Login

थोडसं स्वतःसाठी ३

Self Importance

"दोन दिवस झाले, माझं डोकं फिरलंय. हे घर नसून युद्धभूमी वाटतंय." तो सविताकडे बघत म्हणाला. ती फक्त त्याच्याकडे बघत होती.

“माझ्या ऑफिसचा खोळंबा होत आहे. कामात नीट लक्ष देऊ शकत नाहीये..” तो वैतागत बडबडत होता.

“राहुल, अरे मी काय म्हणते आपण काही दिवस स्वयंपाकासाठी बाई लावायची काय?” सासूबाई सुद्धा चांगल्याच वैतागल्या होत्या. त्यांनी उपाय शोधून आणला होता, एरव्ही कुरकुर करणाऱ्या राहुलने लगेच संमती दर्शविली.

स्वयंपाकाला मदतनीस असल्यामुळे घरात थोडाफार आधार होता. तरीसुद्धा घर पसरलेलेच होते. त्यात सविताकडे सुद्धा राहुल लक्ष द्यायला फार वेळ मिळाला नाही, सुरुवातीचे काही दिवस त्याने तिला तिच्या दैनंदिन कामात मदत केली होती, पण कामाच्या व्यापामुळे नंतर त्याला काही फार सुचत नव्हते . तिला अधूनमधून फार वाईट वाटत होते. तिची तब्येत खराब असली तरी ती घरात सर्वांना काय हवे नको बघायची, कुणाला बरे बसले तर त्यांच्या डोक्याशी बसली रहायची, पण तिच्यासाठी कुणीच असे काही केले नव्हते.
********

सविताचं प्लास्टर निघालं होतं आणि घरात सर्वांनी हुश्श केले. जवळपास दिड महिन्याच्या त्या खडतर अनुभवानंतर घरात एक अघोषित शांतता पसरली होती. राहुलने आणि सासूबाईंनी ती तारांबळ अनुभवली होती, पण माणसांचा स्वभाव सहजासहजी बदलत नाही, हेच खरं.

एका रविवारी सकाळी, सविता पुन्हा स्वयंपाकघरात गेली. तिने गॅस पेटवला, चहा ठेवला. बाहेरून सासूबाईंचा आवाज आला, "सविता, आज पोहे कर हं. आणि राहुल आता स्वयंपाकीण बाई बंद करून घेऊ बाबा, तिच्या हातचे कसे बसे खाल्ले पण आता नको वाटते.”

त्या आवाजात आजही तोच 'आदेश' होता, जी एक सवय बनली होती. राहुल हॉलमध्ये पेपर वाचत बसला होता, जसा काही तो महिनाभराचा काळ त्याने विसरूनही टाकला होता.
सविताने चहाच्या कपचा आवाज ऐकला आणि तिची बोटं क्षणभर थबकली. तिने चहाचं पातेलं खाली उतरवलं, पोहे फोडणी घातली. ती तशीच बाहेर आली आणि सोफ्यावर राहुलच्या समोर बसली. तिने लॅपटॉप उघडला आणि तिचं शाळेचं काम सुरू केलं.

राहुलने पेपरवरून नजर वर केली, "सविता, पोहे?"
तिने शांतपणे लॅपटॉपकडे बघतच उत्तर दिलं, "गॅसवर आहे, घेऊन घ्या. मला कामाची डेडलाईन आहे, मला वेळ नाही."

सासूबाई आत आल्या. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. "हे काय नाटक आहे? आज रविवार आहे, आणि तू असं वागतेयस?"

सविताने लॅपटॉपची स्क्रीन बंद केली आणि शांतपणे सासूबाईंकडे पाहिलं. "आई, त्या महिन्याभरात जेव्हा माझा हात फ्रॅक्चर होता, तेव्हाही घर चाललं होतं ना? तेव्हा तुम्ही सगळेच तर म्हणत होतात की, मी काहीच करत नाही. मग आज मला थोडा वेळ हवाय तर त्याचं एवढं मोठं इश्यू का?"

राहुलने पेपर बाजूला टाकला. "सविता, तू हे काय लावलं आहेस? घरचं काम म्हणजे काही वेगळं नसतं..."

"घरचं काम म्हणजे काय असतं, हे मला त्या महिन्याभरात कळलं," सविता मध्येच थांबत म्हणाली. "मला कळलं की, जेव्हा मी थांबते तेव्हा घर कोसळत नाही, फक्त तुमची 'सोय' संपते. तुम्ही मला आजवर फक्त एक 'सुविधा' म्हणून पाहिलं.”
सविता उठली आणि आपल्या खोलीत जाऊन दरवाजा लावून घेतला. ती रडली नाही. आज ती पहिल्यांदाच शांत होती.

खोलीबाहेर सासूबाईंची कुरकुर सुरू होती, राहुलचा वैतागलेला आवाज येत होता. पण आज सविताला त्या आवाजांची भीती वाटत नव्हती. तिला कशाचीच घाई नव्हती.
तिने खिडकीतून बाहेर पाहिलं. बाहेर जग धावत होतं, पण ती मात्र स्थिर होती. घराच्या आतल्या त्या आवाजांकडे तिने दुर्लक्ष केलं. तिला उमजलं होतं की, घर सुधारणं ही तिची जबाबदारी नसून ती एक सहमती असावी लागते.

दिवस सरत होते. घरं लगेच बदलत नाहीत. राहुल आजही कधीकधी चिडतो, सासूबाई आजही अधूनमधून टोमणे मारतात. पण आता सविता त्या टोमण्यांना 'उत्तर' देत नाही. ती स्वतःसाठी वेळ काढते. ती शांत राहते. आणि जेव्हा घराला गरज भासते, तेव्हा ती 'यंत्र' बनून धावत नाही.
तिच्या या बदललेल्या वागण्यामुळे राहुल आणि सासूबाईंना आता 'अस्वस्थ' व्हायला होतं. ती पूर्वीसारखी उपलब्ध नाही, हे पाहून त्यांना आता तिची 'किंमत' समजायला लागली. आता घरातील सगळी मंडळी घरात थोडी थोडी कामं करू लागली होती.

सविताने घराचं काम सोडलेलं नाही, पण तिने स्वतःला 'कामगार' म्हणून संपवलं होते.
आता ती या घरातली एक व्यक्ती आहे जी कधी थांबते, कधी चालते, पण कुणासाठी 'यंत्र' बनून धावत नव्हती. ती स्वतःला सुद्धा प्राधान्य द्यायला शिकली होती.


******

समाप्त

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →