जलदलेखन स्पर्धा फेब्रुवारी 2026
विषय- दुसरी बाजू.
तू आहेस म्हणून..
भाग-३(अंतिम भाग.)
भाग-३(अंतिम भाग.)
“खरंच सांगतोय. तू होतीस म्हणून आपलं घर जोडून राहिलं आणि आताही तू आहेस म्हणून आपल्या घरातील घरपण टिकून आहे. पण आताशा वाटायला लागलं की आईसोबत इतकी वर्ष काढल्याने तिची सावली तुझ्यावर पडलीय बहूतेक.”
“म्हणजे?” त्यांच्या शेवटच्या वाक्याचा अर्थ न उमजून त्यांनी विचारले
“म्हणजे इतक्यात तुझे वागणे काहीसे आईसारखे होऊ लागलेय.” ते म्हणाले आणि संध्याताई क्षणभर गप्प बसल्या.
“संध्या मी तुला चुकीचे ठरवत नाहीये किंवा तू मुद्दाम असे वागतेस असेही नाहीये.” सुरेशराव बायकोच्या हातावर हात ठेवून म्हणाले.
“आई असताना तू तिचे मन कधीच मोडले नाहीस. कायम तिला हवे तेच केलेस. त्याचा परिणाम म्हणून मी तुला गृहीत धरू लागलो. त्यावेळीही तू कसली तक्रार केली नाहीस. मुलांची लग्न झाली तेव्हाही तू सगळं किती छान सांभाळलंस आणि मीनल सून म्हणून आली तेव्हाही तिच्याशी छान जुळवून घेतलंस.
खरंच सांगतो मला ना हेवा वाटायचा गं तुमच्या दोघींच्या नात्याचा. म्हणजे मित्रमंडळीत असताना त्यांच्या घरातील सासूसूनेचा वाद ऐकला की आपल्या घरी असं काही नाही याचा आनंद व्हायचा आणि हे सगळं तू आहेस म्हणून शक्य होतेय याची जाणीवही व्हायची.
तुला आठवते ना? अगदी आता आता आठवा महिना लागेपर्यंत तू मीनलची किती काळजी घेत होतीस? तिला जपत होतीस. ती आपल्या घरात आल्यापासून ऑफिसला जाताना तिचा डबा वगैरे तूच करायचीस. तिही कायम म्हणायची की आई आहेत म्हणून माझं सगळं निभावतंय. म्हटलं तर ती घरी असताना तुला मदत करायची हेही खरं आहे म्हणा. तुझी आवड जपायची ती. तुझ्यासाठी म्हणून काय काय आणायची माहितीये ना?”
“हम्म. मी ही जी साडी नेसलेय ती सुद्धा तिनेच तर आवडीने माझ्यासाठी आणली. तिच्या पहिल्या पगारातील मला घेतलेले हे पाहिले गिफ्ट.” आता संध्याताईंचा स्वर भारावला होता.
“जेवढं प्रेम तू तिच्यावर करतेस तेवढंच तिचंही प्रेम तुझ्यावर आहे की.” सुरेशराव मंद हसले.
“एवढं सगळं तुमच्यात छान चाललं असताना आता का घडी विस्कटतेय ते कळत नाहीये. म्हणजे बाळंतपणानंतर ती परत आली आणि काही दिवसात तुझी चिडचिड वाढली. आईचं आठवली गं मला. अनिलच्या जन्मानंतर तिही अशीच चिडचिड करायची. तो रडला की नुसता रागराग करायची. आजी झाल्यावर बाळाची ओढ वाटायला हवी, मग हा राग कुठून येतो?” त्यांनी प्रश्न केला.
“बाळाचा राग नाही हो. त्याचा का राग करेन मी? पण इतकी वर्ष सगळं नेटनेटकं बघितल्यावर आता असा पसारा दिसला की तिळपापड होतो इतकंच. त्यात ती मीनल सुद्धा उलट बोलते मग वाईट वाटणारच ना?” मनातील सल बोलून दाखवत त्या म्हणाल्या.
“मग दुर्लक्ष कर की त्या पसाऱ्याकडे. अगं बाळ घरात आलं की घर कसं भरल्यासारखं भासतं आणि त्याच्यामुळे वाढलेल्या पसाऱ्याने घराला घरपण येतं. ते घरपण अनुभव की. राहिला प्रश्न मीनल उलट बोलली त्याचा तर हे लक्षात घे की मीनल म्हणजे तू नाहीयेस. तू आईला कधीच उलट बोलली नाहीस. कर्तव्य म्हणून तिचं शेवटपर्यंत सगळं केलंस पण तिच्या स्वभावामुळे तिच्याबद्दल फारशी माया तुला कधी वाटली नाही. तू आणि मीनल मधील नातं असं कोडगं होऊ देऊ नकोस. पोरगी समूजदार आहे, प्रेमळ आहे नुकतीच आई झालेली आहे. तीला तुझी गरज आहे. तिला जरा समजून घे.”
“हो चुकलंच माझं. पण तिनेही मला समजून घ्यायला नको का?” त्या डोळ्यात आलेले अश्रू पुसत म्हणाल्या.
“राणीसरकार प्रत्येक बाजूची दुसरी बाजू असतेच की आणि कोण म्हणतंय की सुनबाई तुम्हाला समजून घेत नाही ते?” ते म्हणाले त्यावर संध्याताईनी प्रश्नार्थक त्यांच्याकडे पाहिले.
“आजचं हे नाटकाचं तिकीट तिनेच तर मला बुक करून दिलं. मी बाहेरून आलो तेव्हा मला म्हणते कशी, बाबा हल्ली आईंची चिडचिड फार वाढलीये. कदाचित मेनोपोज मुळे हार्मोनल इंबॅलन्स होतोय म्हणून असं होतंय. आज मस्त त्यांना बाहेर घेऊन जा. त्यांच्या आवडीचे नाटक बघा. हॉटेलिंग करा आणि उद्याची डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन ठेवलीये तेव्हा उद्या चेकअपला घेऊन जा.”
“हे सगळं मीनल म्हणाली? बघा काल आलेल्या पोरीला तरी माझी काळजी आहे. तुम्हाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही.” आईस्क्रीमची वाटी बाजूला सरकवत त्या म्हणाल्या.
“सॉरी. नाही कळत गं मला. पण आता लक्षात ठेवेन.” ते कान पकडून म्हणाले आणि संध्याताई खुदकन हसल्या.
“हम्म! आता आठवणीने बटरस्कॉच फ्लेवरचा केक ऑर्डर करा.” त्या म्हणाल्या.
“अगं आताच तर आईस्क्रीम खाल्लंस? आता परत केक?”
“खरंच तुमच्या ना काहीच लक्षात नसतं. मीनलचा आवडीचा फ्लेवर आहे. तिच्यासाठी घ्यायला सांगतेय.”
“पण आज तिचा वाढदिवस कुठे आहे?”
“नाहीये हो. पण आमच्या नव्या नात्याची सुरुवात तर आहे. तिच्या आवडीचा केक तिला भरवून मला तिची माफी मागायची आहे.” त्या म्हणाल्या आणि सुरेशराव मनमोकळे हसले.
सासू आणि सूनेच्या नात्याची ही दुसरी बाजू त्यांना सुखावून गेली होती.
-समाप्त.
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
(साहित्यचोरी गुन्हा आहे.)
________
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
(साहित्यचोरी गुन्हा आहे.)
________
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा