तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 98
अनघा आणि आरतीने सगळं आवरून घेतलं होतं. घरात थोडी शांतता पसरली होती. सकाळपासून सगळे कामात होते, त्यामुळे थोडा थकवा जाणवत होता.
“आजोबा, चला जरा आराम करा… सकाळपासून तुम्ही माझ्या मागेच फिरत आहात,” अनघा हळूच म्हणाली.
“अगं, मी पण तुला मदत करतो… कसला आराम?” आजोबा हसत म्हणाले.
“नाही, तुम्ही आता आराम करा. मी आणि आई उरलेलं सामान लावतो. मी पण थोडा वेळ झोप घेते… दोन वाजता पुन्हा कामाला लागायचं आहे,” अनघा प्रेमाने म्हणाली.
अनघाच्या बोलण्यावर आजोबा तयार झाले. ते हळूहळू त्यांच्या रूममध्ये गेले. अनघा आणि आरतीही थोडावेळ आवरून आपल्या-आपल्या रूममध्ये गेले. थकव्यामुळे दोघांनाही पटकन झोप लागली.
...
तिकडे ऑफिसमध्ये मोनिका तिच्या कामात गुंतलेली होती. पण तिचं लक्ष सतत घड्याळाकडे जात होतं. तिला एक महत्त्वाची फाईल पूर्ण करायची होती आणि त्यावर रोनकची साइन खूप गरजेची होती.
ती फाईल घेऊन रोनकच्या केबिनमध्ये गेली, पण आत बघितलं तर रोनक कोणाशीतरी गप्पा मारण्यात इतका गुंतला होता की कामाकडे त्याचं लक्षच नव्हतं.
मोनिका थोडावेळ थांबली… पण त्याचं लक्ष नाही हे पाहून ती शांतपणे बाहेर आली.
“काय करू आता?” ती मनात विचार करू लागली.
तिला फाईल लवकर हवी होती, म्हणून तिने ऑफिस बॉयला बोलावलं.
“ही फाईल सरांकडे घेऊन जा… साइन घेऊन ये. मला अर्जंट काम आहे,” ती म्हणाली.
ऑफिस बॉय फाईल घेऊन रोनकच्या केबिनमध्ये गेला.
“सर, ही फाईल मोनिका मॅडमने दिली आहे… साइन हवी आहे,” तो म्हणाला.
रोनकने फाईलकडे पाहिलं, पण लगेच साइन करण्याऐवजी तो हलकंसं हसला.
“फाईल ठेव… आणि मोनिका मॅडमला सांग, सरांनी बोलावलं आहे,” रोनक म्हणाला.
“ठीक आहे सर,” ऑफिस बॉय म्हणाला आणि बाहेर आला.
तो सरळ मोनिकाकडे गेला.
“मॅडम, सरांनी तुम्हाला बोलावलं आहे,” तो म्हणाला आणि निघून गेला.
“मॅडम, सरांनी तुम्हाला बोलावलं आहे,” तो म्हणाला आणि निघून गेला.
रोनकच्या केबिनकडे निघाली.
मोनिका रोनकच्या केबिनमध्ये गेली.
रोनक खुर्चीत आरामात बसला होता, तिच्याकडे बघून हलकंसं हसला.
“इतकं काम आहे का की मला भेटायलाही वेळ नाही?” रोनक म्हणाला.
मोनिका त्याच्याकडे बघत हसली, “काम आहे म्हणून तर फाईल पाठवली. साइन करा लवकर, मला खूप काम आहे.”
“अग आधी बस ना,” रोनक म्हणाला.
मोनिका त्याच्या समोर बसली.
रोनकने फाईल उघडली, पण साइन करण्याऐवजी तो मोनिकाकडेच बघत राहिला.
“काय बघताय?” मोनिका म्हणाली.
“आज खूप सुंदर दिसत आहेस… सकाळपासून डोळ्यासमोरून जातच नाहीस,” रोनक हसत म्हणाला.
मोनिका थोडी लाजली, “आता फ्लर्टिंग बंद करा आणि साइन करा.”
रोनक हसला, “मला काम करायला देणार नाहीस का?”
“मीच म्हणते आहे काम करा,” मोनिका म्हणाली.
रोनकने शेवटी फाईलवर साइन केली आणि तिच्याकडे दिली.
मोनिका उठली, फाईल घेतली.
जाणार इतक्यात रोनकने तिचा हात हलकासा पकडला.
“इतक्यात जात आहेस?” तो म्हणाला.
मोनिका थोडी हसली, “ऑफिस आहे हे… घरी नाही.”
रोनकने हात सोडला, “ठीक आहे… पण संध्याकाळी लवकर भेट.”
“बघू,” मोनिका म्हणाली आणि केबिनमधून बाहेर आली.
ती बाहेर येऊन तिच्या जागेवर बसली, पण तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल होती.
आत रोनकही तिच्याकडे बघत हसत होता… काम समोर होतं, पण मन मात्र दोघांचं एकमेकांकडेच होतं.
अनिकेत आज खूप बिझी होता. ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड ताण होता, त्यामुळे त्याला अनघाला कॉल करायचा होता तरी वेळच मिळत नव्हता. तो सतत काम लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता, पण काही ना काही अडथळे येत होते आणि त्याचे काम पूर्ण होत नव्हते.
इकडे अनघाने थोडा वेळ आराम केला. उठल्यानंतर ती फ्रेश झाली आणि किचनमध्ये गेली. तिने बॅग्स उघडल्या आणि सामान कसे लावायचे याचा विचार करत एक एक वस्तू बाहेर काढू लागली. तिच्या हालचालींच्या आवाजाने आजोबांची झोप उघडली. ते हळूहळू चालत तिच्याकडे आले.
