उंबरठ्यापलीकडचे आभाळ (भाग 1)

रत्नागिरीच्या एका सधन कुटुंबात जगन्नाथ देशमुखांचा शब्द म्हणजे अंतिम निर्णय असायचा. जुन्या वळणाचे, प्रतिष्ठित आणि समाजातील नियमांवर डोळे झाकून विश्वास ठेवणारे
​भाग 1

रत्नागिरीच्या एका सधन कुटुंबात जगन्नाथ देशमुखांचा शब्द म्हणजे अंतिम निर्णय असायचा. जुन्या वळणाचे, प्रतिष्ठित आणि समाजातील नियमांवर डोळे झाकून विश्वास ठेवणारे

जगन्नाथराव घरातील सर्वांवर एक प्रकारचा दरारा ठेवून होते. त्यांची सून मीरा उच्चशिक्षित, समजूतदार आणि स्वाभिमानी होती. मीराचा पती रोहन पुण्याला एका नामांकित आयटी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत होता.

मीराला लग्नानंतर स्वतःच्या पायावर उभं राहून नोकरी करायची होती, पण घरात पाऊल ठेवताच तिच्या इच्छेवर सासरच्या परंपरेचा पडदा ओढला गेला.

"आमच्या देशमुखांच्या घरची लक्ष्मी बाहेर पडून दुसऱ्यांची चाकरी करत नाही. समाजात आमचं एक नाव आहे. घरात कशाची कमतरता आहे का?"

हे सासू सुमित्राबाई आणि जगन्नाथरावांचे ठाम शब्द होते. मीराने सुरुवातीला संसारात कोणताही कटुता नको म्हणून स्वतःच्या करिअरला बाजूला ठेवले.

दिवसभर सासरची जबाबदारी, पाहुण्यांची सरबराई आणि घरकामात तिचे आयुष्य साच्यात बसल्यासारखे चालू होते.

रोहनही स्वतःच्या कामात एवढा व्यग्र असायचा की मीराच्या मनातील घुसमट समजून घेणे त्याच्यासाठी दुय्यम ठरले.

​एक दिवस रोहनवर कामाचा प्रचंड दबाव आला आणि अचानक कंपनीच्या अंतर्गत राजकारणामुळे त्याची नोकरी संकटात सापडली.

कंपनीने त्याला सक्तीच्या रजेवर पाठवले आणि त्याच्या विभागावर आर्थिक गैरव्यवहाराचा खोटा आरोप लागला.

एका रात्रीत देशमुखांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. सोसायटी आणि नातेवाईकांमध्ये ज्या घराचा दरारा होता, तिथेच कुजबूज सुरू झाली.

रोहन नैराश्यात गेला; त्याने स्वतःला खोलीत बंद करून घेतले. जगन्नाथरावांचा स्वाभिमान आणि प्रतिष्ठा धुळीस मिळाल्यासारखी झाली. समाजात तोंड कसे दाखवायचे, या भीतीने ते खचून गेले.

​नेमक्या याच वेळी मीराने खंबीर व्हायचे ठरवले. ती केवळ गृहिणी नव्हती, तर फायनान्स आणि डेटा ॲनालिटिक्समधील गोल्ड मेडलिस्ट होती.

मीराने रोहनच्या नकळत त्याच्या ऑफिसच्या केसशी संबंधित सर्व अंतर्गत कागदपत्रे, आर्थिक अहवाल आणि प्रोजेक्टचे डेटा लॉग्स तपासायला सुरुवात केली.

रात्रीच्या अंधारात, जेव्हा घरातले सर्वजण चिंतेत झोपलेले असायचे, तेव्हा मीरा लॅपटॉपवर ऑडिट ट्रेलचे विश्लेषण करत होती.

तीन आठवड्यांच्या अथक परिश्रमांनंतर मीराने त्या घोटाळ्याचा खरा सूत्रधार शोधून काढला, जो रोहनचाच एक सहकारी होता.

तिने सर्व पुराव्यांची एक परिपूर्ण फाईल तयार केली. तिने कंपनीच्या वरिष्ठ संचालक मंडळाशी थेट संपर्क साधला आणि एका औपचारिक बैठकीत संपूर्ण डेटा विश्लेषणासह सादरीकरण केले.

मीराच्या तर्कापुढे आणि पुराव्यांपुढे संचालक मंडळाला चूक मान्य करावी लागली. रोहन तर फक्त बगतच राहिला कंपनीने रोहनवरील सर्व आरोप मागे घेतले, त्याची नोकरी पूर्ववत केली आणि सन्मानाने माफी मागितली.

​घरी आल्यावर जेव्हा रोहनने आई-वडिलांसमोर संपूर्ण सत्य सांगितले, तेव्हा दिवाणखान्यात शांतता पसरली. ज्या मीराच्या ज्ञानाला आणि क्षमतेला घरात केवळ 'चूल आणि मूल' यापुरते मर्यादित ठेवण्यात आले होते, तिनेच आज संपूर्ण घराची प्रतिष्ठा आणि रोहनचे भविष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले होते.

Stay tuned....

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →