जलद लेखन स्पर्धा - फेब्रुवारी २०२६
विषय - दुतोंडी वागणूक
विषय - दुतोंडी वागणूक
शीर्षक - उचलबांगडी
“मी सासूबाईंना घरी घेऊन जायला आले आहे. नेऊ ना? प्रणव सारखी आठवण काढतोय आजीची.” पद्मा मधुर स्वरात आपल्या जावेकडे गिरिजाकडे बघत म्हणाली.
‘आज वहिनींच्या जीभेवर एवढी साखर कशी?’ पद्माच्या बोलण्याने गिरिजा आश्चर्यचकित झाली पण तिलाही सासूबाई आपल्या घरी नको असल्याने का? कशाला? असले प्रश्न विचारायच्या भानगडीत न पडता तिने लागलीच संमती दिली.
वासंतीताईंना देखील नातवाची फार आठवण येत होती. नातवाच्या ओढीने त्याही फारसे आढेवेढे न घेता मोठ्या सुनेबरोबर निघाल्या.
वासंतीताईंची दोन्ही मुलं - कपिल आणि कैवल्य नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक झाली होती. दोघांचेही बोरिवली येथे दहा पंधरा मिनिटांच्या अंतरावर फ्लॅट होते. तर वासंतीताई आणि सुभाषराव कर्जत येथे रहात होते.
“वडिलांच्या पश्चात आईला एकटीला गावी कसे ठेवायचे” म्हणून साधारण वर्षभरापूर्वी वासंतीताईंना त्यांचा मोठा मुलगा कपिल आपल्याबरोबर घेऊन आला होता आणि इथूनच सगळा गोंधळ सुरू झाला.
तसे सुरवातीला सगळे छान चालले होते पण काही महिन्यातच पद्माला आपल्या सासूची अडचण वाटू लागली. लग्नानंतर काही दिवस आपल्या सासरी राहून ती पतीसोबत लगेचच मुंबईला आली होती त्यामुळे सासुरवास तिला माहितच नव्हता. ती आपल्या मनाची मालकीण होती.
कधी ही उठावे कधीही झोपावे, नवरा ऑफिसला गेल्यावर मोबाईल बघत लोळत पडावे. कधी बाहेरून जेवण मागवावे तर कधी मॅगीवरच भागवावे, मनात येईल तेव्हा काम करावे. नवऱ्याला डब्बा दिला तर दिला नाही तर नाही असा सगळा तिचा मनमानी कारभार चालू होता.
पूर्वीही सासू सासरे आले की पद्माची चिडचिड व्हायची नाही असे नाही पण ते कारणानिमित्ताने चार, आठ दिवस आले असल्याने, थोडेच दिवसात आपल्या घरी कर्जतला परत जाणार हे माहीत असल्याने ती सगळे कसेतरी निभावून न्यायाची.
मात्र वासंतीताई कायमच्या इकडे आल्यावर चित्र बदललंं. वेळेची बंधन आली. मनासारखं वागणं कमी झालं.
तिच्या स्वातंत्र्यावर लगाम लागल्याने कोंडीत पकडल्यासारखी तिची अवस्था झाली होती.
“आपणच का सासूबाईंना सांभाळायचे.” एक दिवस रागाच्या भरात पद्माने कपिलला विचारले.
“मग कोण बघणार तिला. मोठा मुलगा आहे मी तिचा. तिला काय असंच वाऱ्यावर सोडून देऊ. काहीही काय बोलतेस तू पद्मा.” कपिल पद्मावर चांगलाच भडकला.
“वाऱ्यावर सोडा, जबाबदारी नाकारा कुठे म्हणते मी. फक्त धाकट्या मुलाला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून द्या एवढेच माझे म्हणणे आहे.”
“काय बोलायचे ते स्पष्ट बोल.” कपिलचा आवाज वाढला.
“आई इकडे आल्यापासून आपल्याकडेच राहतात, म्हणजे कैवल्य भावजींकडे जातात नाही असं नाही पण तास, दोन तास तिकडे जाऊन मुक्कामी परत इकडे येतात. त्या इथे रहात असल्यामुळे आपल्याला कुठे जाता येत नाही. साधं हॉटेलात जेवायला जायचं म्हटलं तरी त्यांचा स्वयंपाक करून जावं लागतं. ती दोघं मात्र मागच्या महिन्यात चार दिवस महाबळेश्वरला जाऊन आली. त्यात ती दोघं कमवतात, आपल्याकडे एकाच्या जीवावर सगळं. त्यांचा टू बीएचके आपला वन बीएचके; सगळाच फरक पडतो. एक माणूस वाढला की खर्च वाढतो.” पद्माने मनातली खदखद बोलून दाखवली.
“मी आईला सांभाळू शकत नाही, तू आईला घेऊन जा असे कसे सांगू मी कैवल्याला? दिसायला कसं दिसेल ते. काही झालं तरी मी मोठा आहे.” भावनाविवश झालेल्या कपिलने पद्माचं म्हणणं खोडून काढलं.
“इकडे बरं वाटतं, नातवाच्या सोबत छान वेळ जातो. कैवल्य आणि गिरिजा ऑफिसला गेल्यावर काय करायचं मोठा प्रश्न पडतो. एकटीला भुतासारखं घरात बसून कंटाळा येतो.” वासंतीताई नेहमी म्हणायच्या. धाकट्या लेकाकडे जायला टाळाटाळ करायच्या. वासरात लंगडी गाय शहाणी या उक्तीने त्यांना गिरीजापेक्षा पद्मा बरी वाटायची. फटकळ असलेल्या गिरिजाच आणि वासंतीताईंच फारसं पटत नव्हतं. त्या तिच्या घरी जायला फारश्या उत्सुक नसायच्या.
‘ती दोघं तिकडे राजाराणीचा संसार करणार, मॉल, पिक्चर, कॅंन्डल लाईट डिनर करत वीकेंड साजरा करणार आणि मी? ह्या म्हातारीला सांभाळत बसायचं!’ जावेचे स्टेटस पाहून पद्माच डोकं फिरलं होतं.
यावर आत्ताच कायमचा तोडगा काढला नाही तर सासूबाई कायमच्या माझ्या मानगुटीवर बसतील, चाणाक्ष पद्मा समजून चुकली होती. आता ठोस पाऊलं उचलायला हवीत पद्माने मनाशी खुणगाठ बांधली.
क्रमशः
