Login

तू आहेस म्हणून.. भाग-२

वाचा सासू सूनेच्या नात्याची गोष्ट
जलदलेखन स्पर्धा फेब्रुवारी 2026

विषय-दुसरी बाजू.

तू आहेस म्हणून..
भाग-२

“झोपलात का राणीसरकार?”

नवऱ्याचा आवाज कानावर येताच त्यांनी डोळ्यातील आसवे टिपून घेतली आणि मान वळवून त्या निपचित पडून राहिल्या. तसेही मघाच्या प्रसंगानंतर त्यांना त्यांचा राग आलाच होता.

“झोपेचे कितीही नाटक केलेत तरी असे अवेळी तुम्ही झोपत नाहीत हे मला ठाऊक नाही का? आता उठा आणि खास तुमच्यासाठी हा स्पेशल चहा केलाय तो जमला की नाही ते सांगा.” त्यांच्या हळूवार बोलाने इतकावेळ आलेला राग कुठल्या कुठे पळून गेला आणि संध्याताई उठून बसल्या.

“आज सूर्य कुठून उगवला म्हणायचा? चक्क तुम्ही माझ्यासाठी चहा केलात?” लटक्या रागाने त्यांनी विचारले.

“सूर्य उगवायचे काय घेऊन बसलीस? तो तर मावळतीला झुकलाय. चहा जमलाय की नाही ते सांग.”

“उत्तम झालाय.” एक घोट घेत त्या म्हणाल्या.

“तुझेच बघून शिकलोय. बरं चहा झाला की ही साडी नेसून तयार व्हा आणि हो हा गजरा आणलाय तोही माळा बरं.” सुरेशराव मिश्किलीने म्हणाले.

“अगंबाई हे काय नवीन? आता कुठे जायचे आहे?” त्यांच्या डोळ्यात आश्चर्य.

बाहेर जायचंय. मी आपल्या दोघांसाठी नाटकाची तिकीट बुक केलीत. नाटक झालं की बाहेरूनच जेवण करून येऊया.”

“काहीही काय? यावेळी कुठे बाहेर जाताय? ही स्वयंपाकाची वेळ आहे. तसेही बाळ मीनलला त्रास देत असतो. तिच्या एकटीने सगळं करणं जमेल का?” दुपारी सुनेवर आगपाखड करणाऱ्या त्यांना आता तिची काळजी वाटत होती.

“करेल गं. एक दिवस करेल की ऍडजस्ट आणि अनिल सातपर्यंत येतोच की. तो सांभाळेल बाळाला. आता उगाच वेळ वाया घालवू नकोस. लवकर आवर.”

सुरेशरावांचे ऐकून हो-नाही करत त्या तयार झाल्या. गर्द निळ्या रंगाची साडी त्यांच्या गोऱ्या कांतीवर शोभून दिसत होती. वेणीत गजरा माळून त्यांनी आरश्यात एकवार स्वतःकडे पाहिले आणि स्वतःचे रूप बघून त्यांच्या ओठावर स्मित उमटले.

“मीनल आम्ही बाहेर जाऊन येतो गं.” सासऱ्यांचा आवाज ऐकून मीनल बाहेर आली.

“आई सुंदर दिसताय हो.” संध्याकडे बघून तिने त्यांची मनापासून तारीफ केली. उत्तरादाखल त्यांनी केवळ स्मित केले.

“काय घेणारेस? तुझ्या आवडीची पनीर मटर ऑर्डर करायची का?” नाटकानंतर जेवायला आलेल्या सुरेशरावांनी मेनुकार्ड त्यांच्यासमोर ठेवत विचारले.

“हो चालेल की.”

इतक्या दिवसानंतर हे असे दोघांनी एकत्र बाहेर पडणे, आवडीचे नाटक आणि त्यानंतर त्यांच्या पसंतीचे जेवण.. संध्याताई जाम खुश झाल्या होत्या.

“हा एवढा आटापिटा कश्यासाठी?” जेवणानंतर आईस्क्रीम चाखत असलेल्या त्यांनी शेवटी सुरेशरावांना प्रश्न विचारलाच.

“तुझ्याचसाठी.” ते हसून म्हणाले.

“मला कळेल असे सांगाल?”

“दुपारची तुझी चिडचिड बघून वाटलं तुला अश्या ब्रेकची गरज आहे म्हणून मग ठरवलं..” ते स्पष्टीकरण देत म्हणाले.

“अच्छा, म्हणजे मीच चुकीची असे वाटतेय ना तुम्हाला?” त्या चटकन म्हणाल्या.

“छे गं. तू चुकीची नाहीयेस. तू तर तुझ्या जागी अगदी योग्य आहेस. खरं तर संध्या मी तुला कधीच सांगू शकलो नाही; पण आज सांगतोय की तू होतीस म्हणून माझ्या आईच्या फटकळ स्वभावापुढे टिकून राहिलीस. दुसरी कुणी मुलगी असती तर कदाचित ती केव्हाच घर सोडून गेली असती.” ते बोलू लागले आणि संध्याताई त्यांच्याकडे चमकून पाहू लागल्या.

“खरंच सांगतोय. तू होतीस म्हणून आपलं घर जोडून राहिलं आणि आताही तू आहेस म्हणून आपल्या घरातील घरपण टिकून आहे. पण आताशा वाटायला लागलं की आईसोबत इतकी वर्ष काढल्याने तिची सावली तुझ्यावर पडलीय बहूतेक.”

“म्हणजे?” त्यांच्या शेवटच्या वाक्याचा अर्थ न उमजून त्यांनी विचारले.

काय अर्थ असेल सुरेशरावांच्या बोलण्याचा वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
-©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
________


0

🎭 Series Post

View all