जलदलेखन स्पर्धा मार्च 2026
विषय:-घटस्फोटानंतर काय?
विषय:-घटस्फोटानंतर काय?
तिचा घटस्फोट.
भाग -४(अंतिम भाग.)
भाग -४(अंतिम भाग.)
सुधाने तिला मार्ग दाखवला आणि काही दिवसांनी मालिनी कामावर रुजू झाली. सुधाने म्हटल्याप्रमाणे खरंच तिचा आत्मविश्वास दुणावला होता. दुःखाची धार बोथट व्हायला लागली होती.
हसत खेळत पुढची पाच वर्ष कसे निघून गेले कळलेच नाही. मालिनी आता आनंदी राहू लागली होती. सुधा आणि तिच्यातील नाते नणंद भावजयीपेक्षा बहिणीसारखे भासू लागले होते. ती तिला घरातील मोलकरीण बनवेल असे राजेश म्हणाला होता प्रत्यक्षात मात्र तिने मालिनीला स्वतःच्या पायावर उभे राहायला मदत केली होती.
दिवस भराभरा पुढे जात होते. सगळे सुरळीत चालू असताना मात्र मालिनीच्या आयुष्यात काहीतरी वेगळे घडू लागले. केल्या तीन चार महिन्यापासून तिच्या मासिक पाळीचा स्त्राव जास्तच वाढला होता. काही दिवस अंगावर काढल्यानंतर सुधा तिला चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन गेली आणि सरतेशेवटी सर्व चाचण्या केल्यावर डॉक्टरांनी गर्भाशयाच्या कॅन्सरचे निदान केले.
“सध्या प्रायमरी स्टेज आहे पण तो कधी बधावेल ते सांगता येत नाही तेव्हा गर्भाशय काढून टाकणे हाच एकमेव उपाय आहे. त्यानंतर किमोथेरपी घ्यावी लागेल.” कॅन्सरतज्ञ डॉक्टर म्हणाले त्यावर ती फिकटशी हसली.
“ज्या गर्भाशयात वाढलेल्या मुलानेच मला साथ दिली नाही तेव्हा हे गर्भाशय काय कामाचे गं. काढून टाकूयात.” अगदी सहज बोलावे तसे मालिनी म्हणाली आणि सुधाच्या डोळ्यात टचकन पाणी आले.
“कुणी साथ सोडली तरी आम्ही आहोत की सोबत. आम्ही कधीच तुझी साथ सोडणार नाही.” अजय तिला घट्ट मिठी मारत म्हणाला. त्याच्या सोबतीने सुधा देखील तिला बिलगली.
आणि आता तीनच दिवसांपूर्वी मालिनीवर मोठी शस्त्रक्रिया झाली. डॉक्टरांच्या मते तिच्या तब्येतीत सुधारणा होत होती त्यामुळे दोन दिवसांनी तिला डिस्चार्ज मिळणार होता. सूधाने ही बातमी देताच तिने झोपायला म्हणून डोळे मिटले आणि दहा वर्षांपासूनचा संपूर्ण भूतकाळ तिला आठवून गेला.
“ताई काळजी करू नका. आम्ही आहोत की.” डोळ्याच्या कोनातून गालावर आलेले अश्रू अलगद पुसत सुधा अलवारपणे म्हणाली आणि मालिनीच्या सलाईन लावलेल्या हाताची बोटे तिच्या बोटात गुंफल्या गेली.
ही लढाई इथेच थांबली नाही हे तिला ठाऊक होते. अजय आणि सुधाच्या मदतीने ती पुढची लढाई लढायला सज्ज होती कारण घटस्फोटानतंर काय? हा प्रश्न तिच्या आयुष्यातून केव्हाच बाद झाला होता. भाऊ भावजयीच्या खंबीर साथीने ती दुःखाचा डोंगर पोखरून काढणार होती.
-समाप्त-
-©® Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
-©® Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
घटस्फोट! कुणाच्याही आयुष्यात नकोशी असलेली गोष्ट. काही अपरिहार्य कारणाने तो घ्यावा लागला तरी त्यातून सावरणे प्रत्येकाला जमतेच असे नाही. त्यात ती स्त्री असेल तर त्यातून बाहेर पडायला जरा कठीण जाते. म्हणून तिने आत्मनिर्भर राहणे गरजेचे आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात सुधा आणि अजयसारखा आधारस्तंभ नसतो. तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून सांगा.
प्रस्तुत कथेचे संपूर्ण अधिकारहक्क लेखिकेच्या स्वाधीन असून तिचा यू ट्यूब किंवा आणखी कुठे करण्यास सक्त मनाई आहे. असे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
