Login

तिचा मित्र: तिचं विश्व

युविका खूप हुशार मुलगी पण कायम एकटी... रस्त्याच्या एका कडेला झाली एक अनोळखी भेट आणि त्या भेटीत तिला गवसलं तिचं नंदनवन, तिचा आनंद आणि तिचं सर्वस्व...
लघुकथा लेखन स्पर्धा एप्रिल 2026

विषय- एक अनोळखी भेट

शीर्षक- तिचा मित्र: तिचं विश्व

युविका मुळातच शांत स्वभावाची पण खूप हुशार विद्यार्थिनी. विज्ञान हा तिचा आवडता विषय, नवनवीन प्रयोग करायला तिला खूप आवडत होतं. तिला मित्र मैत्रिणी नव्हतेच. आई-वडील दोघेही पेशाने डॉक्टर त्यामुळे तिच्यासाठी त्यांच्याकडे सहसा वेळच नसायचा. कायम ते त्यांच्या कामातच व्यग्र असायचे म्हणून ती दिवसेंदिवस फार एकटी पडू लागली; पण ती तिच्या आयुष्यात खूश होती, कसलीही तक्रार नव्हती तिला. मात्र तिलाही एक तरी मित्र किंवा मैत्रीण हवी होती; पण तिच्या लाजऱ्या स्वभावामुळे तिला पुढाकार घेता येत नव्हता. शिवाय तिने जरी प्रयत्न केला तरी कोणी तिच्याशी जुळवून घ्यायला तयार नव्हतं, कारण तिचं हुशार असणं त्यांना खटकत होतं.

वर्गातील इतर सर्व विद्यार्थ्यांशी तिची तुलना शिक्षक करत असायचे म्हणून सगळ्यांना तिच्याप्रती सुप्त रागही होताच. हळूहळू युविकानेही सगळ्या अपेक्षा सोडून दिल्या. तिने स्वतःच स्वतःची सोबत करायला शिकून घेतलं; पण शाहरुख म्हणतो ना की एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल आणि त्यासाठी आपण मनापासून इच्छा मागितली तर अख्खी कायनात, अख्खं जग आपली इच्छा पूर्ण करायला मदत करतं. युविकाच्या बाबतीत त्या दिवशी तसंच काहीसं घडलं, कारण तिच्या आयुष्यात आला तिचा पहिला वहिला मित्र... 'सोडा.'

त्या दिवशी शाळा सुटल्यावर ती घरी जात असताना रस्त्याच्या कडेला एका छोट्याशा कुत्र्याशी एक मोठा कुत्रा भांडताना तिला दिसला. युविकाला मुळातच कुत्र्यांची भीती; पण त्या छोट्याशा पिल्लाला संकटात सोडून जाण्याचीही इच्छा होत नव्हती. शेवटी तिने मन घट्ट केलं आणि दप्तरातून पाण्याची बॉटल काढली. एकदा त्या मोठ्या कुत्र्याकडे पाहिलं आणि घट्ट डोळे मिटून त्याच्यावर बॉटलीतलं पाणी फेकायला सुरुवात केली. अचानक झालेल्या त्या हल्ल्याने तो मोठा कुत्रा 'कुई कुई' करत घाबरून पळाला. तो गेल्यावर तिने हळूच डोळे उघडले तर ते पिल्लू अजूनही तिथेच घाबरून बसलं होतं.

तिने बॉटल परत दप्तरात ठेवली आणि ती त्या छोट्याशा पिल्लाजवळ गेली.

"घाबरलास का त्याला? असं घाबरायचं नाही हं! तू स्ट्रॉंग आहेस ना... पुढच्या वेळी त्याला ठामपणे भिडायचं बरं का!" ती त्या पिल्लाला गोंजारून त्याच्याशी बोलत होती.

त्या पिल्लाला काय कळलं माहिती नाही; पण त्याने तिच्या हातात त्याचा पंजा ठेवला.

त्याच्या त्या कृतीला पाहून ती गालातल्या गालात गोड हसली. थोड्या वेळाने त्याचा निरोप घेऊन ती घरी जाऊ लागली; पण चार पावलं पुढे गेलीच होती की तिला त्या पिल्लाची काळजी वाटली. 'त्या पिल्लाला परत एखाद्या मोठ्या कुत्र्याने किंवा दुसऱ्या एखाद्या प्राण्याने त्रास दिला तर?' हा विचार करूनच तिचं मन अस्वस्थ झालं.

ती परत त्या पिल्लाजवळ गेली आणि त्याला म्हणाली, "तुला कोणी मित्र आहे? नसेल तर तू माझा मित्र होशील?"

तिच्या या वाक्यावर त्या पिल्लाने तिच्या गालाला चाटलं. ती हलकेच हसली.

"माझ्यासोबत आपल्या घरी येशील?" तिने हा प्रश्न केला आणि ते पिल्लू सतत शेपूट हलवून तिच्या गालांना चाटू लागलं.

"बरं. बरं. कळलं तू खूश आहेस! बाप रे! चल आता..." असं बोलून ती त्याला घरी घेऊन गेली.

नेहमीप्रमाणे घरी कोणीच नसेल हा विचार करून ती तिच्याकडे असणाऱ्या चावीने दार उघडायला पुढे आलीच होती की आतून दार उघडलं गेलं.

दार उघडताच तिला तिची आई समोर उभी दिसली तेव्हा तिला आठवलं की तिच्या आईने आज रजा घेतली होती. आईकडे लक्ष जाताच तिने आपल्या कुशीत त्या पिल्लाला लपवण्याचा प्रयत्न केला; पण ते पिल्लू काही ऐकेना... त्या पिल्लाने हळूच युविकाच्या कुशीतून मान बाहेर काढून पाहिलं आणि युविकाने डोळे मिटून घेत भीतीने आवंढा गिळला.

दुसऱ्याच क्षणी तिची आई ओरडली, "युविकाऽऽ"

"आई..." युविका कशीबशी बोलली.

"हे काय आहे युविकाऽऽ" युविकाच्या आईने थोडं रागातच युविकाला विचारलं.

"मम्मा, हा... हा माझा मित्र आहे." युविका केविलवाण्या सुरात बोलला.

"काय? हा तुझा मित्र..." आईच्या कपाळावर आठ्या पडल्या.

"हो." युविका हलकीशी हसली.

"पण हा तुझ्याकडे काय करतोय? कुठून आणलं ह्याला?" आईने प्रश्नांची सरबत्ती केली.

"ते ॲक्च्युली..." असं बोलत युविकाने आईला घडलेला प्रकार सांगितला आणि शेवटी आग्रहाने म्हणाली, "मम्मा प्लीज ह्याला आपल्याकडे ठेवूयात ना..."

"वेड लागलंय का? कोण लक्ष देणार ह्याच्याकडे? मी आणि तुझे डॅड सारखे बिझी असतो... तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यात ही नवी ब्याद नको." आईने स्पष्ट नकार दिला.

"मम्मा डोन्ट वरी! मी करेल ना ह्याचं सगळं..." युविका ठामपणे म्हणाली.

"आणि तुझ्या अभ्यासाचं काय? डोन्ट फॉरगेट तू दहावीत आहेस. हे वर्ष तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे." आई म्हणाली.

"मम्मा आय नो... पण मी तक्रारीला संधी देणार नाही. मी अभ्यासही नीट करेल आणि ह्याच्याकडेही नीट लक्ष देईल." युविका हट्ट करू लागली.

"इट्स नॉट ॲन इजी जॉब युविका... लहान बाळापेक्षाही जास्त केअर करावी लागते बाळा प्राण्यांची..." आई तिची समजूत घालू लागली.

"मम्मा प्लीज! ही इज माय ओन्ली फ्रेंड. आय डोन्ट वॉन्ट टू लुझ हिम..." ते वाक्य ऐकून शेवटी आईचं हृदय विरघळलं. आता आईला युविकाला नाराज करावंसं वाटलं नाही.

"ओके पण मला प्रॉमिस हवं की तू तुझ्या अकॅडमिक स्कोअरवर फरक पडू देणार नाहीस." आई वचन मागत म्हणाली.

"प्रॉमिस मम्मा." युविकाने क्षणात वचन दिलं.

"ह्म्म." आईने संतुष्ट मनाने हुंकार भरला.

त्यानंतर ती आत येतच होती की आईने तिला थांबवलं.

"आता काय झालं?" युविकाने गोंधळून पाहिलं.

"अगं तो बाहेर होता ना... जर्म्स असतील त्याच्या अंगावर... आधी अंघोळ घाल त्याला अंगणात, मग आतमध्ये घेऊन ये." आई म्हणाली.

"बरं."

तिने दारातच दप्तर ठेवलं आणि पळतच अंगणातल्या बागेतला नळ सुरू केला.

एक प्लास्टिकचा टब घेतला. त्यानंतर ती पळतच बाजूच्या पेट शॉपमधून आवश्यक ते साहित्य घेऊन आली. लगेच थोडा टब भरला आणि त्यामध्ये त्या पिल्लाला ठेवलं. त्याची नीट अंघोळ करून दिली. अंघोळ झाल्यावर त्याला घरात घेऊन आली. टॉवेलने त्याचं अंग पुसून घेतलं. तसेच हेअर ड्रायरने त्याचे केस कोरडे केले.

तिने काहीच वेळात स्वतःचंही आवरलं. त्यानंतर त्याला डॉग फूड दिलं व स्वतःही जेवण करू लागली. तेवढ्यात आई तिला म्हणाली.

"काय मग आज स्वारी खूश असेल ना!" युविकाचा आनंद आईने बरोबर हेरला होता.

"खूपच! थॅंक्यु सो मच मम्मा, माझी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्याबद्दल..." युविका घास खात बोलली.

"इट्स माय प्लेजर. बरं मला सांग, याचं बारसं कधी करणार आहेस?" त्या पिल्लाकडे बघत आईने विचारलं.

"आताच..." युविका मंद हसत बोलली.

"अरे व्वा! नाव आधीच ठरलंय वाटतं!" आई बोलली.

"हो." युविकाने होकारार्थी मान हलवली.

"काय आहे नाव?" आईने विचारलं.

"सोडा..." युविकाने सांगितलं पण आईच्या कपाळावर आठ्या पडल्या.

"काय?" आईने परत खात्री करण्यासाठी विचारलं.

"सोडा..." युविकाने थोडं मोठ्या आवाजात सांगितलं.

"असं कसं नाव? आणि हेच नाव का बरं?" आईने भुवया जुळवून विचारलं.

"मी लेमन सोडा पीत असताना ह्याची नि माझी भेट झाली ना म्हणून ह्याचं नाव सोडा..." युविकाने सांगितलं तसं आईला हसू आलं.

"कमाल आहे तुझी क्रिएटिव्हिटी!" आई नकारार्थी मान हलवत बोलली.

"आय नो..." युविका अभिमानाने बोलली.

त्यावर दोघीही हसल्या आणि सोडालाही काय समजलं माहिती नाही; पण तोसुद्धा मस्त शेपूट हलवत प्रतिसाद देत होता.

पाहता पाहता दिवस सरू लागले. सोडा आणि तिची अजाणतेपणी एक अनोळखी भेट झाली अन् तिच्याही नकळत सोडा तिचं विश्व झाला. सोडामुळे युविका आनंदी राहायला लागली. आता तिच्या ओठांवर कायम हसू असायचं. सोडामुळेच तिला काही चांगले नवीन मित्र-मैत्रीण मिळाले. ते सगळे सोडासोबत फावल्या वेळात खेळू लागले.

युविका शाळा, अभ्यास आणि सोडाचं पालनपोषण यात योग्य तारतम्य साधत होती. आईला वचन दिल्याप्रमाणे तक्रारीला संधी देत नव्हती म्हणून आईसुद्धा खुश होती. युविकाच्या आनंदी असण्यामुळे तिचे गुण आणखी सुधारले होते. थोडक्यात सगळं काही सुरळीत सुरू होतं. दहावीची परीक्षा दिली आणि ती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली.

नंतर तिने तिच्या आवडत्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. वर्ष सरत होते. सोडाला युविकाची आणि युविकाला सोडाची साथ होती; पण अशातच एक काळा दिवस उगवला. सोडाची तब्येत एकाएकी खालावली.

युविका लगेच काळजीपोटी त्याला वेटकडे (प्राण्यांचा डॉक्टर) घेऊन गेली आणि त्यांच्याकडूनच तिला कळलं की त्यांच्या पूर्ण कॉलनीमध्ये गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. या साथीमुळे कित्येक पाळीव आणि रस्त्यावर राहणारे कुत्रे मरण पावले. ते ऐकून युविकाला सोडाची आणखीच काळजी वाटू लागली. तिने सगळी पथ्ये पाळली, औषधोपचार केले, कारण तिला सोडाला गमवायचं नव्हतं; पण शेवटी नशिबाने खेळी खेळली आणि तब्बल १८ दिवस आजाराला झुंज देऊन सोडाने डोळे मिटले.

सोडाच्या अकाली मृत्यूने युविका हादरून गेली. त्याचा दफनविधी करताना तिचे हात थरथरत होते; पण त्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तिने सगळं काही विधिवत केलं, मात्र त्याच्या आठवणीने तिची रात्रीची झोप उडाली होती. ती दिवसा जेवेना, रात्री झोपेना यामुळे तिची प्रकृती खालावली. तिच्या आईवडिलांना तिची काळजी वाटत होती; पण त्या दुःखातून ती सहजासहजी बाहेर पडू शकणार नव्हती, कारण नाही म्हटलं तरी तिने तिचा पहिला मित्र गमावला होता. तिच्या आयुष्यात त्याचं किती महत्त्व आहे याची आई-वडिलांना कल्पना होती म्हणून तिला उगाच सल्ले न देता ते तिच्या दुःखात फक्त तिच्या पाठीशी राहिले. ती ज्या पद्धतीने त्या दुःखाला सामोरे जात होती त्या पद्धतीने तिला वागू दिलं.

संपूर्ण घडामोडीत युविका बरीच शांत झाली होती. तिच्या अभ्यासावरही परिणाम झाला होता. महाविद्यालयातील काऊन्सिलरने तिला बरेच उपदेश केले; पण त्या सल्ल्याने तिच्यावर काही परिणाम घडला नाही, मात्र एके दिवशी तिच्या जीवनात एक अभूतपूर्व वळण आलं. ती सोडाच्या विचारात गढली असताना तिचं लक्ष एका नियतकालिकाकडे गेलं. त्यातल्या एका लेखाकडे तिचं लक्ष आपोआप ओढलं गेलं. तिने तो लेख पूर्ण वाचून काढला आणि तिचे डोळे विस्फारले.

त्या नियतकालिकात आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातल्या नवनवीन घडामोडींची माहिती होती. युविकाने जो लेख वाचला त्यातही तशीच माहिती होती, मात्र तो लेख वाचून तिच्या डोक्यात काहीतरी नवीन कल्पना रुजली आणि लवकरच तिने त्यावर अंमलबजावणी करायला सुरुवात केली.

तिने बारावीची मन लावून परीक्षा दिली. निकालही खूप चांगला आला होता. तिच्यात एकाएकी आलेला बदल पाहून तिच्या आई-बाबांना आश्चर्य वाटत होतं; पण ती जे काही घडलं त्यातून बाहेर पडत आहे, ह्यातच ते समाधानी होते. पुढे ग्रॅज्युएशनसाठी तिने तंत्रज्ञान क्षेत्र निवडलं. अर्थात तिने बी.टेक आणि एम.टेक इन कॉम्प्युटर सायन्स विथ ए.आय. वीआर/ एआर स्पेशलायझेशन केलं. पोस्ट ग्रॅज्युएशेन झाल्यावर तिला जपानच्या एका नामांकित विद्यापीठात त्याच क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली. तिने त्या संधीचं सोनं केलं.

जपानमध्ये गेल्यावर तिने तिचं लक्ष कुठेच भरकटू दिलं नाही आणि याचं प्रतिफळ तिला लवकरच मिळालं. तिने तिच्या शिक्षणाच्या मदतीने एक प्रोजेक्ट सादर केला. परिणामी ती त्या पाच विद्यार्थ्यांपैकी एक ठरली ज्यांचं सादरीकरण त्या विद्यापीठाच्या संस्थापकांना विशेष आवडलं. तसेच त्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींसह प्रोजेक्ट पाहायला आलेल्या सर्व प्रेक्षकांना युविकाचा प्रोजेक्ट व सादरीकरण आवडलं.

एका नामांकित कंपनीच्या प्रतिनिधीला तिचा प्रोजेक्ट इतका आवडला की त्यांनी तिच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली, तसेच तिला त्यांच्या कंपनीमध्ये इंटर्नशिपची ऑफरही दिली.

युविकाने त्या इंटर्नशिपचा फायदा करून घेतला. तिथे काम करताना बरंच ज्ञान मिळवलं आणि ती स्वतःच्या प्रोजेक्टवरही काम करत राहिली. बरेच वर्षं उलटले; पण शेवटी तिला यश आलंच. व्हर्च्युअल रिॲलिटी, एआय बेस्ड थ्रीडी रिकन्स्ट्रक्शन, मोशन कॅप्चर ॲंड ॲनिमेशन आणि व्हॉईस क्लोनिंग वापरून तिने पेट व्हीआर तयार केलं. आतापर्यंत त्यावर फक्त संशोधन सुरू होतं; पण युविकाने महत्प्रयासाने, परिश्रमाने ते साध्य केलं आणि अर्थात हे सगळं केलं तिने तिच्या सोडासाठी!

इतक्या वर्षांनंतर व्हीआर सेटच्या साहाय्याने तिने तिच्या सोडाला अनुभवलं, त्याचा आवाज ऐकला, त्याला ती भेटली आणि जशी ती त्याच्याशी खेळायची तशीच परत खेळली. खरं नव्हतं ते काहीच याची तिलाही कल्पना होती; पण त्याच्या डिजिटल रेप्लिकाला भेटूनही तिच्या मनाला शांती मिळाली होती.

त्या नियतकालिकातला लेख वाचूनच तिला ही प्रेरणा मिळाली होती आणि आज तिच्याच यशाचा लेख त्याच नियतकालिकात झळकत होता. सगळीकडे तिच्याच प्रयोगाची चर्चा होत होती; पण तिला त्या प्रसिद्धीपेक्षा ती सोडाला आता दररोज अनुभवू शकते ह्याचा सर्वाधिक आनंद होता. ग्रीफ थेरपीच्या अनुषंगाने आणि अवघ्या जगासाठी युविकाचा प्रयोग एखाद्या आविष्कारासारखाच होता; पण युविका आणि तिच्यासारख्या पाळीव प्राणी पाळणाऱ्या, त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या व त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या आठवणी जपणाऱ्यां प्राणी प्रेमींकरिता हा साधासुधा आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातला निव्वळ आविष्कार नव्हता तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा खराखुरा चमत्कार होता.

समाप्त.

© सेजल पुंजे.


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →