Login

तिचे कर्तव्य..(भाग २)

सासर माहेर दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमरीत्या सांभाळून तिने तिचे कर्तव्य चोखपणे निभावले.


तिचे कर्तव्य- माहेरवाशीण
(जलद कथामालिका लेखन स्पर्धा)

मागील भागात आपण पाहीले, आई आजारी असल्यामुळे आरतीला माहेरी जायचे होते. पण सासूने मात्र जाण्यासाठी विरोध केला. ती माहेरी जाणार म्हटल्यावर घरची सर्व जबाबदारी सासूवर पडणार होती. आणि सासूला हेच नको होते.आता पाहुयात पुढे...

"अगं आरती पण अमितला कळायला हवं ना. आई बाबांची जबाबदारी सर्वस्वी त्याची आहे. तू असं सगळं सोडून दरवेळी जाणं मलाही पटत नाही बघ. तू तिकडे गेलीस की इकडे मुलांचे, माझे सगळे आईला एकटीला नाही हॅण्डल होत ग."

अविनाशचे विचार ऐकून तर आता आरतीची तळपायाची आग मस्तकात गेली होती.

"तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती मला" म्हणत आरतीने नवऱ्याच्या आणि सासूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत बॅग भरायला सुरुवात केली.

"म्हणजे तू ऐकणार नाहीसच." रागाने अविनाश बोलला.

"तुमचा भाऊ मुंबईला असतो मग तुमच्या आईवडिलांची जबाबदारी फक्त तुमच्या एकट्याचीच आहे का? त्यांचे काही कर्तव्य नाही का आई वडीलांप्रती.?
माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या आधी आणि मग मला थांबवण्याचा प्रयत्न करा."

आरतीनेही आता मागचा पुढचा कोणताच विचार न करता मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली.

आईसाठी तिचा जीव तुटत होता. आईच्या प्रेमापोटी आज पहिल्यांदा आरती सासूच्या आणि नवऱ्याच्या विरोधात गेली होती. घाईत तिने बॅग भरली आणि कोणाचाही विचार न करता ती तशीच आईच्या ओढीने घराबाहेर पडली. क्षणभर मुलांनाही ती विसरली होती.

अर्धा तास एसटीने प्रवास करून ती माहेरी पोहोचली. आईला पाहून क्षणभर तिला रडूच आवरेना. पण कसेबसे अश्रूंना थांबवत आईजवळ थोडावेळ ती बसली.

"आई कशी आहेस ग?" काळजीच्या  सुरात आरती बोलली.

"आता तू आलीस ना, मग मी लवकर बरी होईल बघ." आरतीचा हात हातात घेत भरल्या डोळ्यांनी आई उत्तरली.

आरतीच्या आईला दम्याचा त्रास होता. वातावरण थोडे जरी बदलले तरी वारंवार त्रास उफाळून यायचा. अशावेळी जवळचं काळजी घेणारं कोणीच नव्हतं तिच्याजवळ. आरतीला देखील असं सारखं सारखं माहेरी येणं नाही जमायचं. तिलाही खूप सासुरवास सहन करावा लागत असे त्यासाठी. पण आईसाठी ती तोही सहन करायची.

"आरती, नेहमी माझ्या मदतीला धावून येतेस तू. माहेरवाशीण असूनही नीट माहेरपणदेखील नाही मिळत तुला. माहेरी आल्यावर मी तुझे लाडकोड करायला हवेत पण तिकडेही राब राब राबतेस आणि इकडे आल्यावर देखील तीच अवस्था."

"आई असं नको ग बोलूस. मुलगी जरी परक्याचे धन असली तरी फक्त सासर एके सासर तिची जबाबदारी नाही ग. सासरी गेल्यावर देखील माहेरच्यांप्रती तिचे काहीतरी कर्तव्य असतेच ना. आई वडील ही एकट्या मुलाची जबाबदारी थोडीच असते. आता दादाला सारखं सारखं इकडे येणं थोडीच ना शक्य होणार आहे. आणि अवनी आणि अदितीला त्यांच्या नोकरीमुळे. मग राहिलं कोण आता..? मीच ना ग. त्यांच्या पश्र्च्यात तू आणि बाबा फक्त माझी जबाबदारी आहेत. आणि तुमच्यासोबत चार दिवस जरी राहिले तरी माहेरपण जगल्याचा आनंद मिळतो बघ मला. तुझा प्रेमळ हात डोक्यावरुन नुसता फिरला तरी या माहेरवाशिणीचे पोट भरते बघ. त्यामुळे बाकी काहीच विचार करू नकोस आता. तू थांब मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करुन आणते."

एवढे बोलून आरती पटकन किचनमध्ये गेली आणि आईसाठी गरमागरम शिरा बनवून घेवून आली.

"आई, चल खाऊन घे बरं थोडं, बरं वाटेल तुला."

आईला तर आता रडूच आवरेना. "लेकीचे माहेरपण खरं तर आईने जपायला हवे. पण दरवेळी लेकीला आईचे आजारपण सांभाळावे लागत होते. लग्न झाल्यापासून कुठले लाड नाही की कौतुक नाही. घरात मोठी, माहेरीही आणि सासरीदेखील. फक्त आणि फक्त जबाबदाऱ्या आणि कर्तव्य यांत अडकून पडली आहे माझी लेक. आणि एवढं करून देखील सर्वांची बोलणी देखील तिलाच ऐकून घ्यावी लागतात."

नेहमीप्रमाणेच आरतीने आईची समजूत घातली. आईचे डोळे पुसले. स्वतःच्या हाताने आईला शिरा भरवला आणि आईला औषधे देवून झोपवले.

क्रमशः

आता पुन्हा सासरी गेल्यावर काय होणार या माहेरवाशिणीचे?  जाणून घ्या पुढील भागात.