Login

सत्य कुणाला वाचायचंच नाही....

एक लेखक..... प्रगल्भ वाचकांच्या प्रतीक्षेत

मैत्रीण - "काय गं, छान कथा लिहायचीस... बंद का केलंस लिखाण अचानक?"

ती - "अगं काय फायदा वेळ वाया घालवून?"

मैत्रीण - आश्चर्याने, "वेळ वाया घालवून? अगं तुझा आवडता छंद आहे ना. मग अचानक वेळ वाया कसा जाऊ लागला....?"

ती - "छंद आहे नाही, होता. आता नको वाटतं."

मैत्रीण - "अगं पण किती छान लिहितेस तू. सामाजिक विषयांवर किती भरभरून लिहितेस. तुझं लेखन सामाजिक, वैचारिक आणि तितकंच इंटरेस्टिंग असतं. मुद्दे सुद्धा किती तन्मयतेने मांडतेस. असं वाटतं वाचतच राहावं."

ती - "कुणालाच अशा कथांमध्ये रुची नाहीये. सासू - सुनेच्या भांडणात, नणंद भावजयच्या हेवेदाव्यात, जावा - जावा मधल्या आदळआपटीतच जास्त इंटरेस्ट आहे आजकाल. सासू कशी मुद्दामून त्रास देते, सून कशी उलट उत्तरं देते, नणंद कशी भावजयीच्या चांगल्या चांगल्या वस्तूंवर डोळा ठेवते, भावजय कशी तिला धडा शिकवते, मोठी जाऊ कशी धाकटीला मुद्दाम कामं देते, किंवा धाकटी कशी जॉब ला जाते म्हणून कामातून अंग काढून घेते.... हे आणि असलेच विषय गाजतात. नवरा बायकोतली भांडणं, नवऱ्याचं बायकोला सपोर्ट न करणं, बायकोचं त्याला धडा शिकवणं..... एवढेच विषय राहिलेत का आता!!! काय बोध घ्यायचा यातून? कुरघोडी करण्याचा???"

मैत्रीण - "अगं हो हो हो..... किती तो राग! त्यांनीही सामाजिक विषयच तर मांडलेत ना."

ती - "त्याला सामाजिक नाही, कौटुंबिक विषय म्हणतात. आणि त्यातही नकारात्मक बाजूच जास्त दाखवली जाते. 10 पैकी ९ कथा याच धर्तीवर असतात. एखादीच कथा सकारात्मक बाजू दाखवते. गुण्यागोविंदाने नांदणारं गोकुळासारखं भरलेलं घर रेखाटते."

मैत्रीण - "मग तुझं काय म्हणणं आहे? त्यांनी कौटुंबिक विषय घ्यायलाच नकोत का?"

ती - "घ्यावेत ना. ती बाजूसुद्धा समाजासमोर मांडायला हवीच. पण किती तो ओव्हरडोस! आणि माझी तक्रार लेखकांबद्दल नाहीच मुळी."

मैत्रीण - "मग?"

ती - "माझी तक्रार तर वाचकांबद्दल आहे. ते कधी प्रगल्भ होणार? आता भरमसाठ ऍप आलेत.... सगळ्या भाषेत लिखाणाचे. त्यातलं एक ऍप आहे. त्यावर प्रेमकथा जरा जास्तच हिट आहेत. बरं त्या वास्तववादी असाव्यात ना! पण नाही..... एकाच धर्तीवर सरसकट सगळ्या! नायक नेहमीचं टॉल, डार्क, हँडसम, नेहमीच ५ फूट ६इंच किंवा त्यापेक्षा उंचच! त्यातही जिमला जाऊन कमवलेले कसदार, पिळदार, सिक्स पॅक वाली बॉडी. हेच आणि असंच त्या हिरोचं वर्णन. आणि मग हिरोईन अगदी साधी भोळी, गरीब गाय, लांब काळेभोर केस, बिचारी.... वगैरे वगैरे..... सामान्य मुलामुलींनी जायचं कुठं? त्यांनी प्रेम करायचं नाहीच का? प्रेमात पडायचं नाही का? बरं, हिरो म्हणजे मोठा बिसनेसमन! आणि सतराशे साठ कंपन्यांचा मालक! पण सतत आपला तिच्या मागे मागे! तिच्यावर अगदी बारीक लक्ष, त्याचा खास बॉडीगार्ड, विश्वासू, हायटेक सेक्युरिटी सिस्टिम... इत्यादी इत्यादी.....इथे आपल्या नवऱ्याला ऑफिस च्या कामातून वेळ नाही, आणि हा बाबा एवढा मोठा बिसनेसमन पण पार तिच्या सर्दी खोकल्यासाठी हजर......"

मैत्रीण - "हो हे तर मी सुद्धा पाहिलंय. कधी कधी आपण दुसरी कथा वाचायला घेतलीये हे पण लक्षात येत नाही, इतका सारखेपणा आणि तोच तोच पणा.

ती - आणि अजून एक ऍप आहे. त्यावर सतत आपलं सासू - सून, नणंद भावजय, नाहीतर जावा जावा उभा दावा! आणि त्याची वाचक संख्या पाहिली की वाटतं, यांना दुसऱ्यांच्या घरातली भांडणं वाचण्यात किती तो इंटरेस्ट!!!

मैत्रीण - हसत...."खरं सांगू, ऍप उघडलं की टॉप ला या आणि अशाच कथा दिसतात. 'सर्वाधिक वाचल्या गेलेल्या' म्हणत! आता जे वाचलं जाणार, तेच लिहिलं जाणार ना. वाचक संख्या वाढते, कमाई वाढते मग काय...... निवडा तोच विषय.

ती - "तेच तर. हे आणि असलंच वाचलं जातं. मागणी तसा पुरवठा! अजून काय! आपण एखादी साधीशी, साध्या लोकांची प्रेमकहाणी लिहावी, तर त्याला प्रतिसाद शून्य!! वैचारिक काही लिहावं तर 'काहीच समजत नाही. काय लिहिलंय...' अशी कमेंट येते वाचकांकडून! सामाजिक विषय तर नकोच लोकांना. हुंडाबळी, बलात्कार, खुन, भ्रष्टाचार, लाचखोरी हे असे विषय म्हणजे कडू कारलं! त्याच कडू कारल्याची शेती करतेय ना मी! मग कशी जमणार माझी आणि वाचकांची जोडी. आणि मला 'मागणी तसा पुरवठा' प्रमाणे नाही वागता येणार गं. म्हणून ठरवलंय बस आता. माझा वेळ इतर कामात सत्कारणी लावेल."

मैत्रीण - "हे बघ, दुसऱ्यांनी काय करावं हे आपल्या हातात नाही. पण आपण काय करावं हे तर आपल्या हातात आहे ना. आणि एक सांगू, तू खुप छान लिहितेस. माझ्यासारखे काही वाचक आहेत, त्यांच्यासाठी तू फेव्हरेट आहेस. आम्हाला चालतील तुझी ती कडू कारली! आमच्यासाठी तीच गुलाबजामून आहेत. हा हा हा ssss. तेव्हा दुसऱ्यांसाठी आमचा हिरमोड नको ना गं करुस.... त्यांनी काय वाचावं हे त्यांना ठरवू दे. पण आम्हाला तुला वाचायचंय.... आम्हाला त्यापासून वंचित नकोस ना ठेवूस. प्लीज!"

ती - हसतच आपल्या मैत्रिणीला मिठी मारत "हम्म... तुझं बरोबर आहे. कुणी काय वाचावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ते माझ्या हातात नाही. मी माझं काम करत राहीन. शेवटी बगळ्यांच्या रेषेत एखादा राजहंस असतोच...... ज्याला वेडे कुरूप म्हटले जाते. हरकत नाही..... कुरूप तर कुरूप..... राजहंसच होईल मी... हा हा हा हा ssssss "

समाप्त
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →