Login

तिचा घटस्फोट.भाग -१

गोष्ट एका घटस्फोटाची
जलदलेखन स्पर्धा मार्च 2026
विषय:-घटस्फोटानंतर काय?

तिचा घटस्फोट.
भाग -१


“अच्छा! तर तुला घटस्फोट हवाय? तुझ्याकडे तुझं असं काय आहे गं? कसल्या जोरावर घटस्फोटाची मागणी करते आहेस?” मालिनीकडे तुच्छपणे पाहत राजेशने छद्मीपणे विचारले.

“आत्मसन्मान! आत्मसन्मान आहे माझ्याकडे. त्याच्याबळावर मला घटस्फोट हवाय. अशा स्त्रीलंपट पुरुषाबरोबर आता एक क्षणही मी राहू शकत नाही.” मलिनीने तिच्या नवऱ्याला म्हणजे राजेशला प्रत्युत्तर दिले तसा त्याचा इगो दुखावला.

“माझ्यासोबत राहायचे नाहीये मग काय माहेरी जाऊन भाऊ भावजयीच्या संसारात माती कालवायची आहे की भावजयीच्या घरची मोलकरीण व्हायचे आहे? मोठी आत्मसन्मानाच्या बाता करतेय. तिथे मोलकरीण बनावे लागेल तेव्हा सगळा आत्मसन्मान विसरून जाशील.

अगं कसाही असलो तरी मी तुझा नवरा आहे. तुझ्या नावापाठी माझे नाव लागलेय ना म्हणून समाजात ताठ मानेने तू वावरत तरी आहेस. नवरा सोबत नसलेल्या स्त्री कडे समाज कुठल्या नजरेने पाहतो हे तुला ठाऊक नाहीये.”

“तुमचं उदाहरण आहे की समोर. मग आणखी कशाला काही ठाऊक करायचे? पण लक्षात ठेवा प्रत्येक पुरुष स्त्रीला केवळ भोगवस्तू समजत नाही. समाजात अजूनही चांगली माणसं आहेत.” डोळ्यात अंगार आणत ती म्हणाली.

“हो? ठीक आहे, मग त्या समाजात वावरून दाखवच. तुला हवा ना घटस्फोट? देतोय मी. ज्या घरात मोठी मुलगी म्हणून मिरवत होतीस त्याच घरात आता एक कामवाली म्हणून वावरायला जा.” घटस्फोटाच्या कागदावर सही करत राजेश रागाने म्हणाला आणि या बेडीतून कायमचे मुक्त झाल्याच्या भावनेने मालिनीचा बांध फुटला.

“..ताई, थोडं बरं वाटतंय का आता? हे नारळपाणी पिवून घ्या. त्यानंतर आपण एक वॉक घेऊन येऊ.” हॉस्पिटलच्या बेडवर निजलेल्या मालिनीच्या जवळ येत सुधा म्हणाली आणि भूतकाळाच्या गर्तेतून मालिनी वर्तमानात परत आली.

“असं काय बघताय? कुठल्या विचारात हरवलात? डॉक्टरांनी तुम्हाला सायंकाळचं थोडं फिरायला सांगितलंय ना? उठा बघू. आधी हे नारळपाणी प्यायचं आहे.” मालिनीच्या मानेमागून हात घालत सुधा तिला उठवत म्हणाली.

“हो गं. सुधा किती करतेस गं तू. तुझा सगळा व्याप बाजूला ठेवून इथे माझ्यासाठी झटते आहेस.” बेडला टेकून बसलेली मालिनी सुधाकडे बघत म्हणाली.

“ताई, मी कुण्या परक्याचे करतेय का? आपल्याच माणसांचे करतेय की.” मालिनीच्या पापणीवर विसावलेले अश्रुंचे थेंब अलगद पुसून घेत सुधा म्हणाली.

‘भावजयीच्या घरातील मोलकरीण!’

दहा वर्षांपूर्वी घटस्फोटाच्या कागदपत्रावर सही करतना नवऱ्याचे शब्द तिला आठवले. इथे मात्र तसे काही न घडता तिची भावजय धाकट्या बहिणीप्रमाणे प्रेमाने तिची सेवा करत होती.

“आता कसं वाटतंय? बरं आहे ना? अशीच प्रगती राहिली तर पुढच्या दोन दिवसात तुम्हाला डिस्चार्ज मिळून जाईल.” दुसऱ्या रात्री राऊंडला आलेल्या डॉक्टरांनी मालिनीला तपासले आणि आशादायक दिलासा देत ते निघून गेले.

“बघितलंत ताई, तुम्ही उगाच काळजी करत होतात. सगळं व्यवस्थित झालंय. ही सर्जरी सक्सेस झालीये. आता दोनच दिवसांनी आपण घरी जाऊ. आता कसलेही टेन्शन न घेता झोपी जा बघू.” सुधा आनंदाने म्हणाली आणि मान हलवून मालिनीने समाधानाने डोळे मिटले.

डोळे मिटले तरी झोप काही तिच्या डोळ्यावर अवतरली नव्हती उलट दहा वर्षांपूर्वीचा भूतकाळ मिटल्या पापण्याआड तरळत होता.
काय होता तो भूतकाळ? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
-©® Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →