Login

तोडगा भाग-१

समांतर रेषा जरी एक होत नसतील तरी दोन जग एकत्र येऊन समस्येवर तोडगा निघेल का सांगणारी अनोखी कथा!
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

शीर्षक: तोडगा भाग-१.

पृथ्वीवर काही वर्षांनी पाण्याची समस्या उत्पन्न झाली होती. त्यामुळे सर्वजण हैराण झाले होते. एक लिटर मागे दहा हजार रुपये खर्च करून ते पिण्यासाठी उपलब्ध होत होते.

ह्या समस्येमुळे गरीब लोकांवर त्याचा जास्त भार पडत होता. पैसे, दागिने आणि मौल्यवान वस्तूंची चोरी व्हायची; परंतु पाण्याचा तुटवडा असल्यामुळे पाण्याची सुद्धा चोरी व्हायला लागली होती.

कोणाकडे पाण्याचा साठा असेल तर त्या गोष्टीला चक्क सर्वजण पासवर्ड लावून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत होते. आधी तर घर सुरक्षित राहण्यासाठी टाळे वगैरे लावत होते, परंतु पाणी सुरक्षित राहण्यासाठी सर्व त्याला इलेक्ट्रॉनिक सेन्सर लावून पासवर्ड ठेवत होते.

श्रीमंतांकडे पैसा असल्यामुळे त्यांच्यासाठी ती काही एवढी मोठी गोष्ट नव्हती, परंतु गरीब आणि मध्यमवर्गातील या लोकांसाठी ती खूप मोठी गोष्ट होती.

"काय गं नभा, आज तू उशिरा कशी काय आलीस ?" पूर्वाने विचारले.

"काय सांगू तुला आमच्याकडे आता पाणी कपात वाढली आहे. मर्यादित वेळेत पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे अर्ध्या तासामध्ये एका आठवड्यासाठी सर्व पाणी भरावे लागते."  नभा म्हणाली.

" पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. आज तर म्हणे काय ते पाण्याचा फुग्यासारखा काहीतरी नवीन  प्रकार निघाला आहे त्याची किंमत लाखात आहे आणि काहीजण तर अशा वस्तू विकत आहेत की त्यामुळे पाणी पिल्यासारखं वाटेल, परंतु ते सर्व कृत्रिम आहे."  पूर्वा म्हणाली.

" त्या सर्व वस्तू कृत्रिम तर आहेत आणि त्या आपल्या शरीरासाठी सुद्धा हानिकारक आहेत ; पण काहीही केले तरी पाण्याची तहान दुसरी कशानेच भागवता येत नाही." नभाने आपले मत मांडले.

"मागे तर कृत्रिम पाऊस सर्वत्र पाडण्यात आला होता. त्यासाठी सुद्धा लोकांकडून पैसे घेण्यात आले होते आणि त्याच्यामध्ये पण घोटाळा झाला होता असं समजलं होतं. त्यापासून तर काय कृत्रिम पाऊस काय कधी पुन्हा पडेल असं वाटत नाही."  पूर्वा म्हणाली.

काहीतरी उपाय असायला हवा गं, नाहीतर अशाने तहानबळी  व्हायला सुरुवात होईल."  ती हताशपणे म्हणाली.

" हे तहानबळी काय असतं?"  न  समजून मैत्रिणीने तिला विचारले.

" अगं, जसे भूकबळी असते तसे मी तहानबळी म्हणत आहे."

" हो, बरोबर.  तसं सुद्धा होऊ शकत. यासाठी आपल्या आधीच्या पिढीने पाण्याचा साठा नीट करायला हवा होता, नाहीतर आपल्याला हे दिवस बघायला मिळाले नसते." 
नभा आणि तिची मैत्रीण बोलत बोलत कॉलेजमध्ये पोहोचल्या होत्या.

दोघी सुद्धा प्राध्यापक म्हणून कॉलेजमध्ये शिकवत होत्या.

तेवढ्यात सगळ्यांना ईमेल आला होता की पाण्याच्या कमतरतेमुळे आता कॉलेजमध्ये सुद्धा पाणी मिळणार नाही.  तसेच वॉशरूम सुद्धा वापरताना आता इंग्रजी पद्धतीचा म्हणजे टिशू पेपरचा वापर करायचा आहे.

हे सर्व ऐकून सगळ्यांमध्ये चर्चेला उधाण आले होते. कोणी म्हणत होते की, आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे बरोबर नाही. कोणी म्हणत होते की, आपण बाहेरच्या लोकांचे अनुकरण का करायचे, परंतु पाण्याची समस्या जास्त भेडसावत असल्यामुळे तो निर्णय सुद्धा सगळ्यांना नाईलाजाने मान्य करावा लागला होता.

दुपारचे दोन लेक्चर झाले असल्यामुळे लायब्ररीमध्ये जाऊन काहीतरी वाचावे असा विचार करून नभा लायब्ररीमध्ये गेली होती.

तिथे गेल्यावर तिने भौतिकशास्त्र सोडून आज तिने अंतराळातले पुस्तक वाचण्याचा निर्णय घेतला होता. तिला नेहमी वर आकाशात बघितल्यावर, ती त्यात ज्या गोष्टी समजत नाही किंवा ज्या गोष्टी तिला माहीत आहेत त्या दोन्हीचे तिला कुतूहल असायचं, त्यामुळे ती त्या संदर्भात वाचत असायची.

त्यामुळे ती नेहमी इंटरनेटचा वापर हा नवनवीन गोष्टी शोधण्यासाठी किंवा त्या मागचे कारण काय आहे, हे शोधण्यासाठी उत्सुक असायची.

आतापर्यंत तिने बरीच वेगवेगळी पुस्तके वाचली होती आणि पुढे जाऊन जर कधी तिला अवकाशात जायची संधी मिळाली तर ती सोडणार नव्हती. तिला एकदा तरी आकाशाची सफर ही करायची असा तिने विचार केला होता;  परंतु हे काही तिचे स्वप्न सोपे नव्हते, हेही ती जाणून होती.

आज तिचं लक्ष एका पुस्तकावर गेले. आजपर्यंत तिने फक्त त्याच्याबद्दल ऐकून होती, पण प्रत्यक्षात त्यात काय आहे,  हे वाचण्यासाठी तिने पुस्तक हातात घेतले. तिथल्या मोठ्या टचस्क्रीनवर डिजिटल नोंद करून तिने ते वाचण्यास सुरवात केली.

" थिएरी ऑफ युनिवर्स " असे त्या पुस्तकाचे नाव होते. ते वाचून झाल्यावर तिला अजून याबद्दलची काही पुस्तके असतील तर आपण वाचायची, असा तिने निर्धार केला होता.  पुस्तक वाचत असतानाच रात्री नोट्स काढत असल्यामुळे जागरण झाले होते, म्हणून ती तिथेच झोपी गेली होती.

अचानक थंड हवा यायला सुरवात झाली होती आणि तिच्या डोळ्यांच्या समोरच एक वेगळे विश्व उभे राहिले होते.  तिथे सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा तर होत्याच परंतु सगळीकडे आधुनिकरण असल्यामुळे बिल्डिंग आणि नवनवीन मशनरी सुद्धा दिसत होत्या.

' वाह ! मस्त आहे.  हे सर्व मला आधी का दिसले नाही.' ती स्वतःशीच पुटपुटली.

कोणीतरी एक व्यक्ती तिला तिच्यापुढे दिसली आणि तिला आवाज देणार तेवढ्यातच जोरात आवाज आला.

नभा लायब्ररीमध्ये वाचत बसलेली होती.

"  इथे का झोपलीस  नभा ? उठ लवकर. "  नभाची मैत्रीण पूर्वाने तिला हलवून उठवले.

आपण स्वप्न बघत आहोत, हे नभाला समजले आणि एवढेच सुंदर स्वप्न बघत असताना मध्येच आपल्याला जागे केले; म्हणून पूर्वाचा राग सुद्धा आला होता, परंतु आता आपल्याला घरी जावे लागणार; हे समजून नभा उठली.

क्रमशः

त्या स्वप्नाचा आणि नभाचा काही संबंध असेल का?

© विद्या कुंभार.

अष्टपैलू लेखक स्पर्धा

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →