Login

तिचा घटस्फोट.भाग -३

वाचा एका घटस्फोटाची गोष्ट.
जलदलेखन स्पर्धा मार्च 2026
विषय:-घटस्फोटानंतर काय?

तिचा घटस्फोट.
भाग -३

“..तुला हवा ना घटस्फोट? देतोय मी. ज्या घरात मोठी मुलगी म्हणून मिरवत होतीस त्याच घरात आता एक कामवाली म्हणून वावरायला जा.” त्याने सही केली आणि ती त्या बेडीतून कायमची मुक्त झाली.

मात्र त्याचे शब्द तिला वारंवार आठवत होते.

‘भाऊ-भावजयीच्या घरातील मोलकरीण.’ हे शब्द आठवले की अंगावर सर्रकन काटा येत होता. या सहा महिन्यात अजयने तिला खूप चांगले सांभाळले होते. त्याची ती लाडकी ताई होती त्यामुळे त्याला ती काही जड नव्हतीच पण सुधा आपल्याशी कसे वागेल हा प्रश्न मालिनीला छळत होता. सहा महिन्याचा काळ आणि संपूर्ण आयुष्य यात खूप फरक होता. या सहा महिन्यात सुधाचे वागणे चांगलेच होते पण पुढेही ती अशीच वागेल की तिला ओझे समजेल याचे उत्तर तिला अजून सापडले नव्हते.

आपल्याला उत्तर सापडत नसली तरी काळ हा सर्वांचे उत्तर देत असतो. जसा काळ लोटू लागला तसे मालिनीच्या प्रश्नाचे उत्तरही तिला आपसूकच मिळाले होते. नवऱ्याशी नाते तुटले होते आणि मुलानेही स्वतःहून तिच्याशी नाते तोडले होते. त्याला अजूनही तीच दोषी भासत होती. तिने हा निर्णय घेतला नसता तर ते तिघे एकत्र असते हे वडिलांनी त्याच्या मनावर बिंबवले होते त्यामुळे आई स्वार्थी आहे असे वाटून त्याने स्वतःच स्वतःला तिच्या आयुष्यातून बाजूला केले.

ती पूर्णपणे एकटी झाली होती. सुधाचे छोटे बाळ खेळताना, l घरात वावरताना पाहिले की तिचे मातृहृदय पिळवटून उठे. अंकुरच्या आठवणीने डोळे भरून येत आणि मग आयुष्य भकास झाल्याची जाणीव होई.

“ताई असे दुःखाला आणखी किती दिवस कवटाळत बसणार आहात?” एका सांजवेळी सुधा तिच्याजवळ बसत म्हणाली.

“काय करू सुधा, अजूनही हे दुःख ताजेच वाटतेय गं.” अश्रू पुसत ती.

“ते ताजे वाटतेय कारण तुम्ही त्याला जुने होऊच दिले नाही. ताई घटस्फोट होऊन तब्बल चार वर्ष लोटलीत. तुमच्या त्या नवऱ्याने सरिताला रीतसर घरी आणलेय. अंकुर कॉलेजला जाऊ लागलाय. सगळयांचे आयुष्य नीट सुरु आहे, तुम्ही मात्र अजूनही तिथेच अडकला आहात.”

“मग मी काय करू गं?”

“तेच सांगायला आलेय. हा फॉर्म बघा. माझ्या ऑफिसच्या बाजूच्या एका ऑफिसमध्ये टायपिस्टची वॅकन्सी आहे. तुमचं टायपिंग झालंय, एमएससीआयटी देखील केलं आहे. मग या जॉबसाठी अप्लाय करून बघा ना.”

“मी आणि जॉब?” तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता.

“काय हरकत आहे? म्हणजे तुमचा आर्थिक भार उचलायला आम्हाला त्रास होतोय असे नाहीये. देवाच्या कृपेने अजय आणि मला चांगल्या पगाराची नोकरी आहे. मी तुम्हाला तुमच्यासाठी जॉब करा म्हणतेय. बाहेरच्या चार लोकात वावरायला लागलात तर तुमचे मन रमेल आणि दुःखातून बाहेर पडायला वाट मिळेल. शिवाय जवळ दोन पैसे आले की तुमचाही आत्मविश्वास वाढेल.” सुधा तिला सुचवत म्हणाली.

“पण या वयात? मी करू शकेल ना गं?”

ताई, अहो आता कुठे पंचेचाळीशीच्या आहात. आरामात जमेल. “

सुधाने तिला मार्ग दाखवला आणि काही दिवसांनी मालिनी कामावर रुजू झाली. सुधाने म्हटल्याप्रमाणे खरंच तिचा आत्मविश्वास दुणावला होता. दुःखाची धार बोथट व्हायला लागली होती.
:
क्रमश:
-©® Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →