Login

थोडसं... स्वतःसाठी १

Self Importance
सकाळचे पाच वाजून दहा मिनिटं झाली होती.
घर अजून गाढ झोपेत होतं. कुणाची झोप मोडू नये म्हणून भिंतींवरची घड्याळंही जणू अलगद टिक-टिक करत होती. पण स्वयंपाकघरात मात्र एक हलकीशी चाहूल लागली होती, काचेच्या बरण्या हलण्याची, चमच्यांचा नाजूक आवाज आणि गॅस पेटल्यावर उठणारी मंद उब.

अलार्म वाजायच्या आधीच सविता उठली होती.
तिच्या आयुष्यात ‘उशीर’ हा शब्द उरला नव्हता. उशीर म्हणजे कुणाचं काहीतरी चुकणं आणि ते चुकणं तिला परवडत नव्हतं.

तिने स्वयंपाक घरातील खिडकी उघडली आणि क्षणभर खिडकीजवळ थांबली. बाहेर अजून काळोख होता. दूर कुठेतरी आकाश थोडं फिकट व्हायला लागलं होतं.
ती शांतपणे पाहत राहिली.

“किती दिवस झाले, असं शांत बसून काही बघितलं नाही.” मनात विचार आला आणि पुढच्या क्षणी तोच विचार तिने बाजूला ठेवला. कारण तिच्यासाठी शांतता ही फक्त दोन कामांच्या मधली जागा होती.

तिने गॅसवर चहा ठेवला, बाजूला मुलांसाठी दूध गरम करायला ठेवले आणि थोड्याच वेळात घर जागं झालं.

“आई… माझा टिफिन!”
“आई, सॉक्स कुठे आहेत?”
“सविता, चहा झाला का?”
आवाज एकामागून एक येत होते. मागण्या, प्रश्न, घाई… आणि त्या सगळ्यांच्या मध्ये सविता होती, हाताने पोळ्या लाटत, खांद्यावर फोन अडकवून शाळेतील कॉल घेत, मुलांचा गोंधळ सावरत होती. सगळं अगदी सहा, सवयीने करत होती. पण कुणी तिच्याकडे बघत नव्हतं की कुणाला तिच्या जीवाची होणारी धावपळ दिसत नव्हती.

राहुल उठून हॉलमध्ये आला. घड्याळाकडे पाहून त्याने नाकावरची सुरकुती अधिक गडद केली.

"सविता, अजून चहा झाला नाही? ऑफिसला निघायला उशीर होतोय. तुला वेळ सांभाळता येत नाही का?"

"तिला वेळ कुठून कळणार? रात्री मोबाईलवर काय काय बघत बसते कोणास ठाऊक! सकाळची कामं धड होत नाहीत, आणि बाहेरच्या नोकरीचं तिला फार कौतुक!" सासूबाईंचा आवाज आला, धारदार आणि टोकदार.

सविताने निमूटपणे चहाचा कप राहुलसमोर ठेवला. त्याने एक घोट घेतला आणि कप टेबलावर आदळला, "साखर कमी आहे.”

“ते थोडी घाई झाली.. साखर टाकून आणते..” ती म्हणाली.

“ आजचेच नाही, नेहमीच काहीतरी विसरत असते. शाळेत मुलांना काय शिकवते कोणास ठाऊक , स्वतःच्या घराची घडी विसरत असते? वेळेचे काहीच नियोजन नाही.." सासूबाईंनी बोलायचा चान्स सोडला नाही.

सविताच्या डोळ्यांत पाणी आलं, पण तिने ते लपवले. सासूबाईंचे टोमणे तिला रोजचेच होते. जणू काही तिच्या नोकरीला काही किंमतच नव्हती.


तिने तिचा लॅपटॉप सुरू केला. तिची मीटिंग सुरू होती, पण लक्ष बाहेरच्या गोंधळाकडे होतं.
"सविता, माझा इस्त्री केलेली शर्ट कुठे आहे?" राहुलचा आरडाओरडा सुरू होता.

"आई! टिफिनमध्ये भाजी चांगली नाहीये," मुलीचा तक्रारवजा आवाज आला.

सविताने म्यूट करून धावत बाहेर जाऊन सगळं सावरलं. तिची नुसती पळापळ सुरू होती. पुन्हा स्क्रीनसमोर आली, तेव्हा घामानं डोकं ओलं झालं होतं. तिची ही ओढताण कुणालाच दिसत नव्हती. उलट, राहुल ऑफिसला जाताना म्हणाला, "सविता, संध्याकाळी येताना आईचे मेडिसीन आणायला विसरू नकोस. नाहीतर नेहमीसारखे विसरशील..”


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →