प्रवेश २ :
जेवणानंतरचा दिवाणखाना
(जेवण अर्धवट सोडून सदानंद संतापाने दिवाणखान्यात येऊन बसले आहेत. रोहन आपल्या खोलीत निघून गेला आहे. आजी कोपऱ्यात बसून 'कलयुग आलंय' असं पुटपुटत आहेत.
छाया किचन आवरून दिवाणखान्यात येते, सायली तिच्यासोबत आहे.)
सदानंद: (रागाने छायेकडे बघत) वा! आज तर कमालच झाली. साहेबांना दुधावरून सुनावलं हाताने दूध घ्यायला लावलं आणि मुलालाही हाताने भात घ्यायला सांगितला. छाया, खूप मज्जा येतेय ना पोरीला फूस लावून माझं अपमान करायला?
छाया: (शांतपणे) अपमान नाही हो, मी फक्त थकले होते इतकंच. आणि रोहन आता मोठा झालाय, त्याने स्वतःचं वाढून घेणं ही अपमानाची गोष्ट कशी झाली?
आजी: (मध्येच तोंड उघडत) अगं, पण ही रीत नाही. नवऱ्याचा आणि मुलाचा मान हा राखायलाच हवा. तू आज जे केलंयस ना, ते या घराच्या परंपरेला शोभा देणारं नाही. उद्या ही पोरगी दुसऱ्याच्या घरी जाईल, तिथे पण असंच करणार का?
सायली: (पुढं येत) दुसऱ्याच्या घरी गेल्यावर सुद्धा तिने 'माणूस' म्हणूनच जगलं पाहिजे आजी, 'नोकर' म्हणून नाही. आणि बाबा, तुम्ही म्हणताय ना की आई दिवसभर घरी असते, मग तिला थकवा कसा काय? मग आजपासून आपण एक प्रयोग करूया.
सदानंद: कसला प्रयोग?
सायली: उद्यापासून आई एक आठवडा 'सुट्टी' घेणार आहे. ती घराचं एकही काम करणार नाही.! तुमचं डबे, तुमचा चहा, आजीची औषधं, घराची झाडलोट... हे सगळं तुम्ही आणि रोहन मिळून करायचं.वाटल्यास माझी मदत घेऊ शकता. पण आई काहीही करणार नाही.
सदानंद: (हसत) काय बालिशपणा आहे हा? घर काय खेळ आहे का? आणि मी आॉफसला जातो, बाहेरची काम करतो, हे सगळे घरा साठीच ना! मला वेळ नसतो हे तुला माहिती आहे ना?
सायली: आईला सुद्धा स्वतःहाचा 'वेळ' हवा आहे बाबा, कारण तिचा प्रत्येक मिनिट काय सेकंद सुध्दा तुमच्या कामासाठी खर्च होतो. तिला स्वतःसाठी कधी वेळ मिळतो? तुम्ही म्हणता ना की होममेकरला काय काम असतं? मग उद्या स्वतः करून बघा, म्हणजे मग समजेल की पोळी गोल येण्यासाठी वरण पातळ कि घट्ट करण्यासाठी, सगळ्यांच्या आवडीनिवडी सांभाळण्यासाठी आणि घर नीट राहण्यासाठी किती कष्ट पडतात. बोलणं आणि चुका काढणं खुप सोप्पे असते बाबा! त्यात आईसारखा स्वभाव असला कि, संपलंच कि हो!
रोहन: (खोलीतून बाहेर येत) हे बघ सायली, मला कॉलेज असतं, प्रोजेक्ट्स असतात. मी हे घरकाम वैगेरे करणार नाही. आई आहे ना, तिचं कामच आहे ते.तु आहेस कि, मदतीला सायली.
सायली: (रोहनकडे बघून) रोहन, तुला प्रोजेक्ट्स असतात तसं आईला सुद्धा तिचं आयुष्य आहे. मी पण मोकळी नाही आईला देखिल वाचायला आवडतं, तिलाही शांतपणे सोफ्यावर बसून चहा पित पित एखादी फिल्म बघायला आवडते.तिला ही चित्रकलेची आवड आहे. तिनं काढून दिलेली चित्र दिमाखात शाळेत नेऊन पहिला नंबर मिळवणारा तुच आहेस ना रोहन! पण तू कधी विचार केलास का याचा ?
बाबा तुम्ही आईला पार्लरला जाण्यापासून रोखलं, कारण तुम्हाला 'वेळेवर जेवण' हवं होतं, तुमच्या दृष्टीने ते थेरं आहेत. पण बाबा आता पार्लर ही काळाची गरज आहे ! मानसिक शांततेसाठी. मग तिच्या मानसिक शांततेचं काय?
सदानंद: (रागाने ओरडून) बस झालं आता सायली! घर पुरूषप्रधान संस्कृतीनुसार चालतं. ज्याचं काम त्यांनी करावे. मी कमावतो. तुझी आई घर सांभाळते. तु मध्ये मध्ये ढवळाढवळ करू नकोस.छाया, उद्या सकाळी सगळे व्यवहार नेहमीप्रमाणेच होतील लक्षात ठेवा.आणि हे लक्षात ठेवा कोणाचं कोणावाचून आडत नाही.
छाया: (सदानंद यांच्या डोळ्यांत बघून, खूप शांतपणे) तर मग ठीक आहे. कोणाचं कोणावाचून आडत नाही ना तर उद्या सकाळी मी उशिरा उठते. मला खूप दिवसांपासून पहाटेची शांत झोप हवी होती.चहा, साखरेचे डबे गॅस, चहाचं आधण कसं ठेवायचं हे तुम्हाला माहिती आहेच. सायली, चल ग, आपण उद्या सकाळी लवकर फिरायला जाऊया, खूप दिवस झाले आपण बागेत गेलो नाहीये.
(सदानंद सुन्न होऊन छायेकडे बघत राहतात. त्यांना काय बोलावं सुचत नाही. आजींच्या हातातली माळ थांबते. सायली आईचा हात अभिमानाने पकडते.)
सायली: (जाता जाता रोहनला) आणि रोहन, उद्या सकाळी तुझा चहा तूच करून पी, नाहीतर सवय मोडेल तुझी!
(दोघीही आतल्या खोलीत निघून जातात. सदानंद दिवाणखान्यात एकटेच रागाने आणि गोंधळलेल्या अवस्थेत बसून राहतात.)
--- पडदा ---
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
