Login

थोडं तिचंही कौतुक करा...भाग 4

Katha tichya jivnachi

थोडं तिचंही कौतुक करा... भाग 4


पाचचा गजर वाजला आणि मीनलची नॉनस्टॉप गितांजली सुरू झाली. सकाळची कामे आवरत पर्यंत सगळे उठून जायचे. सकाळचा चहा नाश्ता झाला की ईराचं करण्यात तिचा वेळ जायचा. 


समीरचा टिफिन, सगळ्यांचा चहा, नाश्ता, नंतर जेवण सगळ्यामध्ये तिची दमछाक व्हायची. 


मीनल दिवसभर घरी असते , ती आता बाहेर जाऊन काम करत नाही म्हणून समीरचंही मीनल बद्दल मतपरिवर्तन झालं होतं, त्याच्या वागण्यात फरक जाणवत होता. त्याच्या बोलण्यात रुक्षपणा आला होता. सगळं करूनही  काही कामात चूक झाली किंवा काही कमी जास्त झालं की घरचे बोलायला मोकळे व्हायचे. 


आता मीनलला कंटाळा आला, तिला या सगळ्याचा त्रास होत होता.

पण बोलणार कुणाजवळ.  समीर त्याच्याच कामात व्यस्त असायचा.

मीनल किचन मध्ये काम करत होती. सासुबाईने चहा साठी आवाज दिला. तिने चहा बनवला आणि ती बाहेर  घेऊन आली सासूच्या हातात देणार तोच ईराच्या रडण्याचा आवाज आला, तिने हातात कप देऊन ती ईरा कडे धावली.
सासूबाईंनी हातातला कप सोडला.

आणि ओरडायला लागल्या.
“देवा, देवा, देवा माझ्या अंगावर गरम गरम चहा सांडवला  मीनलने.”

मीनल धावत त्यांच्या कडे आली.

“आई अहो तुमच्या हातात दिला होता मी, कप कसा पडला?”

मीनलने विचारताच
सासुबाई भडकल्या. 

“मग काय मी मुद्दाम केलं. देवा भगवंता ही माझ्यावर आरोप करत आहे मी मुद्दाम केलं म्हणतेय.”सासूबाईने खूप आरडाओरड केला.

मीनल काहीच बोलली नव्हती.

समीर आल्यानंतर त्यांनी त्यालाही हे सगळं सांगितलं पण जश्याच तस नाही त्यात काही गोष्टी घालून सांगितलं.

“मीनल तुझं काय चाललंय? का अशी वागतेस तू?”

“मी खरच काही केलं नाही, आई तुला उगाचच.” 
ती समोर काही बोलणार तोच तो भडकला.
“मीनल...आवर घाल स्वतःला. उगाचच...ती उगाचच बोलत आहे. मीनल तुला तुझ्या वागण्यात फरक जाणवत नाही आहे. किती चूका करतेस तू? अग आता तुला या सगळ्याची सवय व्हायला हवी होती.”

“समीर माझा संपूर्ण दिवस कामात जातो कधी काही कमी जास्त झालं तर समजून घ्यायला नको का?”

“तुला काय समजून घ्यायचं दिवसभर घरातच असतेस ना तू.”

मीनलला खुप रडायला आलं.
‘समीर असा कसा वागू शकतो?’ 
बघता बघता ईरा दोन वर्षांची झाली, मीनलने जॉब करण्याचा निर्णय घेतला.
तिने तसं घरी बोलून दाखवलं.
समीर कसा तरी तयार झाला पण सासुबाई... त्या तयार नव्हत्या.
“ही ऑफिसला जाणार म्हणजे हिच्या मुलीला मलाच बघावं लागेल, आता मुलं सांभाळण्याचा वय आहे का माझं? ही ऑफिसमध्ये जाऊन बसणार आणि आम्ही हिच्या मुलीला बघायचं, काही नको घरी राहून काम होणार असेल तर बघायचं नाहीतर नोकरीचा विषय सोडायचा.”

आता मात्र तिला असह्य होत होतं. ती खोलीत गेली आणि डोळ्यात भरून आलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पण गालावर ओघळलेले अश्रू पुसायला जवळ कुणी नव्हतं, तिला एकट वाटतं होतं.

आणि सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करू लागली.
या सगळ्यात चूक कुणाची.? 


क्रमशः