Login

तिचा घटस्फोट.भाग -२

वाचा एका घटस्फोटाची गोष्ट
जलदलेखन स्पर्धा मार्च 2026
विषय:-घटस्फोटानंतर काय?

तिचा घटस्फोट.
भाग -२


डोळे मिटले तरी झोप काही तिच्या डोळ्यावर अवतरली नव्हती उलट दहा वर्षांपूर्वीचा भूतकाळ मिटल्या पापण्याआड तरळत होता.

ती आणि राजेश.. म्हणायला गेले तर एक सुखी कुटुंब. त्यांच्या प्रेमबिजातून उमलेले फूल म्हणजे अंकुर.. त्यांचे एकुलते एक अपत्य. सुरुवातीचे काही वर्षे त्यांचा त्रिकोण अगदी परफेक्ट होता. लग्नाचा पंधरावा साजरा वाढदिवस झाला आणि त्याच वर्षी त्या त्रिकोणाचा एक कोण डगमगायला लागला. कारण होते सरिता.. मालिनीची मैत्रीण!

सरिता नावाप्रमाणेच अवखळ जणू उत्साहाचा धबधबाच. कायम हसतमुख राहणारी आणि मनातील दुःख मनातच ठेवणारी. काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले होते आणि त्यामुळे ती काहीशी एकाकी पडली होती. कॉलेजात जाणारा मुलगा तिच्यापासून जरासा दुरावू लागला आणि तिचे एकाकीपण जास्तच वाढले. त्यातून बाहेर पडायला म्हणून सरिताचे मालिनीच्या घरी येणे वाढले आणि तिच्या स्वभावामुळे राजेश तिच्याकडे कसा ओढला गेला ते मालिनीला कळलेच नाही.

त्याचा बदललेला स्वभाव तिच्या लक्षात येत होता मात्र त्यामागे हे कारण असेल असे तिच्या मनातही आले नाही. एकेदिवशी बाहेरगावी गेलेली ती अचानक परतली आणि त्या दोघांना नको त्या अवस्थेत बघून तिच्या पायाखालची जमीनच हादरली.

“राजेश..” तिच्या ओठातून कसेबसे शब्द बाहेर पडले. डोळ्यातून अश्रूधारा बरसत होत्या.

“माझे तिच्यावर प्रेम आहे आणि मी आता तिला सोडू शकत नाही.” राजेश निगरगट्टपणे तिला म्हणाला तसे धक्का बसून ती मटकन खाली बसली.

“मी.. माझा संसार याचे तुम्हाला काहीच पडले नाहीये का? आपले लग्न झालेय. पंधरा वर्षाचा मुलगा आहे आणि तुम्ही.. शी! मला बोलायलाही लाज वाटतेय.” मालिनी म्हणाली.

“तुम्हा दोघांना मी कुठे सोडलंय? तू माझी बायकोच आहेस की. गेल्या पाच महिन्यापासून सरिता आणि माझे प्रेमप्रकरण चालू आहे ते तसेच राहील आणि आपले नाते देखील.” तो निर्लज्जपणे म्हणाला.

मालिनीने एक नजर सरिताकडे टाकली. तिच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता.

“मैत्रीण नव्हेस, तर मैत्रिणीच्या संसारात विष कालवणारी नागीण आहेस तू.” तिच्या कानशिलात एक जोराची थप्पड लगावत मालिनी म्हणाली आणि त्यावर काही न बोलता चेहऱ्यावर हात ठेवून सरिता घरातून निघून गेली.

“मला डिवोर्स हवाय.” ती गेल्यावर फुललेल्या श्वासावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत मालिनीने राजेशकडे पाहिले.

“वेडी आहेस का तू? एवढ्याशा कारणाने कोण डिवोर्स घेतो? डिवोर्सनतंर आपल्या मुलाचे काय होईल याचा विचार तरी तू केलाहेस का?”

“सरिताशी अनैतिक संबंध ठेवण्यापूर्वी तो विचार तुम्ही करायला हवा होता. मी मात्र तुमच्याबरोबर राहू शकत नाही.” ती बॅग भरायला आत गेली तसा तोही तिच्या मागे आत आला. तिची मनधरणी केली पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती.

दहावीच्या सुट्टीत आजोळी गेलेल्या अंकुरला तिने बोलावून घेतले. सोबत भावालाही बोलावणे धाडले. अंकुरला सत्य परिस्थिती सांगून स्वतःचा निर्णय देखील सांगितला.

अडनिड्या वयात असलेला तो पोर. कोणाचं चूक कोणाचं बरोबर या फंदात न पडता आपल्या दोन्ही पालकांनी एकत्र राहावे या विचाराचा होता. त्यासाठी आईने थोडे ऍडजस्ट करावे असाही विचार त्याच्या मनाला स्पर्शून गेला.

“अंकुर तू जे बोलतोहेस ते तुला कळत नाहीये. अरे अशा व्यभिचारी पुरुषाबरोबर मी नाही राहू शकत. तुला तुझ्या बाबासोबत राहायचे असेल तर खुशाल इथे थांब किंवा माझ्यासोबत यायचे असेल तर तेही मला मान्य आहे. मात्र या छताखाली राहणं अशक्य आहे. “ तिने त्याला उत्तर दिले.

“मग आता कोर्टातच भेट.” अंकुरचा हात घट्ट पकडून राजेश तिला निर्वानीचा म्हणाला आणि त्याच क्षणी आपली बॅग घेऊन मालिनी अजयसह म्हणजे तिच्या भावासह माहेरी निघून आली.

त्यानंतर फॅमिली कोर्टात केस सूरु झाली. तारखा, समुपदेशन या सगळ्यात सहा महिन्याचा काळ गेला. मालिनी मात्र तिच्या निर्णयावर ठाम होती. तिचा भाऊ अजय आणि त्याची बायको सुधा तिच्या पाठीशी उभे होते. वार्ध्यक्याकडे झुकलेली तिची विधवा आई फक्त डोळ्यातून टीप गाळत होती.

शेवटच्या खेपेत मालिनीने तीच मागणी केली आणि संतापलेल्या राजेशने कागदावर सही केली.

“..तुला हवा ना घटस्फोट? देतोय मी. ज्या घरात मोठी मुलगी म्हणून मिरवत होतीस त्याच घरात आता एक कामवाली म्हणून वावरायला जा.” त्याने सही केली आणि ती त्या बेडीतून कायमची मुक्त झाली.

पुढे काय होईल? वाचा पुढच्या भागात.
:
क्रमश:
-©® Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →