Login

तिचं सासर सुरेख बाई भाग १

कथा तिच्या आधाराची
"आवडली आहे ना तुला साडी तर घे की, इतका काय विचार करते." मनोज त्याच्या बायकोला म्हणाला.

"नको, खूपच महाग आहे." मंदाला साडी आवडली होती, पण इतकी किंमत बघून ती घेतच नव्हती.

सासुबाई देखील तिथेच होत्या. तिला अजूनच अवघडल्या सारखे झाले.

त्या दोघांचं बोलणं ऐकत होती.

"मंदा, तुला आवडली आहे तर घे. पैश्याचा विचार अजिबात करू नको आणि ही साडी तुझ्यावर खुलून दिसेल." सरला म्हणाली.

"बघ आई देखील तेच म्हणतेय. घे बरं साडी."

तिचं दडपण कमी झालं. मंदाने तीच साडी घेतली.

तिच्या लग्नाचा वाढदिवस होता तेव्हा तिने ती साडी नेसली. गोड दिसत होती.

लग्नाचा पहिला वाढदिवस मनोज आणि मंदासाठी खूप खास होता. सरलाने देखील मंदा आणि मनोजसाठी भेटवस्तू विकत घेतली होती.
मंदा तर लग्न ठरल्यापासून खूप टेंशन मध्ये होती. एकतर अरेंज मॅरेज आणि घाई गडबडीत लग्न ठरलं होतं. एकमेकांना समजून घेण्यास वेळही मिळाला नव्हता. लग्ना नंतर आयुष्य कसं असेल? नवरा कसा असेल? सासुबाई कश्या असतील ? खूप सारे प्रश्न होते.

तिने तिच्या माहेरी वातावरण बघितले होते. तिची आजी फार विचित्र होती. तिच्या आई मालतीसोबत कधीच नीट वागली नव्हती. नेहमीच टोमणे मारत. नकळतपणे मंदाच्या मनात भीती बसली होती.

"माले.... पटापट हात चालव बाकीची पण कामं आहेत. निघायचं आहे." कमला खेकसत म्हणाली.

"हो आत्याबाई." मालती सगळं आवरून तयार झाली.

कमलाने तिच्यावर जळजळीत कटाक्ष टाकला.

मालती देखील शांतच होती.

"ही कोणती साडी ?"

"मंदाच्या बाबांनी आणली आहे."

"माझ्या लेकाचा पैसा वर नाही आला. तूच त्याला घ्यायला लावली असशील. हा असा खर्च करत राहिलीस तर कसा संसार करणार?"


"त्यांनी मनानेच आणली आहे." डोळ्यात काठोकाठ पाणी भरले होते.

लहानगी मंदा सर्व पाहत होती.

कमला पुढे बोलू लागली.

"पोरगी आहे, तिचं पुढे लग्न होईल तर आता पासून चार पैसे नको जपून ठेवायला."

तितक्यात मालतीचा नवरा श्याम आला.

त्याला पाहून कमला अजून भडकली.

"श्यामा, काय हे मला न विचारता तू साडी घेतलीच कशी? हिला तर काहीच कळत नाही, पण तुला काळायला नको का? आम्ही पण संसार केला, पण हे असं उधळपट्टी केली नाही."

तो आईपुढे एक शब्द बोलायचा नाही. मंदाला आजीचा राग आला.

"आजी, तू आईला का ओरडते आहेस? बाबांनी साडी आणली तर काय झालं?"

मंदामध्ये बोलली म्हणून तिला राग आला.

क्रमशः
अश्विनी ओगले.

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →