लघुकथा लेखन स्पर्धा एप्रिल २०२६
विषय: अज्ञानातील सुख.
शीर्षक: दोन वर्ष.
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
" याच्यावर काहीच उपाय नाहीये का किंवा दुसरा काही मार्ग नाहीच आहे का ?" काकुळतीला येत त्याने विचारले.
" खरंच, यावर आता काहीच मार्ग नाही. आता जे काही आहे ते देवाच्या हातात आहे." असे म्हणून डॉक्टरांनी तिथे जमलेल्या सर्वांना सत्य परिस्थितीशी अवगत केले.
" आजी, तुम्हाला आता कसं वाटत आहे?" नर्सने विचारले.
" मला काय धाड भरली गं ! मी नीट आहे. हे तुमचे डॉक्टर नको. उगाच काही ना काहीतरी सांगत बसतात आणि उगाच आमचे हॉस्पिटलचे बिल वाढवत बसतात." तोंडाने फटकळ असणाऱ्या सरू आजी म्हणाल्या.
" काय रे ? काय सांगितलं डॉक्टरने ?" आपल्या नातवाला विचारले.
"काही नाही. सर्व ठीक आहे." त्याने स्मितहास्य करून सांगितले.
" बघ, मी म्हणाले होते ना. काही नसणार. उगाच आपले हे लोक काहीतरी सांगत बसलेत. यांना काही आजकाल रोगी सापडत नाहीत वाटतं, म्हणून जे कोणी येतात त्यांच्याकडूनच पैसे लाटायचे काम चालू असते." पुन्हा आजीने आपली बडबड सुरू केली.
" आजी, जरा शांत बस. असे बोलायचं नाही. एकदा आपण सर्व तपासण्या केल्या, त्यात काही निघाले नाही तर तर चांगलेच आहे ना आणि आजकाल जसा शिक्षणाचा खर्च वाढला आहे, तसा उपचारांचा सुद्धा खर्च वाढलेला आहे. एक आपल्या मनातची शांती म्हणूनच आपण सर्व चाचण्या करून बघितल्या ना." त्यांचा नातू म्हणाला.
" बरं बाबा, तू म्हणशील तस .डॉक्टर लोक चांगले आहेत." आजीने माघार घेतली.
आजीबाईंचीर वयानुसार प्रकृती बिघडत असायची तसेच तसेच त्यांची दुखण्यावर औषध सुद्धा चालू असायचे.
लवकरच गणेश चतुर्थी सण येणार होता, त्यामुळे सर्वांनी यावेळेस हा सण गावीच साजरा करण्याचे ठरवले.
आधी तर कोणाला सुट्टी मिळते की नाही, हा प्रश्न होता परंतु काही करून या वेळेस गणपती घरीच साजरा करायचा असं सर्वांनी विचार केला होता.
आधी तर कोणाला सुट्टी मिळते की नाही, हा प्रश्न होता परंतु काही करून या वेळेस गणपती घरीच साजरा करायचा असं सर्वांनी विचार केला होता.
दोन दिवस आधी येऊन सुना आणि नातसुनांनी आजींना सर्व गोष्टी विचारल्या होत्या.
मात्र आजीला खरंच वाटलं नव्हतं की सगळे येऊन गणपती यावर्षी इथे साजरा करतील, म्हणून
"आले बाबा एकदाचे आमचे सर्व लोक, इथे गौरी- गणपती सण साजरा करायला." आजीबाई जो माणूस दिसेल किंवा घरी येईल त्यांना सांगायच्या.
एक दिवस घरातील स्त्रियांनी नऊवारी साडी आणि सर्व पुरुष लोकांनी सदरा आणि धोतर नेसायचे असे ठरवले आणि आजीबाईंना सुद्धा छान तयार होऊन त्यासोबत फोटो काढायचा असा विचार केला होता.
आजीने सुद्धा त्यांच्याकडे असणारे ज्ञान सर्वांना सांगत त्याही तयार झाल्या होत्या. तसेच रात्री त्यांच्या काळातल्या गोष्टी सुद्धा भरभरून सांगत होत्या.
गौरीला साडी नेसवताना आजीकडे असणारे दागिने त्यांनी घालण्यासाठी दिले होते. तेव्हा त्यांच्याकडे कोणते आणि किती दागिने आहेत, हे सर्वांना समजले होते.
असेच दीड वर्ष निघून गेले होते. आजी प्रत्येक सण आपली मुलं आणि नातवंडे यांच्या सोबत साजरा करत होती, म्हणून चांगले वाटत होते. तसेच आता त्या सुद्धा सेल्फी आणि रिल्स काय असतात याबद्दल त्यांना माहिती झाली होती.
मोकळ्या वेळामध्ये त्या त्यांना दिलेल्या फोनवर काढलेले फोटो आणि व्हिडिओ बघून त्या दिवसाच्या आठवणी जाग्या करत होत्या.
" पप्पा, आजोबांचा एखादा असा फोटो आहे का ?" आजोबांचा एखादा फोटो आहे का सारंगने विचारले होते.
" मला शोधावं लागेल रे, कारण बाबांना फोटो काढायला बिल्कुल आवडत नसायचे." असे म्हणून त्यांनी त्यावर सारंगला सांगितले.