“अनघा, एकटीच का लावते आहेस? मला आवाज दिला असता ना,” आजोबा म्हणाले.
अनघा हसत म्हणाली, “आजोबा, मी पण आताच उठले आहे. अजून फक्त बॅग उघडते आहे.”
“ठीक आहे, तू काढत राहा, मी फ्रेश होऊन येतो,” आजोबा म्हणाले आणि परत गेले.
अनघा पुन्हा कामाला लागणार इतक्यात दरवाज्याची बेल वाजली. ती पटकन दरवाजा उघडायला गेली तर समोर आरती आणि संजय उभे होते.
“अनघा, मी येणारच होते. आणि तू तर लगेच कामालाही लागलीस,” आरती म्हणाल्या.
“आई, अगं आताच बॅग उघडली आहे. मी थोडा वेळ झोपले होते, आत्ताच उठले,” अनघा म्हणाली.
“चल, आपण सगळं लावू,” आरती म्हणाल्या.
त्यानंतर अनघा आणि आरती दोघी किचनमध्ये कामाला लागल्या. संजय त्यांना मदत करत होते, भांडी, डब्बे देत होते, आणि त्या दोघी व्यवस्थित सगळं लावत होत्या. हळूहळू किचन नीट सेट होऊ लागलं. काम करता करता वेळ कसा गेला कळलंच नाही आणि संध्याकाळ झाली.
थोड्यावेळाने शुभम चहा घेऊन आला. त्यानेच चहा बनवला होता. सगळ्यांनी एकत्र बसून चहा घेतला, थोड्या गप्पा मारल्या.
तेवढ्यात अशोकही अनिकेतच्या घरी येण्यासाठी निघाले होते. त्यांना खूप आधीपासून यायचं होतं, पण त्यांना वाटलं अनघा झोपली असेल म्हणून ते थांबले होते. शेवटी तेही आले. शुभमने त्यांनाही चहा दिला. सगळे एकत्र बसले आणि घरात पुन्हा एकदा गप्पांचा रंग रंगला.
मोनिका ऑफिसमधून घरी आली तेव्हा तिने पाहिलं, ललिता एकट्याच शांतपणे बसलेल्या होत्या.
“आई, तू एकटीच बसली आहेस? बाबा अनिकेत दादाकडे गेले का?” मोनिका विचारत म्हणाली.
ललिता थोड्या नाराज स्वरात म्हणाल्या, “तुझ्या बाबांना आता दुसरं काही कामच नाही उरलं. सकाळ झाली की अनिकेतकडे, संध्याकाळ झाली की पुन्हा अनिकेतकडे.”
मोनिका हलकंसं हसत म्हणाली, “मग जाऊ दे ना त्यांना… तू पण चल ना माझ्यासोबत.”
“मी नाही जाणार,” ललिता सरळ म्हणाल्या.
“ठीक आहे, मग आधी मस्त चहा कर… मी पण जाईन नंतर,” मोनिका थोड्या खोडकरपणे म्हणाली.
ललिता तिच्याकडे बघत म्हणाल्या, “असं काय आहे तिथे? आपल्या घरात मन लागत नाही का तुम्हाला?”
मोनिका शांतपणे म्हणाली, “तिथे शांती आहे… समाधान आहे…”
ललिता काहीच बोलल्या नाहीत. त्या उठल्या आणि किचनमध्ये चहा करायला गेल्या.
मोनिका तिच्या रूममध्ये गेली, फ्रेश झाली, कपडे बदलले आणि बाहेर आली. तोपर्यंत ललिताने चहा तयार करून आणला होता. दोघी शांतपणे बसल्या आणि चहा घेत होत्या… घरात एक वेगळीच शांतता पसरली होती.
अनिकेतचे काम शेवटी पूर्ण झाले होते. दिवसभर तो इतका बिझी होता की अनघाला एक साधा कॉलसुद्धा करू शकला नव्हता. पण आता काम संपल्यावर त्याला घरी जायची घाई झाली होती. त्याने आपली बॅग उचलली आणि ऑफिसमधून निघून थेट घरी पोहचला.
घरी आल्यावर त्याने पाहिले, सगळे एकत्र बसून गप्पा मारत होते. घरात छान वातावरण होतं. तोही थोडावेळ सगळ्यांमध्ये बसला, दोन-चार गोष्टी बोलला आणि मग फ्रेश होण्यासाठी रूममध्ये गेला.
इतक्यात मोनिका देखील तिथे आली होती. अनिकेत फ्रेश होऊन बाहेर आला, तेव्हा त्याने हसतच मोनिकाला चिडवायला सुरुवात केली.
“मोनिका, ऑफिसला खरंच कामासाठी जाते ना तू… की रोनकच्या केबिनमध्येच जास्त वेळ असतेस?” अनिकेत मिश्किलपणे म्हणाला.
“ऑफिसला कामासाठीच जाते मी… केबिनमध्ये का जाईन मी?” मोनिका थोडी नाराज होत म्हणाली.
अनिकेत लगेच म्हणाला, “अगं, तू कामासाठीच जाते… पण रोनकने बोलवलं तर लगेच जातेस ना केबिनमध्ये?”
“दादा, गप ना… किती चिडवतोस!” मोनिका लाजतच म्हणाली आणि पटकन अनघाच्या मागे जाऊन लपली.
हे पाहून सगळेच हसायला लागले. अनघाही हसत होती आणि मोनिकाला आपल्या मागे लपवून घेत होती. घरात पुन्हा एकदा हसण्याचा आवाज घुमत होता. मोनिकाचा लाजरा चेहरा पाहून सगळ्यांना अजूनच मजा येत होती आणि सगळे तिला अजून चिडवायला लागले.
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा