तुझं तू, माझं मी ! भाग १
©®आरती पाटील - घाडीगांवकर
" रेश्मा, आजकालच्या जमान्यात खरंतर कोणी कोणाचं नसतं. मग अगदी सख्खे भाऊ, बहीण असले तरी सर्व आपापलंच बघतात. त्यामुळे आपण सुद्धा थोडं प्रॅक्टिकल वागूयात. " राकेश स्वयंपाक घरात काम करत असलेल्या रेश्माला म्हणजेच आपल्या बायकोला बोलत होता.
" तुला नक्की काय बोलायचं आहे राकेश ? स्पष्ट बोल. " रेश्माने भाजी कापत विचारलं.
" म्हणजे यापुढे सर्व अर्ध अर्ध. तू सुद्धा चांगली कमावतेस. त्यामुळे या घरातले खर्च अर्धे अर्धे करूयात. शिवाय तू तूझ्या माहेरच्यांचं बघ. मी माझ्या घरच्यांचं बघेन. त्यामुळे बरेच वाद आणि त्रास टळेल. मी खूप प्रॅक्टिकल विचार करून बोलतोय. " राकेश म्हणाला तसा रेश्माचा भाजी कापणारा हात थांबला.
रेश्माला लगेच लक्षात आलं की राकेश असं का बोलतोय. रेश्माची आई चार दिवसांपूर्वी रेश्मा आणि राकेशकडे आली होती. डोळ्यांचं ऑपरेशन होत त्यांच्या. दोन दिवस रेश्माला महत्वाची मिटिंग असल्यामुळे तिने राकेशला आईला हॉस्पिटलला सोडायला सांगितलं. तिथेच रेश्माची शाळेतली मैत्रीण नर्स म्हणून काम करत होती. त्यामुळे ती रेश्मा नसताना सुद्धा सर्व सांभाळून घेत होती. राकेशने रेश्माच्या आईला हॉस्पिटल मध्ये सोडलं, मात्र सुरुवातीला 10 हजार डिपॉजिट भराव लागलं. ते राकेशला भरावे लागले. त्या व्यतिरिक्त काही नव्हतं. तरी राकेशने या स्वार्थी पद्धतीचा अवलंब केला.
रेश्मा आज आई घऱी गेल्यावर राकेशला पैसे परत करणारच होती. कारण एरवी ऑफिस, घर, हॉस्पिटल यामुळे तिला वेळ मिळाला नव्हता. पण आता जे राकेश बोलला त्यामुळे रेश्मा दुखावली गेली. ती विचार करू लागली की,' याचे आई - वडील, लग्न झालेल्या बहिणी कधीही येतात. माझ्याकडून सेवा करून घेतात. यांच्यासाठी मी किती खर्च करते ? नणंद तर हे पाहिजे म्हणजे पाहिजेच म्हणून अडून बसते. लहान मुलांपेक्षा वरचढ वागतात. त्यांचे नखरे, हॉटेलिंग इतर सर्व मी खर्च करते. राकेशला माहित सुद्धा नसतं घरात नेमका किती खर्च होतो. '
रेश्मा काही उलट प्रश्न न करता म्हणाली, " ठीक आहे. चालेल. पण अगदी सर्वच तुझं तू, माझं मी. फक्त खर्च नाही तर जबाबदारी सुद्धा. "
राकेशला वाटलं होत की आधी रेश्मा भांडेल, वाद करेल. पण रेश्माने लगेच होकार दिला. त्यामुळे राकेशला आनंद सोबतच संशय सुद्धा आला. पण आनंद जास्त होता. त्यामुळे त्याने जास्त विचार न करता, " हो हो चालेल. " असं म्हणाला.
दुसऱ्या दिवशी ऑफिस मधून आल्यावर रेश्माने त्यांच्या समोर एक अग्रीमेंट ठेवला. राकेश ते पाहून थोडा चकित झाला.
" हे काय आहे रेश्मा ? अग्रीमेंटची काय गरज आहे ? " राकेश.
" अरे काल तूच म्हणालास ना ? की 'आजच्या जगात कोणी कोणाचं नसतं. अगदी सख्खे भाऊ, बहीण असले तरी सर्व आपापलंच बघतात. त्यामुळे आपण सुद्धा थोडं प्रॅक्टिकल वागूयात. ' म्हणून मग मी सुद्धा प्रॅक्टिकल वागतेय. कायदेशीर अग्रीमेंट करते. तू नीट वाचून सही कर म्हणजे झालं. " असं बोलून रेश्मा स्वयंपाक घरात गेली आणि चहा ठेवला.
राकेश अग्रीमेंट वाचू लागला.
* तुझं तू, माझं मी.
* घराचा सर्व खर्च अर्धा अर्धा असेल.
* घराची सर्व जबाबदारी सुद्धा अर्धी अर्धी असेल.
* एकमेकांच्या पगार आणि इन्व्हेस्टमेंटवर मेन्शन केलं असेल तरच हक्क असेल नाहीतर नाही.
* घरी येणारे पाहुणे, नातेवाईक सुद्धा ज्याचे असतील, ज्याची जबाबदारी असेल. ( खर्च आणि जबाबदारी सकट )
* तुझं तू, माझं मी.
* घराचा सर्व खर्च अर्धा अर्धा असेल.
* घराची सर्व जबाबदारी सुद्धा अर्धी अर्धी असेल.
* एकमेकांच्या पगार आणि इन्व्हेस्टमेंटवर मेन्शन केलं असेल तरच हक्क असेल नाहीतर नाही.
* घरी येणारे पाहुणे, नातेवाईक सुद्धा ज्याचे असतील, ज्याची जबाबदारी असेल. ( खर्च आणि जबाबदारी सकट )
हे सर्व वाचुन राकेश खुश झाला. कारण त्याला वाटत होत की सर्व घर तोच चालवतोय. त्याने बाहेर चहाचे कप घेऊन येणाऱ्या रेशमाकडे हसून पाहिलं आणि पटकन सही केली.
रेश्माने पेपर घेतला आणि आपल्याकडे ठेवला. आपला फोन काढून राकेशला बारा हजार पाठवले.
" बारा हजार कसले ? " राकेशने खोट्या निरागसतेने विचारलं.
" अरे आईच्या वेळी तू दहा हजार भरले होतेस ना? तेच आणि आईला दोन दिवस सोडायला सुद्धा गेलास. त्यामुळे पेट्रोल सुद्धा लागलं असेलच. त्यामुळे दोन हजार अजून दिले. खरंतर मी देणारच होते पण आईच्या आजारपणात आणि ऑफिस - घर यात वेळ नाही मिळाला. " रेश्मा शांतपणे म्हणाली.
" नसते दिले तऱी चाललं असत. " राकेश निरागस चेहरा ठेवत म्हणाला.
" अरे असं कसं ? आपलं ठरलं ना ? तुझं तू, माझं मी. आता हे फोल्लो करायचं. आधीपासून केलं असत तर अजून बरं झालं असतं. असो देर आये, दुरुस्त आये. " रेश्मा चहाचा घोट घेत म्हणाली. त्यावर राकेशने मान डोलावली.
चहा पिऊन झाल्यावर रेश्मा म्हणाली, " जा आता चहाची भांडी घासून ठेव. "
हे ऐकताच राकेश चमकून रेश्माकडे पाहू लागला.
क्रमश :
रेश्मा नक्की काय काय तुझं तू आणि माझं मी मध्ये ठेवणार आहे ? हे नक्की वाचा.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