त्यादिवशी बारा वाजले तरी झोपायला तयार नव्हत्या. गुढीपाडव्यानिमित्त मस्त पुरणपोळी वगैरे सर्व खाऊन दिवसभर काम केल्याने सर्वांना झोप आली होती, परंतु आजी मात्र त्यांच्या जुन्या गोष्टीत सांगत होत्या.
" आजी, झोप आत. तुला सुद्धा झोप आली आहे बघ." सारंगने सांगितले.
" हो, हो झोपा. जरा आज मला सांगण्यासारखं वाटतंय तर तुम्ही मघापासून झोपा झोपा लावले आहे. पुन्हा काय माहिती वेळ भेटेल की नाही सांगायला." आजी म्हणाल्या.
आजीचे असे म्हणणे ऐकल्यावर सर्वजण शांत झाले.
" अरे, मी असाच म्हणाली. पुन्हा मला आठवते की नाही म्हणून मी म्हणाले. " लगेच शांत काय झालाय चला झोपा लवकर आजी हसत म्हणाल्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजले तरीसुद्धा त्यांच्या खोलीतून आजीबाई बाहेर आल्या नव्हत्या.
" आजी आता काय अजून एवढा वेळ कशी काय झोपलीस ?", असे म्हणून सारंग खोलीमध्ये गेला आणि त्याने कालच आजोबांचा मिळालेला फोटो वरून नवीन तंत्रज्ञान वापरून आजीचा आणि आजोबांचा एक फोटो एकत्र केलेला होता आणि त्याची फ्रेम बनवलेली होती. तीच आजींच्या हातामध्ये झोपताना त्याने बघितली.
' आजीची तब्येत तर ठीक आहे ना ?" असे म्हणत तो आजीजवळ गेला.
आजींच्या डोक्याला हात लावला तर आजींचे कपाळ थंड पडले होते, नंतर त्याने गळ्याला हात लावला, तेव्हा सुद्धा ते थंड पडले. त्याने आजीच्या हाताची नस तपासली आणि बंद झालेली नस हाताला लागल्याने सारंगने आजी म्हणून जोरात टाहो फोडला.
सर्वजण धावतच आजीच्या खोलीमध्ये आले.
" आजी, तू सोडून जाशील असं मला वाटलंच नव्हते." असे म्हणून सारंग जोरजोरात रडत होता.
सर्वांना आधीच माहिती होते की, दोन वर्षेच आजींकडे आहेत. कानाचा कर्करोग झाल्यामुळे आजी ह्या काही दिवसांच्या सोबती होत्या आणि त्यांचं वय जास्त असल्यामुळे त्या आजारावर उपचार सुद्धा करणे कठीण होते, म्हणून जेवढे दिवस जगतील तेवढे औषधांवरच त्यांचे जगणे आहे, हअसे डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले होते.
आजींना जर रोगाबद्दल समजले असते तर दोन वर्षाच्या आधीच त्या कदाचित घाबरून किंवा मृत्यूच्या भयाने हे जग सोडून गेल्या असत्या ,म्हणून सगळ्यांनी त्यांना न सांगण्याचे ठरवले होते.
दोन वर्षे सर्वजण आळीपाळीने आजी सोबत राहायचे. आजींना सुद्धा खूप छान वाटायचे त्यांना आवडणाऱ्या गोष्टी जसे की एकत्र सण साजरे करणे असो की, पारंपारिक पोशाख घालणं, हे सर्व त्यांनी आजीच्या इच्छेखातर आणि मनापासून केले होते. त्यामुळे आजी दीड वर्ष तर आजारी पडल्या नव्हत्या, पण गेले सहा महिने हळूहळू त्यांची खंगत जाणारे शरीर सर्वांना दिसत होते, परंतु त्यातही आजी सकाळचे उठून बाहेर चालायला जाणे तसेच थोडेफार तरी गावांमध्ये फिरून येणे हे त्यांचे चालूच असायचे.
आजींना त्यांच्या झालेल्या आजाराबद्दल माहीत नव्हतं. अज्ञानातच सुख असते, असे समजून त्यांना कोणी सांगितले नव्हते आणि जेवढे दिवस त्या आपल्या सोबत असतील तेवढे दिवस त्यांनी भरभरून जगावे, हेच सर्वांना वाटत असल्यामुळे सर्वांनी त्यांच्यापासून ही गोष्ट लपवली होती आणि आता त्यांच्या हातामध्ये असणारी त्यांची आणि आजोबांचा फोटो असलेली फ्रेम बघून आजी समाधानी झाल्या, असे सर्वांना वाटून त्यांनी प्राण सोडला असेल, असं सर्वांना वाटत होते.
" आजी, जरी तुम्ही इथे आमच्यासोबत नाहीत, तरी सुद्धा तुमच्या आठवणी आमच्या सोबत राहणार आहेत आणि आम्हाला जमेल तसे आम्ही गावी येऊन सण साजरे नक्कीच करणार आणि हो दरवर्षी या भिंतीवर प्रत्येक वर्षीचा एकेक ग्रुप फोटो आम्ही नक्कीच लावू." असे सारंगने म्हणताच त्यांच्या पिंडाला कावळा पटकन शिवला होता.
समाप्त.
© विद्या कुंभार.
कथा आवडल्यास लाईक करून तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा.
(सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.)
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
