Login

तू आहेस म्हणून.. भाग-१

गोष्ट सासुसुनेच्या नात्याची
जलदलेखन स्पर्धा फेब्रुवारी 2026

विषय-दुसरी बाजू.

तू आहेस म्हणून..
भाग-१

“किती गं हा पसारा? आम्ही एकहाती संसार केला तरी सगळं कसं नीटनेटकं असायचं. आता तुझ्या दिमतीला बाई आहे, लागले तर मीही मदत करते तरी घर कसं अस्वच्छ असतं गं?”

वाटीमध्ये बाळासाठी खिचडी घेत असताना मीनलवर संध्याने शब्दांचा वर्षाव करताच ती काहीशी बावरली.

“बाळाला भरवलं की आवरते मी.” शक्य तेवढ्या सौम्य स्वरात ती म्हणाली आणि वाटी घेऊन जायला निघाली.

“हम्म. आता बाळाचं निमित्त बरं मिळालंय. त्याला भरवण्याच्या नावाखाली अर्धातास असाच जाणार. त्यानंतर मग त्याला शी-सू येणार. मग काय तर झोपायची वेळ होणार. मग उठले की पून्हा काही खायची वेळ होणार. म्हणजे हे आवरणे राहिले बाजूला उलट त्यात आणखी पसाऱ्याची भरच पडणार.” त्या नाक मुरडत म्हणाल्या.

“आई आता मी हे सगळं मुद्दाम करतेय का? घरात लहान बाळ असलं की ओघाने हे सगळं येणारच ना? पण तो झोपल्यावर मी आवरते की सगळं.”

“म्हणजे आमच्यावर जणू उपकारच करतेस. आम्हाला काही लेकरं झाली नाहीत? आम्ही नाही हो आमच्या सासूशी असं उलटं बोललो. उलट बाळाला रडत सोडून आपली कामं करायचो.” त्यांच्या तोंडाचा पट्टा थांबायला नाव घेत नव्हते.

“आई तुम्ही ग्रेट आहात. मी तेवढी नाहीये. असं माझ्या बाळाला रडत सोडून मी काहीच करू शकणार नाही. सॉरी.” मीनल शेवटचं बोलली आणि बाळाकडे निघून गेली.

“बघितलंत? आम्हाला काय बिशाद होती का असं सासूशी मोठ्या आवाजात बोलण्याची? ही काल आलेली मुलगी मात्र कायम माझा उध्दार करीत असते.” संध्याने चरफडत त्यांच्या यजमानाकडे पाहिले.

“जाऊ दे गं. काय उगाच लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतेस? घर म्हटलं की हे चालायचंच. मी येतो जरा बाहेर जाऊन.” सुरेशराव म्हणाले आणि पायात चपला सरकावून बाहेर पडले.

“हे नेहमीचंच यांचं. यांची आई मला बोलायची तेव्हा कधी तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते आणि आज सून बोलतेय तर मात्र मलाच गप्प करायला बसतात.” स्वतःशी बडबडत त्या आपल्या बेडरूममध्ये जाऊन आडव्या झाल्या.

खरं तर अशी अवेळी झोपायची त्यांना सवय नव्हतीच कधी. आजही कुठे डोळा लागणार होता? उलट मनात साचलेले मळभ डोळ्यातून बाहेर बरसायला सुरुवात झाली होती.

त्यांना त्यांचे सुरुवातीचे दिवस आठवू लागले. लग्नानंतर आत्ता आत्तापर्यंत घरात सासूची सत्ता होती. त्यांच्या मार्जिनुसार घर चालायचे. कुणाला त्याचे काही वाटत नसले तरी सर्वात जास्त त्रास तर त्यांनाच होत होता. भारल्या घरातील सगळ्यांचे करणे, नवऱ्याची मर्जी सांभाळणे आणि मुलांकडे लक्ष देणे.. स्वतःसाठी कधी वेळच उरायचा नाही.

पाच वर्षांपूर्वी सासूबाई गेल्या आणि खऱ्या अर्थाने त्यांना त्यांच्या मनासारखा संसार मिळाला. यावेळी मुलं मोठी झाली होती. त्यांना त्यांचे आयुष्य होते. तीन वर्षांपूर्वी मुलीचे लग्न झाले आणि आता वर्षभरापूर्वी मीनल सून म्हणून घरी आली.

सुरुवातीचे दिवस बरे गेले. मात्र घरात बाळाचे आगमन होताच संध्याताईंची चिडचिड व्हायला लागली. इतकी वर्ष नाही म्हटले तरी सासूबाईंच्या दबावात राहिलेल्या त्यांच्यात आपोआप त्यांचे गुण उतरले होते आणि म्हणूनच मग असा पसारा किंवा अव्यवस्थिपणा दिसला की आगपाखड होत होती.

“झोपलात का राणीसरकार?”

नवऱ्याचा आवाज कानावर येताच त्यांनी डोळ्यातील आसवे टिपून घेतली आणि मान वळवून त्या निपचित पडून राहिल्या. तसेही मघाच्या प्रसंगानंतर त्यांना त्यांचा राग आलाच होता.

संध्याताईंचा राग मावळेल का? की त्याचा भडका उडेल? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
-©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)


0

🎭 Series Post

View all