Login

तुम देना साथ मेरा--भाग 13

दीर्घकथा
तुम देना साथ मेरा--भाग 13

( मागील भागात--

"ग्रेट, एकदम परफेक्ट. अगदी कसलेल्या, मुरलेल्या कलाकारालाच हे सुचू शकतं. म्हणजे आभा...तू...तू आणि चित्र? काहीच कळत नाही आहे मला. तुला रंगांचं एवढं ज्ञान? घे हा ब्रश आणि तूच पूर्ण कर हे चित्र, " असं म्हणून राजने तिच्या हातातला ट्रे घेतला आणि ब्रश तिला दिला.

ब्रश हातात येताच तिचा हात एकदम थरथरू लागला आणि ती हमसून हमसून रडायला लागली.

ब्रश टाकून देऊन रडत रडत ती घरात पळतच गेली.

काहीच न समजून राज सुद्धा "आभा, आभा" आवाज देत तिच्यामागे गेला.)

आता पुढे---

"पप्पा, नको मला ते रंग, सांगा तुम्ही राजला," आभा आबासाहेबांच्या गळ्यात पडून हमसून रडत होती.

तिच्या मागोमाग आलेल्या राजला काही उमजेना.

"आबासाहेब, मी...मला माफ करा. पण आभाने रंगांचं इतकं परफेक्ट कॉम्बिनेशन सांगितलं की मी नकळत तिच्या हातात ब्रश दिला. जाणूनबुजून मला तिला दुखवायचं नव्हतं."

तिच्या अश्या अचानक रडण्याने राज अस्वस्थ झाला होता.
काय झाले आभाला हे समजून घेण्याचा तो प्रयत्न करू लागला.

"आभा, आय एम रिअली व्हेरी सॉरी. नकळतपणे मी काही असं बोललो बहुदा की तुझं मन दुखावलं. पण मला खरंच नाही कळत आहे काही, नेमकं काय झालंय? ," इति राज.

आभा काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. मुसमुसुन रडतच होती.

तेव्हा आबासाहेब म्हणाले,
"तू सॉरी नको म्हणू राज, खरंतर मीच तुला धन्यवाद म्हणेन . आभा मोकळी होणं गरजेचं होतं.
खूप दिवसांचं दुःख मनात साठवून ठेवलं होतं माझ्या पोरीनं. रडू दे तिला मनसोक्त," आबासाहेबांचे डोळे सुद्धा पाणावले होते.

थोडावेळ तसाच शांततेत गेला.
आभा आता बऱ्यापैकी शांत झाली होती. तिच्या रडण्याचा भर ओसरला होता.

"तू विचार करत असशील ना, काय झालंय नेमकं? चल, माझ्यासोबत ," आबासाहेब राजला म्हणाले.

"पप्पा, मी सुद्धा येणार तुमच्यासोबत," आभा म्हणाली.

तिला माहिती होते की आबासाहेब राजला कुठे घेऊन जाणार आहेत.
रडून रडून तिचे डोळे सुजले होते.

"तू घरीच आराम कर बेटा. राज आता आपल्या घरातलाच एक सदस्य आहे. त्याला मी घेऊन जातो. तू थोडी शांत हो, आराम कर," आबासाहेब आभाला समजावत होते.

पण आभाने त्यांचे ऐकले नाही.

आभा सुद्धा त्यांच्या सोबत निघाली. आबासाहेबांनी गाडी त्यांच्या गावातल्या वाड्यासमोर उभी केली.

राजला घेऊन आबासाहेब वाड्यात गेले.
बंद असला तरी स्वच्छ होता वाडा.
मोजकेच सामान चादरींमध्ये व्यवस्थित झाकून ठेवलेले होते.
मधली ओसरी पार करून एका प्रशस्त खोलीत ते शिरले. चादरांचे आडोसे दूर करताच राज थक्क झाला.

एकाहून एक सरस, अप्रतिम अशी चित्रे!

नजर हटत नव्हती त्याची.

" मार्व्हलस, सुंदर, जस्ट व्वाव," बघता बघता तो उद्गारत होता.

कलेतील सौंदर्य तो अनुभवत होता.

बघता बघता ते रंग सुद्धा बरेच वेगळे आहेत हे त्याला जाणवलं आणि अचानक खाली चित्रकाराच्या नावाकडे लक्ष गेलं तर ते होतं" आभा!"

खूप सारे प्रश्न राजच्या मनात पिंगा घालू लागले.

"आभा इतकी उत्तम कलाकार आहे आबासाहेब, मग रंगापासून फारकत का घेतली तिने. काय झालं असं नेमकं?,"
चकित होऊन आभाकडे बघत असतानाच तो आबासाहेबांना विचारू लागला.

"तेच सांगणार आहोत आज आम्ही. त्यासाठीच इथे घेऊन आलोय तुला.
जखमेवरची खिपली निघाली आणि जखम भळभळायला लागलीय तेव्हा आता मलमपट्टी करावीच लागेल ना.
सांगतो तुला सगळंकाही," आबासाहेब म्हणाले.

"थांबा पप्पा, मीच सांगते," आभा बरीच सावरली होती.

" जखम माझी आहे , त्याची काळजी पण मलाच घ्यावी लागेल ना, ...मी सांगते तुला राज."

आभा कणखरपणे बोलली. ती नॉर्मल होत आहे बघून आबासाहेबही सुखावले.

आभा सांगू लागली.

"हो, होते मी 'रंगवेडी'! अगदी लहानपणापासून मला रंगांचं प्रचंड वेड. आणि आई-पप्पांनी सतत मला प्रोत्साहन दिलं, माझं वेड त्यांनी मनापासून जोपासलं.
अगदी शास्त्रोक्त पद्धतीने मी माझ्या गुरूंकडे बरीच वर्षे चित्रकला शिकली, त्यात पारंगत झाली.
पण मला वेड होतं निसर्गातल्या रंगांचं.
तू जसा निसर्गात रमतोस ना तसंच मलादेखील निसर्ग-रंगात रंगायला आवडायचं " आभाचं बोलणं राज अगदी एकाग्रतेने ऐकत होता.

"इतकं आवडायचं मला की विविध फुलांपासून नैसर्गिक रंग बनवायचे कसे ते सुद्धा शिकली मी.
त्या फुलांच्या रंगांचं जबरदस्त आकर्षण होतं मला.
म्हणून तर सगळे मला रंगवेडी म्हणायचे, खरंच वेडीच होती मी. शक्यतो फुलांचे रंग वापरून चित्र पूर्ण करायची.
तुला या माझ्या चित्रांत जे वेगळेपण जाणवलं ना ते हेच, नैसर्गिक रंगांचं."

"ओहह ग्रेट," नकळत राज उद्गारला.

"पण या रंगांनीच घात केला," बोलता बोलता भावनिक होऊन आभा हुंदके देऊन पुन्हा रडू लागली.


क्रमशः


© डॉ समृद्धी रायबागकर, अमरावती

#अष्टपैलूस्पर्धा2025


"सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा."
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →