आहे. माझं जग हे घर, हे स्वयंपाकघर आणि तुम्ही लोकच आहात. भांडण करून कोणाचं भलं झालंय का आजवर? उलट घराचं वातावरण खराब होतं.
​सायली: आई, जोपर्यंत तू गप्प बसशील, तोपर्यंत या घराची 'चौकट' कधीच बदलणार नाही. बाबांना वाटतं की तू त्यांची नोकर आहेस. रोहनला वाटतं की आईने वाढणं हे तिचं कामच आहे. जर तू आज ओरडून सांगितल नाहीस की तू थकली आहेस, तर त्यांना कधीच समजणार नाही.
​छाया: अगं पण ते पुरुष आहेत. बाहेरून दमून येतात.
​सायली: आणि तू? तू यंत्र आहेस का? तुला थकवा येत नाही? आई, तू शिकलेली आहेस. तू ठरवलं असतंस तर आज तूही मोठ्या हुद्द्यावर असतीस. पण तू घर निवडलं. याचा अर्थ असा नाही की घरातल्यांनी तुला गृहीत धरावं.
​छाया: (हळूच सायलीच्या डोक्यावर हात फिरवत) तू माझ्यासाठी बोलतेयस हे मला समजतंय गं. पण मला भीती वाटते की तुझ्या या वागण्यामुळे तुझं आणि बाबांचं नातं बिघडेल.
​सायली: नातं आधारावर टिकतं आई, अधिकारावर नाही. उद्या सकाळी तू लवकर उठणार नाहीस. तू फक्त स्वतःसाठी चहा करशील. बघू दे त्यांना, की तू नसलीस तर हे घर कसं विस्कटतं.
​छाया: (घाबरून) नको गं सायली... खूप गोंधळ होईल.
​सायली: होऊ दे! त्या गोंधळातूनच त्यांना तुझी किंमत कळेल. आई, तू फक्त आज माझ्यासाठी शांत नको बसू. स्वतःसाठी एकदा 'नाही' म्हणायला शीक.
​(छाया विचारमग्न होते. तिला सायलीच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसते.
बाहेरून सदानंद यांचा पुन्हा ओरडण्याचा आवाज येतो - "छाया, रिमोट कुठेय?")
​सायली: (आईकडे बघून) बघ... अजून एक हुकूम. आता तू ठरव, तुला रिमोट शोधायला जायचंय की शांतपणे आपला चहा प्यायचाय.
​(छाया क्षणभर थांबते, मग हळूच बसल्या जागीच राहते. ती उठत नाही. सायली हसते आणि आईचा हात घट्ट धरते.)
​--- पडदा ---
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →