शीर्षक: तोडगा भाग -६
कालभैरव मंदिर हे कॉलेज आणि तिच्या घराच्या जाणाऱ्या दिशेच्या रस्त्याच्या बरोबर मध्येच होते. स्कुटी घेऊन ती तडक त्या मंदिराकडे जाण्यास निघाली होती. तिला रात्रीचे किती वाजलेत त्याचे सुद्धा भान नव्हते. तिकडे तिची आई खूप वेळ झाला अजून कशी आपली मुलगी आली नाही, म्हणून वाट बघत होती. थोड्या वेळाने जर ती घरी आली नाही तर तिला फोनच करायचा असे आईने ठरवले होते.
काहीतरी आहे त्यामुळे तिला मंदिरात जावेसे वाटत होते. तिने तिच्या बॅगमध्ये थिएरी ऑफ युनिवर्स हे पुस्तक घेतले होते. तसेच रात्रीच तिने फोटोवरून, इंटरनेटवर शोधून तिला तो मंत्र मिळाला होता तो ही तिने नीट जपून ठेवला होता.
ती हळूहळू पावले टाकत त्या मंदिरात गेली. मंदिरामध्ये एवढी गर्दी नव्हती तसेच तिथे आलेले भाविक, ते प्रत्येकजण मंदिरांमध्ये भक्तीमध्ये मग्न झाले होते.
इथे सगळ्यांची नजर चुकवत ती थेट त्या रहस्यमयी दरवाजापाशी चालत आली.
तिने मग हातात मोबाईल घेऊन तो मंत्र उच्चारण्यास सुरुवात केली आणि काय आश्चर्य मंदिराचे द्वार थोडे हलवायला लागले. तिने तब्बल एकवीस वेळा त्या मंत्राचा उच्चार केला होता; परंतु ते द्वार फक्त हलत होते त्या मंदिराचा काही उपयोग नाही असा विचार करून तिथून ती निराश होऊ निघून घरी गेली.
घरी आल्यावर तिला उशिरा उशीर का झाला म्हणून आईने विचारले त्यावर तिने साफ दुर्लक्ष केले आणि फ्रेश होऊन ती न जेवता पलंगावर झोपून गेली.
पुन्हा तिला रात्री स्वप्न पडले आणि त्या स्वप्नामध्ये तिने खूप वेळा मंत्र उच्चारूनही तो दरवाजा का उघडला नाही असे विचारले होते. तेव्हा तिला एका माणसाची आकृती दिसली होती, परंतु त्याचा चेहरा तिला नीटसा दिसत नव्हता, पण त्याची पाठमोरी आकृती जशी तिने आधी बघितलेल्या स्वप्नामध्ये दिसणाऱ्या माणसासारखी होती तशीच आता दिसत होती आणि ते बघून तिने पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला होता.
"एकशेआठ वेळा तो मंत्र उच्चार केल्यावर दरवाजा उघडतो." एवढे उत्तर देऊन ती व्यक्ती गायब झाली होती.
दुसऱ्या दिवशी आपण हा प्रयत्न करायचा असा तिने विचार केला होता, परंतु तिची सकाळ मात्र दुपारी बारा वाजता झाली होती. उशिरा उठल्यामुळे आता कॉलेजला जाणे तिने रद्द केले होते, तसेच तब्येत ठीक नसल्याचा मेल तिने कॉलेजला पाठवला होता.
पूर्वाने सुद्धा ती का आली नाही, म्हणून चौकशी केली होती. तिला सुद्धा तब्येत ठीक नसल्याचे कारण देऊन आपण त्या मंदिरांमध्ये जायचे असे तिने ठरवले.
कोणतेही शुभ कार्य करायच्या वेळेस मंदिरात जायचे असते असे तिची आई नेहमी सांगायची पण ती त्याकडे दुर्लक्ष करायची. ह्यावेळी मात्र तिने मंदिरात त्या दाराच्या इथे जाण्यापूर्वी आधी तिथे असणाऱ्या मूर्तीजवळ जायचे ठरवले. तिने त्याच मंदिरात असणाऱ्या देवाच्या मूर्तीला नमस्कार करून पुन्हा त्या दरवाजापाशी जाण्याचा ठरवलं.
मंदिरात गेल्यावर तिला खूप प्रसन्न वाटले. घरातून निघताना तिने आईला काही काम आहे, असे सांगून ती निघाली होती. आपली मुलगी कालपासून विचित्र वागत आहे, असे तिच्या आईला वाटत होते; परंतु पुन्हा ती घरी परतल्यावर तिला विचारायचे, असा आईने विचार केला.
मंदिरात गेल्यावर कालभैरवाच्या मूर्तीला तिने मनापासून नमस्कार केला. तसेच आज तरी तो दरवाजा उघडावा आणि त्या मागचे रहस्य मला समजावे अशी मनोभावे प्रार्थना केली. देवा पुढे तिची इच्छा पूर्ण व्हावी, म्हणून धावा केला.
मंदिरा जवळ गेल्यावर तिथेच असणारे एक बेलपत्र तिच्या हातामध्ये पडले. नेहमी तिची आई शंकराची उपासना करायची त्यामध्ये बेलपत्र असायचे त्यामुळे तिने ते पान बरोबर ओळखले होते.
बेलपत्र म्हणजे कदाचित तिला मिळालेला आशीर्वादच आहे. म्हणून तिने ते आपल्या सोबत घेतलं त्यानंतर ती त्या कालचक्र असलेल्या दरवाजापाशी गेली.
हातामध्ये स्फटिकाची माळ घेऊन १०८ वेळा तो मंत्र उच्चारायला सुरुवात केली होती. हळूहळू कालसारखाच तो दरवाजा हलत होता आणि ज्यावेळेस १०८ वेळा तो मंत्र उच्चारून झाल्यावर तिला दरवाजा उघडल्यानंतर एक चिन्ह दिसले आणि त्या चिन्हाचा आकार हुबेहूब बेलपत्रासारखा होता आणि आता कुठे तिला लक्षात आले होते की आपल्या हातात सुद्धा बेलपत्र आहे.
त्या हातातील बेलपत्र घेऊन तो दरवाजा उघडण्यासाठी असलेल्या त्या बेलपत्राच्या आकाराच्या साच्यामध्ये बेलपत्र बसवले. जसे ते बेलपत्र बसवले गेले तसे टाळा किल्लीने खोलल्यावर जसा पूर्ण दरवाजा उघडला जातो तसाच तो उघडला होता.
दरवाजा उघडल्यावर तिकडे जाण्याची उत्सुकता होती, परंतु आपण पुन्हा परत इथे येणार की नाही याची सुद्धा तिला धाकधूक वाटत होती. तिचं एक पाऊल पुढे जाण्यासाठी तयार होते तर आणि दुसरे पाऊल मागे होते. जर आपण पुन्हा या दुनियेमध्ये नाही आलो तर आपल्या आईचे आपल्या माघारी काय होईल असा तिला प्रश्न पडला होता.
तिने वाचलेल्या त्या पुस्तकांमध्ये तो दरवाजा काही वेळा पुरताच उघडा राहणार होता, त्यामुळे हळूहळू दरवाजा बंद होत असल्याचे तिला समजले आणि तिने आता काहीही होऊ दे, असे म्हणून पाठीमागे राहिलेला पाय पुढे ठेवलेल्या पायासोबत जुळवून पुढे चालण्यास तिने सुरुवात केली होती.
प्रखर प्रकाश जसा स्वप्नात बघितला होता, अगदी तसाच प्रकाश तिच्या डोळ्यांवर पडला होता. त्या प्रकाशाचे तेज इतके जास्त होते की, तिचे डोळे पुन्हा उघडले जात नव्हते. नंतर तिच्या पिशवीमध्ये नेहमी सनग्लासेस असायचे तिला आठवले, तिने ते घालून पुढे जाण्याचा विचार केला होता.
ते सनग्लासेस घातल्यावर आता तिला कुठे आजूबाजूचे दिसत होते. पुढे गेल्यावर तिला एक पाठमोरी आकृती दिसली होती.
क्रमशः
© विद्या कुंभार
