Login

तिचा संयम संपला

Story Of A Girl
तिचा संयम संपला

विषय: संयमाचा अंत

स्पर्धा: लघुकथा स्पर्धा एप्रिल २०२६

सहा वाजेचा अलार्म वाजल्यावर गौरवला जाग आली.

“निशा, अलार्म बंद कर. मला पंधरा मिनिटांनी उठव.” गौरव झोपेतच बडबडला.

अलार्म बंद न झाल्याने वैतागून गौरव उठला व अलार्म बंद केला. शेजारी बघितले तर निशा तिथे नव्हती. त्याला निशाचा खूप राग आला होता. गौरवला त्याची झोपमोड झालेली आवडत नसायची. तो रागातच उठला. बाथरूममध्ये निशा नव्हती, म्हणून तो रूममधून बाहेर आला.

गौरवने आजूबाजूला बघितले, तर त्याला निशा दिसत नव्हती. तो किचनमध्ये गेला, बाहेर गार्डनमध्ये असेल म्हणून तो तिकडे गेला, पण निशा तिथेही नव्हती. एवढ्या सकाळी निशा कुठे गेली असेल हा प्रश्न त्याला पडला होता.

त्याने निशाला फोन लावला तर तिचा नंबर स्विच ऑफ लागत होता.

‘ही इतकी वेंधळी आहे ना, मोबाईल चार्ज करायला विसरली असेल.’ गौरव स्वतःशीच बडबडत होता.

निशाचा फोन लागत नसल्याने गौरवची जाम चिडचिड होत होती.

“चिरंजीव, आज सूर्य पश्चिमेला उगवला आहे वाटत.” त्याचे वडील प्रकाशराव त्याला एवढ्या सकाळी उठून गार्डनमध्ये आलेलं बघून म्हणाले.

गौरव त्यांच्या दिशेने गेला.

“बाबा, तुम्ही निशाला बघितलं का? ती कुठेच नाहीये. मी तिला फोन केला, पण मोबाईल स्विच ऑफ आहे.” गौरव म्हणाला.

“मी पहाटे पाच वाजता उठून नेहमीप्रमाणे वॉक करायला गेलो होतो. त्यावेळी मला निशा दिसली नाही. ती एवढ्या सकाळी कुठे जाईल. घरातच असेल.” प्रकाशराव अगदी सहजपणे म्हणाले.

“बाबा, मी तिला घरात सगळीकडे शोधलं, ती कुठेच नाहीये.” गौरवच्या चेहऱ्यावर राग आणि काळजी असे समिश्र भाव होते.

दोघांचं बोलणं ऐकून गौरवची आई रेखाताई बाहेर आल्या.

“दोघा बापलेकांच सकाळी सकाळी काय सुरू आहे?”

“आई, तू निशाला बघितलस का?” गौरवने आईजवळ जाऊन विचारले.

“नाही ना. आता मी तिला बोलवायला तुमच्याच रूममध्ये जाणार होते.” रेखाताईंनी सांगितले.

गौरवने पुन्हा तिला घरभर शोधले. गार्डन पासून ते टेरेस पर्यंत सगळीकडे निशाला शोधलं, पण ती कुठेच नव्हती. रेखाताई व प्रकाशराव हॉलमध्ये सोप्यावर बसले होते. गौरव येरझाऱ्या मारत होता.

“गौरव, तुमच्या दोघांमध्ये काही भांडण झाल होत का?” प्रकाशरावांनी विचारले.

“बाबा, आमच्यात भांडण व्हायला ती कधी काही बोलते तरी का. मी बोलतो आणि ती ऐकून घेते.” गौरव वैतागला होता.

“गौरव, तिच्या माहेरी फोन करून बघ. कदाचित ती तिकडे गेलेली असेल.” रेखाताई म्हणाल्या.

गौरवने घड्याळात बघितले, तर सात वाजले होते. त्याने निशाच्या भावाला फोन लावला. तिच्या भावाने फोन उचलला, पण तो अजून झोपेतच होता असे त्याच्या आवाजावरून समजले. फोनवर बोलून झाल्यावर गौरव म्हणाला,

“आई, मी उमेशला फोन केला होता. निशा त्यांच्याकडे नाहीये. मागच्या आठवड्यात तिच्यासोबत त्याचं बोलणं झालं होतं, त्यानंतर तिने कोणालाच फोन केला नव्हता. निशाच्या आईचा फोन खराब झाल्याने त्यांच्यातही बोलणं झालेलं नाहीये.”

“मग ही निशा गेली कुठे असेल?” रेखाताईंना प्रश्न पडला होता.

“तिच्या मैत्रिणींचे तुझ्याकडे नंबर आहेत का?” प्रकाशरावांनी विचारले.

“बाबा, निशा सारख्या मुलीला मैत्रिणी तरी असतील का? तिने कधीच तिच्या मैत्रिणींचा उल्लेख केला नव्हता.” गौरवच उत्तर ऐकल्यावर प्रकाशरावांनी डोक्याला हात मारला.

गौरव विचार करत असतानाच त्याला उमेशचा फोन आला.

“आई, उमेशने आपल्या सर्वांना त्यांच्याकडे बोलावलं आहे. निशाच्या मैत्रिणीने त्याला फोन केला होता. निशाबद्दल तिला काहीतरी ठाऊक आहे आणि ते ऐकण्यासाठी तिने आपल्यालाही तिकडे बोलावले आहे. निशाच्या माहेरी आपल्याला लगेच जावं लागणार आहे.” गौरवने आई व बाबांना सांगितले.

“चला, किमान तिकडे जाऊन चहा तरी मिळेल. निशा घरात नाही, तर मला कोणी चहा सुद्धा दिला नाही.” प्रकाशराव म्हणाले.

“बाबा, परिस्थिती काय आहे आणि तुमचं काय सुरू आहे?” गौरवने त्यांच्याकडे रागाने बघितले.

पुढील पाच मिनिटात गौरव त्याच्या आई-बाबांना घेऊन निशाच्या माहेरच्या दिशेने निघाला. १५ किलोमीटर अंतर होते. गौरवच्या मनात वेगवेगळे विचार येत होते.

अर्ध्या तासात गौरव व त्याचे आई-बाबा निशाच्या माहेरी पोहोचले. निशाच्या माहेरी निशाची आई, भाऊ व वहिनी असे तिघेजण होते. निशाला एक विवाहीत बहीण होती.

“निशा, अशी कशी कोणालाही न सांगता निघून गेली?” उमेशने गौरवकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने बघितले.

“मला काहीच माहिती नाही. सकाळी उठलो तर ती शेजारी नव्हती. घरात सगळीकडे बघितले पण ती कुठेच नव्हती. म्हणून तर शेवटी तुम्हाला फोन केला.” गौरवने उत्तर दिले. घरात उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच चेहऱ्यावर टेन्शन होते.

काही वेळातच निशाची मैत्रीण साक्षी घरी आली. घड्याळात नऊ वाजले होते.

“साक्षी, निशा कुठे आहे?” निशाच्या आईने विचारले.

“काकू,तुम्ही थोडं शांत व्हा. निशा कुठे आहे हे मलाही ठाऊक नाहीये. तिने फक्त मला एक काम दिले. तिने लिहिलेले पत्र तुम्हाला सगळ्यांना एकत्र बसून वाचून दाखवायचे.

“पत्र पटकन वाच.” उमेश म्हणाला.

साक्षी मध्यभागी बसली होती व बाकीचे सगळे आजूबाजूला बसलेले होते. साक्षीने पत्र वाचायला सुरुवात केली.

“साक्षी, सर्वप्रथम थँक् यु सो मच. तू माझं एक मोठं काम करत आहेस. सॉरी यासाठी की, तुला माझी कितीही काळजी वाटत असली तरी सध्या मी कुठे आहे हे तुला सांगणार नाही.

गौरव, सकाळी अलार्मने झोपमोड झाल्याने जाम चिडचिड झाली असेल ना, तुम्ही याचसाठी मला शोधत रूमच्या बाहेर आला असाल. बाबा, तुम्हाला अजूनही चहा मिळाला नसेल ना. माझी वहिनी चहा मस्त बनवते, तिची इच्छा असेल तर ती तुम्हाला चहा बनवून देईल.

आई, पुजेसाठी फुलं काढलेली नसल्याने तुम्ही मला शोधत असाल ना. उमेश दादा, आठ दिवसांपूर्वी मी तुला फोन करून आईला मला फोन करायला सांग, अस सांगितलं होतं, तो निरोप अजून तू तिला दिला नसेलच ना. ( आईने उमेशकडे बघितले, तर उमेशने मान खाली घातली होती.)

सीमा, तुझं जे घर आहे, ते माझंही घर आहेच ना. मी माझं घर म्हणून यायचे ग, काही घ्यायला येत नव्हते, पण आपल्या घरी थोड्यावेळ जावं म्हणून यायचे, पण तुला तेही आवडत नव्हतं. असो, त्यावर आता न बोललेलं बरं.

सगळ्यांनी मला नेहमी गृहीत धरलं. निशा शांत आहे, संयमी आहे, ती समजून घेईल, ती काहीच बोलणार नाही हे तुम्ही सगळ्यांनी माझ्याबद्दल परस्पर ठरवून ठेवलं होतं. निशा, नेहमी सगळ्यांच्या मनासारखं वागली, पण तिच्या मनाचा कोणीतरी विचार केला का?

आई, आम्ही लहान असताना आपण सगळे एका यात्रेत गेलो होतो. तिथे उमेशच्या आवडीची गाडी घेतली, ताईच्या आवडीच्या बांगड्या घेतल्या, पण मला काय आवडत आणि काय घ्यायचं होत हे साध कोणालाच विचारावं वाटलं नाही. हा फक्त एक प्रसंग झाला असे अनेक प्रसंग घडले आहेत.

करिअर निवडताना सुद्धा पप्पांना हे योग्य वाटेल तेच शिक्षण मला घ्यावे लागले. माझी आवड तेव्हाही विचारात घेतली गेली नाही. मी नेहमी संयम दाखवला. सगळ्यांना समजून घेतलं, पण त्या बदल्यात मला काय मिळालं?

लग्नाच्या आधी मला नोकरी करायची होती, पण आई, तू त्यावेळी बोलली होतीस की, “ लग्न झाल्यावर नोकरी कर. आत्ता नको. लोकं म्हणतील पैशांसाठी पोरीला नोकरीला लावलं.” आई, त्यावेळी लोकांचा विचार करण्यापेक्षा माझा विचार का केला नाहीस?

लग्न जमवताना सुद्धा मला त्या मुलाशी लग्न करायचं आहे की नाही? हेही कोणीच मला विचारलं नाही. बाबांना व तुला योग्य वाटलं आणि तुम्ही माझं लग्न लावलं. दरवेळी मी बोलण्याचा प्रयत्न करायचे, पण माझा आवाज दाबून टाकला जात होता. मला सगळेजण इमोशनल ब्लॅकमेल करायचे.

लग्न झाल्यावर अस वाटल होत की, मला समजून घेणारा नवरा भेटला आहे, पण ती आशाही चुकीची ठरली. गौरवला बायको म्हणजे फक्त चूल आणि मूल यासाठीच हवी होती. गौरव, तुम्ही कधीतरी मला रिस्पेक्ट दिलेला तुम्हाला आठवतोय का?

निशाला काही समजत नाही, ती वेंधळी आहे, तिला अक्कल नाही हे सतत तुमच्या तोंडात असायचं. मी काही अशिक्षित मुलगी नव्हते. कॉलेजमध्ये पहिली आलेले होते. तरीही तुम्ही मला कधीच महत्त्व दिले नाही.

दररोज घरात स्वयंपाक काय करायचा हे आई ठरवायच्या. एकदाच फक्त त्यांना न विचारता स्वयंपाक केला होता, तर त्यांनी किती बडबड केली होती, त्यावेळी गौरवने माझी बाजू सुद्धा घेतली नव्हती. आईला वाईट वाटलं म्हणून मलाच नको ती बडबड त्यांनी केली होती. मी त्या घरात फक्त मोलकरीण होते का? मला काहीच अधिकार नव्हता.

गौरव, आपल्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली. तुम्ही मला एकटीला कुठे फिरायला घेऊन गेले का? साध जेवायला म्हणून सुद्धा दोघे कुठेच गेलो नाही. देवदर्शन करायला आई-बाबा सोबत, बाहेर जेवायला जायचं म्हटलं की, बाबांना बाहेरच्या जेवणाचा त्रास होतो म्हणून सगळ्यांनी घरीच जेवायचं.

गौरव, तुम्ही मात्र मित्रांसोबत नेहमी बाहेर जायचे. मुव्ही बघायचे, बाहेर जेवण करणार, फिरायला जाणार. कधीतरी बायकोला सोबत घेऊन जाऊ अस वाटलं नाही का?

भाजी घ्यायला जाणे हे सोडता मला कधीच घराबाहेर पडता आलं नाही. भाजी घ्यायला जाताना आई मोजून पैसे द्यायच्या, आल्यावर मोजून पैसे घेणार. एखादी भाजी थोडी महाग आणली तर त्यावरून त्या मला घालून पाडून बोलणार. स्वतःसाठी स्वतःच्या मनाने दहा रुपये खर्च करण्याची मुभाही मला नव्हती.

आपल्या नात्याकडून माझ्याही काही अपेक्षा होत्याच ना, त्या कधी पूर्ण होतील? मला नोकरी करायची इच्छा आहे हे बोलल्यावर तुम्ही माझी लायकी काढली होती. सुरुवातीला तुम्हाला मी माझी बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचे, पण तुम्हाला माझं काहीच ऐकून घ्यायचं नाही हे समजल्यावर मी बोलणंच सोडलं.

माझं लग्न झाल्यावर तीन महिन्यांनी उमेशच लग्न झालं. मी जेव्हा आईकडे येऊन मनमोकळं करायचे. गौरव व आईंबद्दल सगळं सांगायचे, तेव्हा आई म्हणायची की, “निशा, थोडा संयम ठेव. सगळं काही ठीक होईल. प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात. आपण समजून घ्यायचे. सीमाने हे ऐकलं तर इथलं वातावरण बिघडेल. तू तुझ्या घरच्या गोष्टी इथे येऊन सांगत जाऊ नकोस.”

आई, मी तुझ्याकडे नाही, तर कोणाकडे मन मोकळं करेल ग. सीमाला तुम्ही सगळं स्वातंत्र्य दिलं होतं, पण मला कसलच स्वातंत्र्य नव्हत. तुला मी कितीही पोटतिडकीने सांगितलं तरी तुला माझी मनस्थिती समजत नसल्याने मी बोलणंच सोडलं होत. निशा आपल्या सोबत पहिल्यासारखी का बोलत नाही याचा शोध सुद्धा तुला घ्यावा वाटला नाही, याच मला जास्त वाईट वाटलं.

ताईकडे तर बोलण्यासाठी वेळच नसतो. कधीही तिला फोन केला, तरी ती बिजी असायची. मी हळूहळू डिप्रेशनमध्ये जायला लागले होते. मी जे आयुष्य जगत आहे, ते मला कधीच जगायचं नव्हतं. मी काही वेगळी स्वप्नं बघितली होती. आयुष्यातील एक एक दिवस निघून चालला होता. मी कधी आयुष्य जगणार होते.

दोन महिन्यांपासून आईंनी आता गोड बातमी द्या म्हणून तगादा लावला होता. मला त्यावेळी एक जाणवलं होत की, मी जर आई झाले तर मला या सगळ्यातून बाहेर कधीच पडता येणार नाही. मला बाळाला जन्म द्यायला नकार नव्हता, पण मी ज्या मनस्थितीत होते, तेव्हा हे सगळं होणं चुकीचे होते.

या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी कोणीच मला मदत करणार नाही हे समजलं होतं. आता स्वतःची मदत स्वतःलाच करावी लागणार होती. माझा निर्णय झाला तेव्हा आई मला त्याबद्दल सांगायचं होत. तू मला जन्म दिला आहेस, तुझी मुलगी काय करणार आहे हे जाणून घेण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे.

आई, मला तुला अंधारात ठेवायचं नव्हतंच. तुझा मोबाईल बंद असल्याने तुझ्याशी संपर्क होऊ शकला नाही. घरी येऊन या सगळ्यावर मला बोलायचं नव्हतं, कारण की, तू मला इमोशनल ब्लॅकमेल केलं असत आणि मी माझा निर्णय बदलला असता.

उमेशला तुझ्यासाठी दोनदा फोन केले होते. सीमाला फोन केला, तर तिने “बिजी आहे, नंतर बोलते.” हा मॅसेज केला. नंतर तिचा कधी उगवलाच नाही. बाकी कोणाशी या विषयावर बोलावं अस मला वाटलं नाही.

आता तुम्ही विचार करत असाल की, हिने नेमका निर्णय काय घेतला असेल? तर मी सगळ्यांपासून लांब निघून गेले आहे. स्वतःच एक वेगळं अस्तित्व मला निर्माण करायच आहे माझी ओळख बनवायची आहे.

गौरव, बेडरुम मधील कपाटाच्या उजव्या ड्रॉवर मध्ये मी सह्या केलेले घटस्फोटाचे कागदपत्र आहेत. तुमच्या सारख्या माणसासोबत मी राहूच शकणार नाही. काही गोष्टी ह्या नवरा बायकोच्या व्यक्तिगत असतात, म्हणून त्या इथे लिहू शकत नाही. मी कशाबद्दल बोलतेय हे तुम्हाला समजलं असेलच.

आई, माझं सगळं रुटीन सेट झालं की, मी तुला फोन करेल, पण तुझा मोबाईल सुरू असेल तरच आपला कॉन्टॅक्ट होईल. नाहीतर मी साक्षीकडे निरोप देईल. बाकी कोणाशीही बोलण्याची माझी इच्छा नाहीये. आई, माझी काळजी करू नकोस. मी माझी काळजी घेईल.

माझ्या संयमाचा अंत झाला, म्हणून तुम्हा सगळ्यांपासून दूर जावं लागलं. तुम्ही मला थोडं समजून घ्यायला हवं होतं. एकवेळ अशी आली होती की, मला आत्महत्या करण्याची इच्छा झाली होती, पण त्यावेळी एकच आठवलं की, माझ्या आईने किती त्रास घेऊन मला जन्म दिला आहे, वाढवल आहे. मी आत्महत्या करून तिला त्रास देऊ शकत नाही.

साक्षी, मी काही दिवसांनी तुला कॉन्टॅक्ट करेल. आपली मैत्री निभावण्यासाठी थँक्स.
तुमचीच,
निशा.”

पत्र वाचून झाल्यावर साक्षी लगेच घराबाहेर पडली. निशाच्या आईच्या डोळ्यात अश्रू होते. गौरव व त्याच्या आई-बाबांच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता. आपल्या बहिणीला समजून घेऊ शकलो नाही म्हणून उमेशच्या डोळ्यात पाणी आले होते.

गौरवने निशाच्या आईसमोर हात जोडून माफी मागितली व तो घराबाहेर पडला आणि त्याचे आई-बाबा त्याच्या पाठोपाठ घराबाहेर पडले.

सहा महिन्यांनी निशाने साक्षीला फोन करून आईला निरोप द्यायला लावला की,

“आई, मला खूप छान नोकरी मिळाली आहे. सुरुवातीला नोकरी मिळण्यात अडचण येत होती. मिळेल ती नोकरी करत होते, पण आत्ता एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली आहे. पगारही चांगला आहे. मी एक फ्लॅट भाड्याने घेतला. माझं स्वतःच घर म्हणता येईल असं हे आहे. इथे मी सगळं माझ्या मर्जीने करते.

पुढच्या महिन्यात माझा वाढदिवस आहे. साक्षी तुला माझ्याकडे घेऊन येईल. प्लिज आई, आपल्या मुलीचं सुख बघण्यासाठी ये. माझा पुनर्जन्म झाल्यासारखे मला वाटते आहे. सहा महिन्यांपूर्वी माझा संयम संपला म्हणून आज मी जिथे आहे तिथे पोहोचू शकले.

तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. तुझ्या हातचं जेवण करायचं आहे. मी वाट बघतेय, लवकर ये.”

निशाची आई साक्षी सोबत निशाला भेटायला तिच्या घरी गेली. निशाचे बदललेले रूप बघून तिच्या चेहऱ्यावरील आनंद बघून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. निशाने आईला घट्ट मिठी मारली.

समाप्त.

©®Dr Supriya Dighe
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →