थोडं तिचंही कौतुक करा...भाग 1
जलद लेखन कथामालिका
विषय- अरे संसार संसार
समीरचं लग्न होऊन दोन दिवस झाले होते.
संध्याकाळच्या फ्लाइटने मीनलला घेऊन तो ऑस्ट्रेलियाला हनीमूनसाठी निघणार होता. मीनल आणि समीर दोघंही आयटीमध्ये नोकरीला होते, त्यामुळे पगार भरपूर होता.
सर्व हॉलमध्ये बसले होते. मीनल सर्वांसाठी चहा करणार होती. तिच्या सासूने तसा हुकुमच सोडला होता.
मीनल चहाचा ट्रे घेऊन आली, सर्वांना चहा दिला.
‘चहा सुंदर झाला’ एक घोट घेत समीर लगेच बोलला.
‘कसला सुंदर, किती गोड, निव्वळ बासुंदी’ कडवटपणे मावशी म्हणाल्या.
‘त्यांना डायबेटिस आहे हे कालच सांगितलं होतं ना तुला. इतक्यात विसरलीस?’
सासूने आपल्या धारदार शब्दाने वार केले.
मीनल तर सर्वस्वी नवीन वातावरणात आली होती. तिला या सगळ्याची सवय नव्हती. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. पण तिने ते लपवत, काहीही न बोलता किचन मध्ये निघून गेली.
मीनल लाडात वाढलेली, एकुलती एक हुशार, कतृत्त्ववान, ऑफिसात चांगल्या पदावर काम करणारी मुलगी होती.
पण तिचा सारा मोठेपणा जाऊबाईंनी व त्यांच्या बहिणींनी एका दमात ग्राऊंड लेव्हलवर आणून ठेवला होता. सासुबाई बरोबर जाऊ आणि नणंदही तिला बोलल्या होत्या.
तिच्या चेहऱ्यावरचे भाव समीरच्या लक्षात आले आणि तो लगेच तिच्या मागे किचनमध्ये गेला.
त्याला असं तिच्या मागे जाताना बघून सासूबाईने टोमणा मारला.
“बघितलंत एका दिवसातच माझा मुलगा कसा बदलला, गेला तिच्या मागे मागे, आता तिने त्याच्या कानात आपल्या बद्दल काही कानगोष्टी नाही केल्या म्हणजे मिळवलं.”
समीर किचनमध्ये येताच मीनल रडतीय त्याच्या लक्षात आलं.
“मीनल आई आणि मावशीच्या बोलण्याचं मनावर घेऊ नकोस.”
“खरंच चहा खराब झाला होता का रे?”
“नाही ग.”
“मला बर वाटावं म्हणून म्हणतोयस ना?”
“नाही,थोडा गोड होता पण छान होता. तू उगाच मनावर घेऊ नकोस आणि मुडही खराब करू नको. संध्याकाळी आपल्याला निघायचंय.
समीर बोलला म्हणून मीनलनेही जास्त विचार केला नाही. ती काम आवरून तिच्या खोलीत निघून गेली.
संध्याकाळी दोघेही जाण्यासाठी निघाले, हॉलमध्ये सगळे जमले. मीनलने सगळ्यांना नमस्कार केला.
“समीर पोहोचल्यानंतर फोन कर रे, नाहीतर बायकोच्या नादात आम्हाला विसरशील.” निघताना आईने टोमना मारलाच.
त्याने होकारार्थी मान हलवली, आणि ते निघाले.
दोघांनीही ऑस्ट्रेलियामध्ये खूप एन्जॉय केलं त्यांना एकमेकांना वेळ मिळाला. एकमेकांना त्यांनी समजून घेतलं, दोघांची मने जुळली. एक महिना फिरून झाल्यानंतर दोघेही परत आले. मीनलचा मूड अगदी फ्रेश होता.
तिच्या मनासारखा तिला छान एन्जॉय करता आलं होतं. त्यामुळे ती खूप आनंदात होती. घरी आल्या आल्या दारात पाय ठेवत नाही तोच सासूबाईंनी टोमणा सुरू केला.
“आलात का फिरून मला वाटलं तिथेच राहता की काय?” समीरने हसण्यावारी नेलं.
“काय ग आई... तू सुद्धा, आम्ही येणारच होतो. मी फ्रेश होऊन आलोच.” असं म्हणून तो त्याच्या रूममध्ये निघून गेला.
त्याच्या मागोमाग मीनलही गेली. दोघे फ्रेश होऊन बाहेर आले, तोच जाऊबाईने फर्मान सोडलं.
“मीनल स्वयंपाक तुलाच करायचा आहे. आता एक महिना केलं बाई मी, आता माझ्याने काही होणार नाही. आता तू आलीस ना तूच कर.”
मीनलच्या मनात धास्ती भरली. आपलं काही चुकलं तर अजून कोणी बोलणार तर नाही.
क्रमश:
