Login

तोडगा भाग-४

समांतर रेषा जरी एक होत नसतील तरी दोन जग एकत्र येऊन समस्येवर तोडगा निघेल का सांगणारी अनोखी कथा!

शीर्षक: तोडगा भाग-४

मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर दर्शन व्यवस्थित झाल्यामुळे आई आनंदीत होती आणि थोडंसं बाहेर गेल्यामुळे नभाला सुद्धा जरा बरं वाटले.

मंदिरात दर्शन झाल्यावर दुपारचे जेवण दोघींनी बाहेरच खाल्ले असल्यामुळे थोडा वेळ आराम करायचा असा विचार केला होता.

आईने सुद्धा निवांत सर्व करण्याचे ठरवल्यामुळे ती सुद्धा झोपली होती. नभा झोपल्यावर तिला एक स्वप्न पडले होते.

तोच मंदिरातील दरवाजा तिला स्वप्नामध्ये दिसला. तसे एक मंत्र उच्चारून तो दरवाजा उघडला जाणार होता आणि तो मंत्र माहित आहे असे त्यामध्ये दिसत होते.

आपल्याला आता दरवाजातून दुसऱ्या दुनियेमध्ये जाण्यासाठी मिळणार या विचारानेच नभा खूश झाली होती. तिने जसा तो मंत्र म्हंटला तसा तो दरवाजा आपोआप उघडला गेला आणि त्या दरवाजाच्या पलीकडे एक पाऊल ठेवल्यावर तिला प्रखर उजेड दिसू लागला त्यामुळे तिचे डोळे आपोआप तिने बंद केले होते.

जसे तिला मागच्या स्वप्नात आधुनिक सर्व काही गोष्टी दिसत होत्या. तसेच हुबेहूब त्या गोष्टी आता तिला दिसत होत्या ती हळूहळू पुढे जात होती. पुढे जात असताना आणि  तिला एका व्यक्तीला अडवून काहीतरी विचारावे असा तिच्या मनात आले आणि ती हात पुढे करून त्या व्यक्तीला स्पर्श करणारच तेवढ्यात तिच्या आईने तिला उठवले.

" संध्याकाळचे सहा वाजले आणि अजून पर्यंत तू झोपली आहेस. नभा, रात्री तुला लवकर झोप लागणार नाही. त्यापेक्षा तू आत्ताच उठ आणि आज काहीतरी जेवण बनवायला मला मदत कर." आई म्हणाली.

" काय गं आई, किती मस्त स्वप्न बघत होते."  मधूनच उठवल्यामुळे थोडीशी वैतागत पलंगावर उठून बसली होती.

" मी तुझे आज काही ऐकणार नाही. अजून जेवण बनवायचं आहे मला. मी कुठे बाहेर गेली तर तू काय माझ्यावर अवलंबून राहणार आहेस का ?  तसे तुला सर्व येत आहे. फक्त तुला सारखे त्याचा सराव करायला हवा." तिची आई तिची तक्रार तिच्याकडेच करत म्हणाली.

" बरं, मी करते. आता जास्त मला बडबड करू नकोस, पण ते सर्व सुरू करण्याच्या आधी तू मला तुझ्या हातचा मस्त आल्याचा चहा करून दे. वातावरणामध्ये थंडपणा आहे आणि तुझ्या हातचा आल्याचा चहा मी खूप दिवस झालं प्यायलेच नाहीये ना." आईला लाडीगोडी लावत म्हणाली.

" हो करते.  राणीसाहेबा. तुम्ही लवकर आवरा आणि हॉलमध्ये बसा. मी चहा करून आणते. बाकी सर्व आपण दोघे मिळून जेवण बनवूया लवकर ."  असे म्हणून आई  स्वयंपाकघरामध्ये गेली.

' मला ही स्वप्न का पडतात ?  कदाचित मी जास्तच वाचत आहे, त्यामुळे पडत असतील.'  स्वतःलाच प्रश्न विचारून स्वतःच उत्तर देत नभा फ्रेश होण्यासाठी निघून गेली.

आल्याचा चहा पिल्यावर थोडा वेळ टाईमपास करत पुन्हा एकदा आईने ओरडल्यावर नभा स्वयंपाकघरामध्ये गेली.

दोघींनी मिळून मस्त जेवण बनवले. लवकर जेवण झाल्यावर कोणता तरी चित्रपट पाहायचा दोघींनी विचार केला होता.

" आपण मस्त एखादा सायन्सफिक्शन असणारा पिक्चर बघूया. म्हणजे तुला पण त्याच्यामध्ये शिकता येईल. " ती आईला म्हणाली.

" काही नाही हा ! मस्तपैकी जुने चित्रपट लावूया एक तर तू जे चित्रपट लावते मला त्यातले काही समजत नाही आणि पुन्हा हे काय ते काय समजण्यामध्येच एखादा अभ्यासच करतो. असं वाटतं त्यामुळे एखादा हास्यविनोद चित्रपट आपण बघूया."  तिच्या आईने तिला आवडणारे चित्रपट न लावण्याबद्दल सांगितले.

फॅमिली ड्रामा आणि तेच तेच पांचट विनोद काही त्या चित्रपटांमध्ये असते, असे समजून नभा आपल्या खोलीमध्ये निघून गेली.

अजून काही विद्यार्थांसाठी नोट्स काढायचे असल्यामुळे तिने नोट्स काढायला सुरुवात केली आणि त्यानंतर ती इंटरनेटवर तिने अंतराळ, एलियन आणि समांतर जग या सगळ्याविषयी त्याचा काही संबंध आहे का हे वाचण्यास सुरुवात केली . आधी तर तिने पहिले तिला माहीत असलेले आर्टिकल्स वाचले. त्यानंतर तिने अजून काही नवीन माहिती मिळते का त्याबद्दल अन्य देशांनी त्याबद्दल काय मत मांडले आहे, ते वाचण्यास सुरुवात केली.

बाहेरून आईचा हसण्याचा आवाज येत होता, म्हणजे आई चित्रपट बघत आहे; हे तिला समजले होते.

दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे सुट्टी होती आणि तिला पूर्वाचा मेसेज आला होता.

खरं तर आज मला घरी बसून वेगवेगळ्या हॉलीवुड बेस्ट मूवी बघायचे आहेत, परंतु पूर्वाने एवढे बोलवले आहे तर जावेच लागेल असे म्हणून तिच्यासोबत ती तिला भेटण्यासाठी तिने सांगितलेल्या कॅफेमध्ये गेली.

" काय पूर्वा मॅम, आपण उद्या कॉलेजमध्ये भेटणारच होतो ना, मग आज मला का बोलावले?"  तिने विचारले.

" अगं, तुला काय सांगू, माझे लग्न होणार असल्यामुळे  मला काही शॉपिंग करायची आहे; म्हणूनच मी तुला बोलावले आहे. तुझा ड्रेसिंग सेन्स खूप छान म्हणूनच आईने मला तुला सोबत घेऊन काही शॉपिंग करायला सांगितली आहे." पूर्वा  हसतच म्हणाली.

"शॉपिंग करायची म्हणजे मला खूप कंटाळा येतो, त्यापेक्षा मी एखादा मूव्ही बघितला असता." नाराजीतच नभाने आपले मत मांडले.

" पुढच्या शनिवारी किंवा रविवारी एखादा मूव्ही असेल तो तू माझ्याकडून बघ, पण आज माझ्यासोबत चल ना. कारण खरेदी करायला वेळ लागतो आणि त्यात तुला माहिती आहे ना मला कुठलीही गोष्ट पटकन पसंत पडत नाही, त्यामुळे अजून वेळ जातो. म्हणून आपल्याला खूप साऱ्या दुकानात जाऊन नीट बघूनच कपडे घ्यावे लागणार आहेत." पूर्वा आपल्या मैत्रिणीला आर्जव करत म्हणाली.

" बरं ठीक आहे.  त्या आधी मला काहीतरी खायला दे.
मी घरातून नाष्टा सुद्धा करून आलेली नाहीये. या कॅफेमध्ये सँडविच खूप छान मिळते, हे माहीत असलेल्या नभाने सँडविच खाण्यासाठी मुद्दामूनच थाप मारलेली होती.

"  ठीक आहे.  तू म्हणतेस तर मी तुला एक काय दोन सँडविच देते आणि दुपारचे जेवण सुद्धा माझ्याकडून ट्रीट आहे असं समज." असे म्हणून तिने नभावर खर्च करण्याची तयारी दाखवली होती.

क्रमशः

© विद्या कुंभार

अष्टपैलू लेखक स्पर्धा


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →