Login

उचलबांगडी भाग .. ३ अंतिम भाग

उचलबांगडी करणाऱ्यांना चोख उत्तर देणाऱ्या स्वाभिमानी स्त्री ची कथा
जलद लेखन स्पर्धा - फेब्रुवारी २०२६
विषय - दुतोंडी वागणूक

शीर्षक - उचलबांगडी

पद्मा आणि गिरिजाच दुहेरी रूप समोर येताच वासंतीताई खचून गेल्या होत्या. सरळ जाऊन जाब विचार, असं एक मन सांगत होतं; तर दुसरं मन ‘वाद घालून पोटची पोरं दुखावतील, तसंही कितीसं आयुष्य राहिलं आहे तुझं’ वादविवाद करण्यापेक्षा आहे ते स्वीकारायला भाग पाडत होतं.

‘कदाचित मुलांना आपली चूक उमगेल… सुनांना उतरती होईल’ असा आशेचा काजवा अधून मधून डोळ्यासमोर चमचम करत होता त्यामुळे कुठलाच ठोस निर्णय होत नव्हता. काय करावं काहीच कळत नव्हतं, बरेच दिवस त्यांचं स्वतःशीच द्वंद्व सुरू होतं.

अखेर कोणाशी तरी बोलून मन हलकं करावं, असं वाटून त्यांनी आपल्या भावाला फोन लावला.

“ताईने अर्जंट बोलावलं आहे. गिरिजा, कैवल्य कामावर गेल्यावर ये सांगितलं आहे म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाच बोलायचं असणार.” दत्ताभाऊंनी पत्नी लताला सांगितलं. दोघांनी दुसऱ्याच दिवशी मुंबई गाठली.

आपण निरोप धाडल्यावर तातडीने भाऊ आलेला पाहून वासंतीताईंच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. भाऊ, भावजयीला भेटताच क्षणभर का होईना मनावरचं ओझं हलकं झालं.

“काय झालं ताई? एवढे तातडीने कशाला बोलवून घेतले?” गप्पाटप्पा, चहापाणी झाल्यावर दत्ताभाऊंनी मुद्द्याला हात घातला.

वासंतीताईंनी डोळे अलगद टिपत, स्वतःला सावरत घडलेला सगळा प्रकार सांगितला.

“इतक्या दुतोंडी असतील त्या दोघी असं बिलकुल वाटत नाही हो! प्रणवच्या वाढदिवसाला आलो होते तेव्हा सारखं तुमच्या पुढे मागे करत होत्या. पद्मा तर तुमची खूपच बडदास्त ठेवते असा आव आणत होती.” लता अविश्वासाने म्हणाली.

“तोंडावर गोड बोलायचं आणि मागून कारस्थान रचायचं स्वभावच आहे पद्माचा. तिच्या दुतोंडी वागणुकीमुळे माझ्या सुद्धा कित्येक दिवस हे सगळं लक्षात आलं नाही.” वासंतीताई शांतपणे म्हणाल्या.

“कपिल, कैवल्य काही बोलत नाहीत?” दत्ताभाऊंनी चिडून विचारले.

“त्यांच्या मताला किंमत नाही. बायकोपुढे दोघांचे काही चालत नाही.” वासंतीताईंनी हळूच डोळ्यांना पदर लावला.

“मुलांना आई नकोशी झाली असेल पण मला माझी बहीण जड नाही. तू सरळ माझ्याबरोबर घरी चल. तिकडेच रहा.” दत्ताभाऊ म्हणाले.

“बरोबर बोलतात हे. तुम्ही खरंच आमच्या बरोबर चला.” लता आर्जवी स्वरात बोलली.

“खरंच नको.” वासंतीताई काकुळतीला येऊन बोलल्या. चार दिवस हक्काने माहेरपणाला जाणं वेगळं आणि कायमचं वेगळं. कायमचं भावाकडे जाऊन रहाणं ताईंच्या स्वाभिमानी मनाला पटत नव्हतं.

“एकदा चौघांशी बोलून बघूया. समोरासमोर सोक्षमोक्ष लावूया. चांगले खडसावू सगळ्यांना. सासूला इकडून तिकडे नाचवायला लाज कशी वाटत नाही त्यांना?” लता दातओठ खात बोलली.

“काही उपयोग होणार नाही. चार दिवसांनी परत येरे माझ्या मागल्या.” वासंतीताई आपल्या कांगावखोर सुनांना चांगलं ओळखून होत्या.

“मग काय इथे अशीच अपमान सहन करत खितपत रहाणार.” दत्ताभाऊंनी रागाने मुठी आवळल्या.

क्षणभर खोलीत शांतता पसरली. वासंतीताईंनी पर्समधून रोख रक्कम आणि कर्जतच्या घरच्या किल्ल्या काढल्या. भावाच्या हातात किल्ल्या आणि पैसे देत “मी कर्जतला रहायला जाणार आहे. तळमजल्यावर मी राहीन, वरच्या दोन खोल्या भाड्याने देऊ. वर्ष, दीड वर्ष घर बंद आहे, भाऊ तू माणसं लावून साफसफाई करून घे. वरच्या खोल्यात रंगरंगोटी, डागडूजी, आवश्यक त्या सोयीसुविधा करून घे.” वासंतीताई ठामपणे म्हणाल्या.

“अगं तू तिकडे एकटी कशी राहणार?” दत्ताभाऊंच्या स्वरातून काळजी डोकावत होती.

“म्हणूनच तर जागा भाड्याने द्यायची. चार पैसे
मिळतील शिवाय सोबतही होईल. तसे शेजारीपाजारीही चांगले आहेत. एक आवाज दिला तर दहा जण जमा होतील. उलट इकडेच कैवल्यच्या अठराव्या मजल्यावर मला काही झाले तर कोणाला थांगपत्ता सुद्धा लागणार नाही.”

“मी सगळी व्यवस्था करतो, चांगली फॅमिली बघूनच जागा भाड्याने देऊ. तू परत एकदा विचार कर.” भाऊंना ताईने अजूनही आपल्या घरी यावे असेच वाटत होते.

“जोपर्यंत स्वतः बनवून खाऊ शकते. हात पाय धडधाकट आहेत तोपर्यंत तिकडे राहते. ज्या दिवशी होणार त्या वेळी नक्की तुला हाक मारीन.” वासंतीताईंनी भावाला आश्वस्त केलं.

दत्ताभाऊंना आपल्या स्वाभिमानी बहिणीचा अभिमान वाटला, त्यांनी तिचा निर्णय मान्य केला.

मुलांच्या संसारात ‘असून अडचण नसून खोळंबा’ ठरण्यापेक्षा, वासंतीताईंनी स्वतःच्या हक्काच्या मठीत राहणं पसंत केलं.

ज्यांनी आपली उचलबांगडी करण्याचा प्रयत्न केला त्यांना चोख उत्तर दिलं.

उरलेलं आयुष्य कसं जगायचं, याचा निर्णय स्वतः घेतला आणि आपला स्वाभिमान जपला.

समाप्त.

©® मृणाल महेश शिंपी.


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →