जलद लेखन स्पर्धा - फेब्रुवारी २०२६
विषय - दुतोंडी वागणूक
विषय - दुतोंडी वागणूक
शीर्षक - उचलबांगडी
“प्रणव आता बालवाडीत आहे, मोठा होईल तसे खर्च वाढतील. त्याच्या शिक्षणाची, भविष्याची तरसूद नको का करायला? आणि कायमच घेऊन जा आईला असं सांगा कुठे म्हणते मी. त्या काही दिवस तिकडे, काही दिवस इकडे राहतील.” आपल्या मुलाच कारण पुढे करत पद्माने कपिलला विश्वासात घेतलं.
आई आणि पत्नी दोघीही कपिलसाठी तितक्याच महत्वाच्या होत्या. तो काही क्षण गप्प बसला.
“मला ह्यात मध्ये पाडू नकोस. तू गिरिजाशी बोलून काय ते ठरव.” पद्माच्या रोजच्या कटकटीला वैतागून कपिलने हात झटकला. भावाशी बोलून काही उपयोग होणार नाही गिरिजावाहिनी जे म्हणेल तेच होईल त्याला चागलं ठाऊक होतं. स्वतःला वाईटपणा येऊ नये म्हणून त्याने पद्माच्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि तो हळूच नामानिराळा झाला.
“तू आणि गिरिजा काय ते बघून घ्या. आम्हाला यात पाडू नका” कपिलने घेतलेला पवित्रा पाहून पद्मा चक्रावली. तिला वाटलं होतं कपिल त्याच्या आईशी बोलेल पण त्याने तटस्थ राहणं पसंद केलं. काय करावं, कसं बोलावं या विचारात असतानाच पद्माच्या मामे बहिणीच्या मुलाच बारस ठरलं आणि पद्माला हवी असलेली संधी चालून आली.
“आई पुढच्या रविवारी दिव्याच्या बाळाचं बारसे आहे. आम्हाला जावं लागेल. तिच्या डोहाळजेवणाला मी गेले नव्हते या वेळी गेले नाही तर मामी रागवेल.”
“अगं मग जा की, एवढं स्पष्टीकरण का देतेस?” वासंतीताईंनी गोंधळून विचारलं.
“रिझर्व्हेशन मिळत नाही आहे; आधी आम्ही लोणावळ्याला माझ्या बहिणीकडे जाणार तिकडून तिच्या गाडीने कोल्हापूरला. एवढा लांबचा कारने केलेला प्रवास तुम्हाला झेपणार नाही. रिझर्व्हेशन मिळालं असतं तर नक्की तुम्हाला नेलं असतं.”
“काही हरकत नाही. तुम्ही जा. मला व्हिडिओकॉल लावून दे, मी फोनवरून दिव्याला, बाळाला आशीर्वाद देईन.” वासंतीताईंनी समंजसपणे वस्तुस्थिती स्वीकारली.
“आम्ही नाही तोवर तुम्ही गिरिजाकडे राहाल ना? तुम्हाला इकडे एकटं ठेवून जायला मन धजावत नाही. ह्याचं कशात लक्ष लागणार नाही. तुम्ही भावजींकडे गेलात तर आम्ही निश्चिंत मनाने जाऊ.” नाईलाज असल्याने तुम्हाला नेता येत नाही असा आव आणत पद्मा मधाळ स्वरात म्हणाली.
पद्माच्या गोड बोलण्याला वासंतीताई भुलल्या. गिरिजाकडे जायला तयार झाल्या. इथेच त्यांची इकडून तिकडे, तिकडून इकडे उचलबांगडी सुरू झाली. गोड बोलून पद्माने डाव साधला. आपला हेतू सफल झाल्यामुळे तिला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. तिने गिरिजाशी बोलणं केलं. बारशाला जायच्या चार दिवस आधीच वासंतीताईंना तिच्याकडे नेऊन सोडलं.
पद्माला भिशी, पार्टी, खरेदीच्या निमित्ताने कुठे बाहेर जायचे असेल, जेव्हा तिला प्रणवला
आपल्यासोबत न्यायचे नसेल तेव्हा ती त्याला सांभाळण्याच्या बहाण्याने, तो आजीची सारखी आठवण काढतो अशी कारणं सांगून वासंतीताईंना आपल्या घरी घेऊन येऊ लागली. गरज सरली आपलं काम झालं की परत वासंतीताईंची गिरिजाकडे पाठवणी करू लागली.
आपल्यासोबत न्यायचे नसेल तेव्हा ती त्याला सांभाळण्याच्या बहाण्याने, तो आजीची सारखी आठवण काढतो अशी कारणं सांगून वासंतीताईंना आपल्या घरी घेऊन येऊ लागली. गरज सरली आपलं काम झालं की परत वासंतीताईंची गिरिजाकडे पाठवणी करू लागली.
गिरिजा देखील काही नव्हती, तिच्याकडे मदतनीस म्हणून काम करणाऱ्या उषाच्या वारंवार दांड्या व्हायच्या. विश्वासू असल्याने, उषाकडे किल्ली देऊन तिच्या जीवावर बिनधास्त ऑफिसला जाऊ शकत असल्याने गिरिजा तिला कामावरून काढून टाकत नव्हती. उषा सुट्टीवर गेली की गिरिजला सासूबाईंची आठवण यायची. वासंतीताई शिस्तप्रिय होत्या, वेळच्यावेळी त्यांना कामं केलेली लागायची. उषा आली नाही तर गिरिजा ऑफिसमधून आल्यावर करेल याची वाट न बघता की त्या सगळी कामे उरकून टाकायच्या त्यामुळे उषाच्या अनुपस्थित गिरिजाला वासंतीताईंचा आधार वाटायचा. ती आली की मात्र सासूच्या शिस्तीच्या बडग्याचा जाच वाटू लागायचा.
गिरिजा वासंतीताईंच्या काटेकोर स्वभावामुळे वैतागून जायची “वहिनी, कधी न्यायला येताय आईंना की मी संध्याकाळी आणून सोडू.” जावेला फोन करून भंडावून सोडायची.
भोळ्याभाबड्या वासंतीताईंना सुरवातीला पद्मा, गिरिजाच दुतोंडी वागणं समजत नव्हतं, हळूहळू मात्र त्यांच्या सगळं लक्षात यायला लागलं.
एखादी वस्तू ह्या खोलीतून त्या खोलीत अगदी सहजतेने ठेवल्याप्रमाणे त्या दोघी वासंतीताईंची गरजेनुसार इकडून तिकडे रवानगी करत होत्या.
आपल्या सुनांचं खरं रूप समजताच वासंतीताई अंतर्बाह्य हादरल्या. आपल्या मुलांची ह्या सगळ्याला मूकसंमती आहे ह्याची जाणीव होताच त्याचं मातृहृदय पिळवटून निघालं.
‘हे दिवस दाखवण्यासाठी मला इकडे घेऊन आलात! मी माझ्या घरी सुखात होते.’ मन आक्रोश करू लागलं. पतीच्या सहवासातील क्षण डोळ्यांसमोर तरळले, डोळे भरून आले. पूर्वाआयुष्यात सुख, समाधान होतं. आज मुलांच्या घरात स्वतःच स्थान शोधावं लागत होतं. आपणच कुठे तरी कमी पडल्याच शल्य वासंती ताईंना बोचत होतं.
क्रमशः
©®मृणाल महेश शिंपी.
वासंतीताईं परिस्थिती स्वीकारतील की यावर मात करतील जाणून घेऊया पुढील भागात…
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
