तू ती चूक करू नकोस भाग १
“प्रिया, किती उशीर केलास. मी वेड्यासारखी तुझी इथे वाट बघतोय.” आकाश खूप चिडला होता.
दोन्ही हाताने कान धरून प्रिया म्हणाली,
“सॉरी आकू. उद्यापासून घरी जाणार आहे तर रेक्टर मॅडम कडून लिव्ह अप्रुव्ह करून घेत होते. आईशी बोलणं झाल्याशिवाय त्या सही करत नव्हत्या. त्यात आईचा फोन लागत नव्हता.”
“प्रियू, तुला माहीत आहे ना. मला तुझी किती आठवण येत होती. तुला बघितल्याशिवाय मला करमत नाही ग.” आकाश प्रियाचा हात हातात घेऊन म्हणाला.
“आपण इथे अस उभं राहून बोलणार आहोत का? सगळेजण आपल्याकडे बघत आहेत.” प्रिया आजूबाजूला बघत म्हणाली.
“तू स्कार्फ बांधल आहे, तरी तुला कसली भीती आहे. आपल्या नेहमीच्या जागेवर जाऊयात. गाडीवर बस.” प्रिया आकाशच्या मागे बसली. आकाशने गाडी जोरात रेस केली. आकाश तिला एका टेकडीवर घेऊन गेला.
दोघेजण गाडीवरून उतरले व एका झाडाखाली दोन दगड होते. तिथे ते जाऊन बसले. टेकडी पूर्ण सुनसान होती. तिथे फक्त आकाश व प्रियाच होते.
“मी आपल्यासाठी खायला बर्गर, फ्रेंच फ्राईझ व कोल्ड्रिंक्स घेऊन आलो आहे.” आकाशने सगळं एकेक करून आपल्या सॅक मधून बाहेर काढलं.
“मस्त! मला हे सरप्राईज आवडलं.” दोघांनी एकमेकाना भरवत खाण्याचा आनंद घेतला.
आकाश व प्रिया एकमेकांच्या शेजारी चिटकून बसले होते. आकाशने प्रियाचा हात हातात घेतला होता, तर प्रियाने त्याच्या खांद्यावर मान टेकवली होती.
“प्रियू, तू घरून पुन्हा कधी येशील?” आकाशने विचारले.
“रिझल्ट लागल्याशिवाय येता येणार नाही.” प्रियाने उत्तर दिले.
“प्रियू, मी तुला बघितल्या शिवाय इतक्या दिवस कसा राहू? तू इकडे आली नाहीस, तर मी तुला भेटायला गावाला येईल बघ.” आकाश.
“आकू, ये राजा. मलाही तुझी आठवण येईलच ना, पण काही ठोस कारण असल्याशिवाय मला पुण्याला येऊ देणार नाहीत. थोड्या तर दिवसांची गोष्ट आहे.” प्रिया त्याच्या केसात हात फिरवत म्हणाली.
“प्रियू, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आपण लग्न करूयात ना म्हणजे आपण कायम सोबत राहू.” आकाश.
“लग्न इतक्यात कस करता येईल. अजून तुझ्याकडे नोकरी नाहीये. माझा रिझल्ट लागल्याशिवाय मला नोकरी मिळणार नाही. शिवाय घरच्यांची लग्नाला परवानगी मिळायला हवी, त्यासाठी तुला व्यवस्थित नोकरी पाहिजे.” प्रिया त्याला सत्य परिस्थिती समजावून सांगत होती.
“प्रियू, नोकरीच काय आज ना उद्या मिळेलच ना. माझे पप्पा मला चांगला पॉकेटमनी देतात. मी कितीही कमावलं तरी आपल्या वेगळ्या जातीमुळे आपल्या घरचे लग्नाला तयार होणार नाहीत. आपल्याला पळून जाऊन लग्न करावं लागणार आहे.” आकाश म्हणाला.
“आपण त्यांना कनविन्स करण्याचा प्रयत्न तर करू शकतो ना. तू नोकरी मिळवण्यासाठी धडपड तर कर. बिनानोकरीच्या मुलासोबत लग्न करून दयायला माझे आईवडील कधीच तयार होणार नाहीत.” प्रिया.
“माझ्यावर प्रेम करताना मला नोकरी आहे की नाही हे तू का बघितलं नाहीस. मला बाकी काहीच ठाऊक नाही. तुझा रिझल्ट लागल्यावर तू जेव्हा पुण्याला येशील तेव्हा आपण कोर्ट मॅरेज करूयात. निदान ते झाल्यावर तू मला जवळ तरी येऊ देशील. घरी कधी कस आणि काय सांगायचं ते तेंव्हाच तेव्हा बघू. माझं हे ठरलं आहे. बस झाला हा दुरावा. तू साधं मला किस सुद्धा घेऊ देत नाहीस. एका मिठी शिवाय मला काहीच मिळालं नाहीये.
माझा मित्र बघ. अफेअर करून फक्त महिना झाला असेल, तरी ते दोघे हॉटेलमध्ये रूम घेऊन सगळं करत आहेत. चार दिवसांसाठी ते दोघेजण लोणावळ्याला गेले आहेत. किती मजा करत असतील ते दोघे.
आपल्याला दोन वर्षे झालीत. तू सती सावित्री होऊन बसली आहेस. प्रिया, इतकही संस्कारी होण्याची काही गरज नव्हती.” आकाश चिडला होता.
आकाशच्या तोंडून हे सगळं ऐकून प्रियाला थोडा धक्काच बसला होता. आता या सगळ्यावर बोलून फायदा नाही हे प्रियाला समजले होते.
“आकाश, आपण आता निघुयात. या सगळ्यावर माझा रिझल्ट लागल्यावर आपण बोलूयात.” प्रिया उठून बाईक जवळ जाऊन उभी राहिली. आकाशला तिचा रागच आला होता, म्हणून त्यानेही लगेच बाईक स्टार्ट केली.
परतीच्या प्रवासात ते एकमेकांशी काहीच बोलले नाहीत. आकाशने तिला होस्टेलच्या जवळ सोडले व तो निघून गेला.
