Login

थोडसं स्वतःसाठी २

Self Importance
सविताने म्यूट करून धावत बाहेर जाऊन सगळं सावरलं. तिची नुसती पळापळ सुरू होती. पुन्हा स्क्रीनसमोर आली, तेव्हा घामानं डोकं ओलं झालं होतं. तिची ही ओढताण कुणालाच दिसत नव्हती. उलट, राहुल ऑफिसला जाताना म्हणाला, "सविता, संध्याकाळी येताना आईचे मेडिसीन आणायला विसरू नकोस. नाहीतर नेहमीसारखे विसरशील..”

तिने मान डोलावली. तेवढ्यात मशीन मध्ये कपडे तिला हाक मारत होते. ती मशीन बंद करायला बाथरूम मध्ये गेली आणि…

“धडाsssssßsss म..”


“कंबरेला मुका मार आहे आणि हाताला फ्रॅक्चर आहे. सहा आठवडे विश्रांती .” डॉक्टरांनी सांगितलं.

राहुल शांत उभा होता. सासूबाईंचा पहिला प्रश्न आला, "आता घराचं काय? जेवण कोण करणार? मुलांची शाळा?"

सविताने डोळे मिटले. तिला स्वतःवरच हसू आलं. तिचं असणं फक्त सोयीचं होतं, हे तिला आज ठळकपणे जाणवलं.


दुसऱ्या दिवशी घराचं चित्र बदललं. सासूबाई आणि राहुलला साक्षात यमदर्शन झालं. सकाळी साडेसहा वाजता राहुल स्वयंपाकघरात शिरला, तेव्हा त्याची अवस्था दयनीय होती. त्याला कुकरची शिट्टी लावायला येत नव्हती, पोळीचा आकार भारताच्या नकाशासारखा झाला होता.

"सविता! चहाची पत्ती कुठे ठेवली आहेस? दूध उतू गेलंय!" राहुल ओरडला.

सासूबाई चिडून बाहेर आल्या, "हिचे काहीच जागेवर नसते आणि हे घर बघ, कचरा झालाय सगळा. हिला काहीच सुचत नाही, निदान घर तरी नीट ठेवता आलं असतं!"

“ बाबा, डब्बा, बस आली..”
“माझी वेणी…”
मुले शाळेच्या वेळेसाठी रडत होती. शर्ट इस्त्रीचा पत्ता नव्हता.

“आई, जरा पोळ्या करून देतेस का?” राहुल कणिक भिजवत म्हणाला.

“अरे मला कुठे जमते आता या वयात हे सगळं? उभे राहायला पण होत नाही..” आईने स्पष्ट नकार दर्शविला. “सविता, उठ जरा! बसल्याबसल्या थोडी तरी कामे तर करू शकते..”

राहुलने मुलांना कसेतरी डब्ब्यात ब्रेडजाम दिले आणि शाळेत पाठवले.

सविता बेडवर शांत पडून हे सगळं ऐकत होती. आज पहिल्यांदाच तिला सासूबाईंच्या टोमण्यांचा राग आला नाही, तर त्यांच्यावर दया आली. तिची ओढताण, तिचा दमछाक करणारा दिनक्रम आज प्रत्यक्षात तिथे घडत होता.

तिने लॅपटॉप उघडला. स्क्रीनवर 'परफॉर्मन्स वॉर्निंग' होती. ती वाचून ती फक्त हसली.

दोन-तीन दिवसातच घराचं रूप बदललं.
भांडी साचली. कपडे ढिगाने पडले. मुलं चिडली.
मुलांना शाळेत राहुल दमून-भागून खोलीत आला. त्याच्या शर्टावर चहाचे डाग होते. तो खुर्चीवर कोसळला.

"दोन दिवस झाले, माझं डोकं फिरलंय. हे घर नसून युद्धभूमी वाटतंय." तो सविताकडे बघत म्हणाला. ती फक्त त्याच्याकडे बघत होती.

“माझ्या ऑफिसचा खोळंबा होत आहे. कामात नीट लक्ष देऊ शकत नाहीये..” तो वैतागत बडबडत होता.


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →