Login

"उंबरठ्याबाहेरचे आकाश अंक तिसरा

Apli Spece Apaanch Japayala astate.
​प्रवेश ३ :
दुसऱ्या दिवशीची सकाळ -
स्वयंपाकघरातील 'गोंधळ'
​(सकाळचे ८ वाजले आहेत. एरवी ७ वाजेपर्यंत सर्वांचा चहा-नाश्ता झालेला असतो, पण आज स्वयंपाकघर ओसाड आहे. सदानंद रागाने वावरत आहेत. रोहन उपाशीपोटी हॉलमध्ये बसला आहे. आजी आपल्या खोलीतून ओरडत आहेत.)
​आजी: (खोलीतून) छाया... अगं ८ वाजले, माझं गरम पाणी अजून कसं आलं नाही? औषधं घ्यायची वेळ झाली माझी!
​सदानंद: (किचनमधून ओरडत) आई, ती छाया अजून उठलीच नाहीये वाटते ! आणि सायली सुद्धा तिच्याच खोलीत आहे असं दिसतंय.
चहाचं आधण कसं ठेवायचं हेच कळत नाहीये. ही गॅसची शेगडी पेटत का नाहीये?
​रोहन: (किचनमध्ये येत) बाबा, लायटर खराब झालाय वाटतं. आणि चहाची पत्ती कुठे आहे? डबे सगळे सारखेच दिसतायत.
​(सदानंद चिडून एक-एक डबा उघडून बघतात. गोंधळात साखर सांडते.)
​सदानंद: अरे बापरे! ही साखर खाली सांडली. आता हे साफ कोण करणार? छाया... अगं ए छाया!
​(इतक्यात छाया आणि सायली बागेतून फिरून येतात. दोघींच्या हातात ताजी फुलं आहेत आणि त्या आनंदी दिसत आहेत.)
​सायली: (हसत) काय झालं बाबा? इतका आरडाओरडा का? चहा झाला का तुमचा?आमचा पण ठेवता का? मस्त आलं घालून बरका! आईला साखर विचारा. मला मात्र कमी साखरेचा.
​सदानंद: (रागाने डब्यांकडे बोट दाखवत) चहा कसला होतोय? पत्ती सापडत नाहीये, साखर सांडलीये आणि तुझ्या आईला साधं लायटर नीट ठेवता येत नाही का?
​छाया: (शांतपणे) लायटर बरोबर आहे हो, फक्त त्याला थोडं पुसून घ्यावं लागतं आणि दोनदा टक् टक् करा. साखर सांडली असेल तर तिथेच फडकं आहे ओट्याच्या बाजूला पुसून घ्या.
​रोहन: आई, मला भूक लागलीये. नाश्त्याचं काय? मला कॉलेजला उशीर होतोय.
​सायली: रोहन, आज तूच ठरव नाश्ता काय करायचा. पोहे करायचे असतील तर आई वाण सामान आले कि लगेच निवडून ठेवते तुझ्या आणि बाबांच्या भाषेत फक्त तुला फोडणी तर द्यायची आहे.
​(सदानंद आणि रोहन नाईलाजाने कामाला लागतात. थोड्या वेळाने सदानंद पोहे घेऊन टेबलवर येतात. पोहे थोडे करपलेले आहेत आणि रंगही पांढरट दिसतोय. सदानंद ताटात पोहे घेतात आणि पहिला घास घेतात...)
​सदानंद: (थुंकत) छे! काय हे? यात मीठच नाहीये! आणि शेंगदाणे तर कच्चेच राहिलेत.रोहन तुला सांगितले होते ना शेंगदाणे भाजून घे.
​सायली: (मुद्दाम विचारते) काय झालं बाबा? पोहे आवडले नाहीत का? मीठ कमी पडलं?अरे वा साधं पोहे बनवायला दोघे, दोघे !
​सदानंद: (रागाने) कमी पडलं? अजिबातच नाहीये!रोहन घालणार होता मीठ.
​सायली: (ठामपणे) नेमकं हेच बाबा! कालपर्यंत आईने मीठ कमी टाकलं तर तुम्ही ओरडत होता. वरण पातळ झालं तर तिला टोमणे मारत होता. आता तुम्हाला कळेल की भाजीत मीठ कमी पडणं किंवा जास्ती होणं म्हणजे काय असतं!
स्वयंपाक करणं म्हणजे फक्त गॅसवर कढई ठेवणं नसतं. चव येण्यासाठी तिथे मन एकाग्र करावं लागतं. तुम्हाला दहा मिनिटं किचनमध्ये उभं राहणं जमत नाहीये, तर आई वर्षानुवर्षे हे बिनतक्रार करतेय.वर तुमच्या टोमण्यांची फोडणी असते कि हो झणझणीत.
​सदानंद: (काही न बोलता ताटाकडे बघत राहतात.)
सायली: आता तुम्हाला समजेल की, जेवताना आईला सारखं उठवणं किती चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतः कष्ट करता, तेव्हा तुम्हाला त्या कष्टाची पण किंमत कळते आहे .
आई 'होममेकर' आहे म्हणून तिचं काम सोपं नसतं, उलट ते 'थँकलेस' जॉब आहे. तिला पगार मिळत नाही आणि सुट्टी तर कधीच नाही!उलट तुमच्या टोमण्यांची झणझणीत फोडणी!
​छाया: (सदानंद यांच्याकडे बघून) मीठ तिथेच कोपऱ्यातल्या डब्यात आहे. हवं असेल तर घेऊन टाका. आणि हो, पोहे करपले असतील तर थोडे कुरकुरे लागतील, पण पोट भरेल तुमचं.
​(सदानंद पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने गप्प होतात. ते गुपचूप मिठाचा डबा घेतात. रोहन सुद्धा काही न बोलता आपले पोहे संपवतो. आजी बाहेर येऊन हे सगळं शांतपणे बघत राहतात. त्यांनाही आज पहिल्यांदा सून किती राबतेय याची जाणीव होते.)
​--- पडदा ---
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →