Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 90

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
अनघा किचनमध्ये जाऊन जेवण आणायला सुरुवात केली.

तेवढ्यात मोनिका उठली.
“मी पण येते मदतीला,” ती म्हणाली.

तृप्तीही हसत म्हणाली,
“मी पण येते… एकटी अनघा किती काम करणार?”

तिघीही किचनमध्ये गेल्या.

अनघा भाजी आणि पोळ्या काढत होती.
मोनिका प्लेट्स ठेवत होती… आणि तृप्ती वाट्या आणि चमचे आणत होती.

तृप्ती हसत म्हणाली,
“अनघा, तू खूप छान तयारी केली आहेस.”

अनघा हसली.
“अगं, काही खास नाही… सगळं बाहेरून मागवलं आहे.”

मोनिका म्हणाली,
“काय फरक पडतो… एकत्र बसून जेवण करणं महत्त्वाचं.”

थोड्याच वेळात सगळं जेवण टेबलवर मांडलं गेलं.

अनघा बाहेर येऊन म्हणाली,
“चला… सगळे जेवायला या.”

सगळे टेबलवर जेवायला बसले.

आजोबा, अनिकेत, विक्रम, तृप्ती, मोनिका आणि अनघा
सगळे मिळून जेवत होते.

जेवताना मस्त गप्पा चालू होत्या.

विक्रम अनिकेतला म्हणाला,
“आज ऑफिसमध्ये खूप काम होतं.”

अनिकेत हसत म्हणाला,
“इथेही आज खूप काम झालं… घर बघायला पण जावं लागलं.”

“खरंच?” तृप्ती उत्सुकतेने म्हणाली.

अनघा हसत म्हणाली,
“हो… उद्या मला पण घर बघायला घेऊन जाणार आहे.”

आजोबा लगेच म्हणाले,
“मग आम्हालाही सांगायचं कसं आहे ते घर.”

सगळे हसत हसत गप्पा मारत जेवण करत होते.


जेवताना विक्रम म्हणाला,
“अनिकेत, बरं झालं तू घर बघायला सुरुवात केलीस. मी तर आज त्याबद्दल बोलणारच होतो.”

अनिकेत हसत म्हणाला,
“हो, मला ते समजलं होतं. म्हणूनच मी आधीच घर बघायला सुरुवात केली. मलाही मोठं घर बघायचं होतं. आता आई-बाबा पण वयस्कर होतील… सगळ्यांना जागा लागेल.”

विक्रम समाधानाने म्हणाला,
“खूप विचार करून निर्णय घेतला आहेस.”

जेवण झाल्यावर अनघा आत गेली आणि तिने तृप्ती आणि विक्रमसाठी आणलेलं गिफ्ट आणलं.

तिने तृप्ती हळद-कुंकू लावलं आणि विक्रमला कुंकू लावले गिफ्ट त्यांच्या हातात दिलं.

तृप्ती आणि विक्रम म्हणत होते,
“अगं, कशाला हे सगळं?”

पण अनिकेत आणि अनघाने आग्रहाने ते घ्यायला लावलं.

“नाही नाही… जाताना घेऊन जा,” अनिकेत हसत म्हणाला.

तृप्ती आणि विक्रम दोघांनीही आजोबांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला.

थोड्यावेळाने ते घरी निघून गेले.


---

ते गेल्यावर अनिकेत म्हणाला,
“मला वाटलं होतंच विक्रम घराबद्दल विचारेल. पण आपण आधीच घर बघायला सुरुवात केली, ते ऐकून त्याच्या चेहऱ्यावर किती आनंद आला.”

थोडा थांबून तो म्हणाला,
“त्याने खूप मेहनतीने हे घर घेतलं आहे. त्याचे बाबा गेले तेव्हा… त्याची आई ते घर सोडायला तयार नव्हती. म्हणून तो या घरात आला नाही.”

अनघा शांतपणे ऐकत होती.

मग ती म्हणाली,
“उद्या आपण ते घर बघायला जाऊ. तुला तर आवडलं आहे. खरंच चांगलं असेल तर फायनल करूया. मोनिकाच्या लग्नाच्या वेळी आपण त्या नवीन घरात असू.”

अनिकेत हसत म्हणाला,
“बरोबर आहे. उद्या ऑफिस सुटल्यानंतर मी तुला घ्यायला येतो.”

“हो चालेल,” अनघा म्हणाली.

मग तिने मोनिकाकडे पाहिलं.

“मोनिका, तू काहीच बोलत नाही आहेस. खूप शांत आहेस… काही झालं आहे का?” अनघा म्हणाली

आजोबाही म्हणाले,
“मीही बोलणार होतो. मोनिका आली आहे, तरी घरात किती शांतता आहे.”

अनिकेतही मोनिकाकडे पाहू लागला.

मोनिका थोडं हसत म्हणाली,
“आज ऑफिसमध्ये खूप काम होतं… डोकं खूप दुखतंय. थोडा आराम केला की बरं वाटेल. मी झोपायला जाऊ का?”

“हो, जा… आराम कर,” अनिकेत म्हणाला.

मोनिका रूममध्ये झोपायला निघून गेली.


---

अनिकेत, अनघा आणि आजोबा थोडावेळ अजून गप्पा मारत बसले.

मग आजोबा उठले आणि म्हणाले,
“चला, मी निघतो. गुडनाईट.”

“गुडनाईट आजोबा,” अनिकेत आणि अनघा म्हणाले.

आजोबा त्यांच्या घरी गेले.

थोड्यावेळाने अनिकेत आणि अनघाही झोपायला गेले, कारण
उद्या सकाळी लवकर उठायचं होतं.


“आज तुम्ही कुठे गेला होता? काही बोललाच नाहीत,” ललिता म्हणाल्या.

अशोक शांतपणे म्हणाले,
“अनिकेतने एक घर बघितलं आहे. तेच बघायला गेलो होतो. त्याचा कॉल आला होता.”

ललिता थोड्या आश्चर्याने म्हणाल्या,
“अनिकेत घर घेत आहे? तो राहतो त्या घराचं काय झालं मग?”

अशोक म्हणाले,
“ते घर विक्रमचं आहे. आता त्याचं लग्न झालं आहे… त्याला मोठं घर लागेल ना. म्हणून अनिकेत नवीन घर बघत आहे. जे घर बघितलं आहे ना… ते खूप छान आहे. उद्या अनघा बघेल आणि मग फायनल करतील.”

ललिता लगेच नाराज होऊन म्हणाल्या,
“ती काय महाराणी आहे का? ती सांगेल आणि अनिकेत फायनल करेल?”

अशोक थोड्या गंभीर आवाजात म्हणाले,
“अनघा पण लोन काढणार आहे. ते दोघांचं घर आहे. तू पैसे देणार आहेस का? संजयने काही पैसे दिले आहेत… अनघाचेही पैसे त्या घरात लागणार आहेत. ती त्या घरात राहणार आहे ना.”

ते पुढे म्हणाले,
“तू काही बोलायचं नाही. आपण एक रुपयाही देत नाही आहोत. माझ्याकडे जे थोडे पैसे आहेत… त्यातून मोनिकाचं लग्न करायचं आहे. आपण अनिकेतचं लग्न केलं नाही… ते पैसे त्याला द्यायला पाहिजे होते.”

अशोक थोडं थांबले आणि म्हणाले,
“तू अनघासोबत जसं वागली आहेस ना… आपण म्हातारे झाल्यावर ती तुला वाईट वागणूक देणार नाही, याची खात्री आहे का? आपल्याला आपली सोय करून ठेवायला नको का?”

ललिता म्हणाल्या,
“अनिकेत आहे ना आपल्यासाठी… तो बघेल आपल्याला.”

हे ऐकून अशोक हलकेच हसले.

“अनिकेत आपला मुलगा आहे… पण तो घरातून गेला ते त्यांच्या आनंदासाठी. तुला अनघा कधी आवडलीच नाही. तिच्यात काय कमी आहे?”

ते पुढे म्हणाले,
“तू आजारी होतीस तेव्हा सगळं तिनेच केलं. तिचं स्वतःचं बाळ गेलं… तरी तिला कोणी विचारलंस का? ते बाळ फक्त तिचं नव्हतं… आपल्या अनिकेतचंही होतं.”

अशोकच्या आवाजात आता वेदना होती.

“तुला गरज असेल तेव्हा अनिकेत तुझ्यासाठी असेल… असा विचार करतेस तू. पण शेवटी आपल्याला सांभाळणारी अनघाच असेल. मोनिकाचं लग्न आहे… तेव्हा सगळी कामं तीच पुढे होऊन करेल.”

ललिता काहीच बोलल्या नाहीत.

त्या शांतपणे उठल्या आणि झोपायला निघून गेल्या.

अशोक त्यांच्याकडे पाहत राहिले.

मनात म्हणाले,
“कितीही बोललो… कितीही समजावलं… तरी काही फरक पडणार नाही.”

मग तेही शांतपणे झोपायला गेले.

......

“अनिकेतला घर आवडलं का?” आरतीने विचारलं.

संजय म्हणाले,
“हो, त्याला घर खूप आवडलं आहे. उद्या अनघा बघून घेईल… मग कदाचित ते बुक करतील.”

आरती थोड्या काळजीने म्हणाल्या,
“पण त्याच्याकडे एवढे पैसे आहेत का?”

संजय शांतपणे म्हणाले,
“अनघा आणि अनिकेत दोघे लोन घेणार आहेत. आपण दिलेले पैसेही आहेत. अनिकेत म्हणत होता त्याच्याकडे थोडी सेव्हिंग पण आहे.”

थोडा वेळ थांबून संजय म्हणाले,
“खरं सांगू… आपण अनघाचं ऐकलं पाहिजे होतं. आपणच त्यांचं लग्न लावून दिलं पाहिजे होतं.”

तेवढ्यात शुभम तिथे उभा होता.
तो थोडा संकोचून म्हणाला,

“बाबा… मी एक बोलू का? सॉरी… मी तुमचं बोलणं ऐकलं.”

संजय हसत म्हणाले,
“अरे बोल ना… तुझ्या डोक्यात काय आलं?”

शुभम उत्साहाने म्हणाला,
“ताई आणि जीजुच्या लग्नाचा वाढदिवस येतो आहे ना… तर आपण त्यांना सरप्राईज देऊया.”

संजय आणि आरती दोघेही त्याच्याकडे पाहू लागले.

शुभम पुढे म्हणाला,
“आपण त्यांचं लग्न पुन्हा सगळ्यांसमोर करून देऊया. म्हणजे त्यांना खूप आनंद होईल.”

हे ऐकून संजयच्या चेहऱ्यावर आनंद आला.

“अरे वा! ही तर खूप छान कल्पना आहे,” ते म्हणाले.
“आपण नक्की करू.”

आरतीही हसल्या.

मग तिघेही बसून त्या सरप्राईजबद्दल चर्चा करू लागले
कसं करायचं, कधी करायचं… आणि कोणाला बोलवायचं.



क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all