Login

द रिडल ऑफ सिक्रेट लव्ह (भाग-२)

व्योम आणि अभिध्याचं नातं काय? काय आहे त्यांच्यात नक्की? कोणत्या रात्री बद्दल बोलतोय व्योम?
"तुला का समजत नाहीये व्योम, मी नाही देऊ शकत आपल्या नात्याला नाव..." अभिध्या कळवळून म्हणाली.

"का? का नाही देऊ शकत? काय हरकत आहे?" व्योमने तिच्या दोन्ही दंडाला पकडून तिलाच प्रतिप्रश्न केले.

"हे तू मला विचारतोयस? आपल्या नात्यालाच अर्थ नाहीये. खरंतर माझंच चुकलं. मी त्या रात्री माझी मर्यादा ओलांडली. मी प्रमाणाबाहेर वागली पण... पण आता नाही. मला माझी चूक कळलीये आणि मी ती परत रिपीट करणार नाही." ती ठामपणे म्हणाली.

"चूक? ती रात्र तुला तुझी चूक वाटते?" त्याने तिच्या डोळ्यात बघत अविश्वासाने विचारले.

"हो." तिने मोठा श्वास घेत उत्तर दिले. त्याच्या प्रश्नाला होकार देताना ओठ थरथरत होते; पण वेळीच त्या भावनांना आळा घालणे तिला गरजेचे वाटत होते.

"त्या रात्री तू मनापासून खूश होतीस, माझ्या मिठीत आश्वस्त होऊन विसावली होतीस, माझ्या ओठांना तुझ्या ओठांपासून तू रात्रभर वेगळं होऊ दिलं नाहीस. तुझ्या हुंकारांनी ती क्रुझमधली खोली भरून निघाली होती आणि माझ्या डोळ्यात तू प्रेम शोधत होतीस हे सगळं विसरलीस का तू?" तो त्या रात्रीची तिला आठवण करून देऊ लागला.

"व्योम प्लीज..." तिला परत सारे क्षण आठवत होते आणि मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना आणखीच दाटून येत होती.

"अभिध्या, मला खरंच तू खूप आवडतेस. खूप आधीपासून आवडतेस अगं; पण मी स्वतःला आणि तुला जाणवू दिलं नाही. कॉलेजमध्ये तुला पाहिलं आणि त्या क्षणापासून तू माझ्या मनात भरलीस. तुझ्यानंतर या मनाने कधी कोणाचा ठाव घेतला नाही. कॉलेजमध्ये माझ्या भित्र्या स्वभावाने शेवटच्या वर्षापर्यंत मी धाडस करून व्यक्त होऊ शकलो नाही. वाटलं होतं माझं प्रेम एकतर्फीच राहील; पण तू परत भेटलीस. तू मला ओळखलं नाहीस मात्र मी लगेच ओळखलं, कारण पहिलं प्रेम कोण विसरू शकतं?" तो बोलला आणि तिने डोळे वर करून त्याच्याकडे पाहिले. ती त्याचं पहिलं प्रेम आहे हे ऐकून ती स्तब्ध झाली.

"कॉलेजनंतर जेव्हा भेटलीस तेव्हा आपली अनोळखी वाटसरू म्हणून भेट झाली. तू माझ्यासारख्या अनोळखी व्यक्तीच्या शब्दांतून आधार घेतलास. मी तुला आधार देऊ शकलो, मी ह्यातच समाधानी होतो. तेव्हा धाडस करून तुझ्याशी बोलून पाहिलं तर तू तीन भेटीनंतर ओळख वाढवू असं सांगितलं. मी त्यातही खूश झालो; पण तिसरी भेट झाली तेव्हा मात्र सगळं बदललं होतं. तुझं लग्न झालं होतं आणि माझं लग्न होणार होतं. तू तुझ्या लग्नात नाखूश आहे, दिसत होतं मला आणि तुला त्या अवस्थेत बघून माझं मनही तीळ तीळ तुटत होतं... पण तरीही स्वतःला सांभाळलं, गुंतू दिलं नाही, तुझा मित्रच होण्याचा प्रयत्न केला, कारण मीही एका नव्या नात्यात बांधला जाणार होतो. अरेंज असलं, पसंती नसली तरी निभावणार होतो ते माझं नातं; पण तिनेही ऐनवेळी घात केला. तुलाही तर माहित आहे सगळं, माझ्या लग्नाचे सर्व फंक्शन्स तूच मॅनेज करत होतीस ना? यू नो इट ऑल..." तो आज पहिल्यांदा असा व्यक्त होत होता.

आठवणींचे ते पान तिच्यापुढे वाचत होता जे आजपर्यंत त्याने सगळ्यांपासून लपवून ठेवले होते. त्याने आजपर्यंत काय काय सोसले आहे, हे ऐकून तिला आणखीच गहिवरून आले. त्याच क्षणी त्याला घट्ट मिठी मारून आधार द्यावासा वाटला तिला; पण तिची मर्यादा तिला तसे वागायला थांबवत होती. तिने मुठी आवळल्या आणि मोठा श्वास घेतला.

"हो, मला माहीत आहे तुझं लग्न होणार होतं; पण तुझ्यासोबत विश्वासघात झाला. शी युझ्ड यू. आय सिम्पथाईज विथ यू. आय ॲग्री, तुला नक्कीच एका चांगल्या जोडीदाराची गरज आहे पण... पण व्योम, ती मी नाही आणि मी कधीच नसेल." तिने त्याच्याकडे पाठ फिरवली. त्याला असे खचलेले बघू शकत नव्हती ती...

"अभिध्या, मी त्या विश्वासघाताने अक्षरशः तुटलो आणि मालदीव्सला गेलो. खरंतर जगण्यातला रस विसरलो होतो म्हणून स्वतःला शांत करायला गेलो होतो आणि तू मला परत भेटलीस त्या वळणावर जिथे मी एकाकी होतो. नियतीने परत एकदा आपली भेट घडवली आणि मग माझ्याही नकळत माझे प्रश्न मिटले. माझ्या मनाने उत्तर दिलं की मला जिचा शोध आहे ती तूच आहेस." व्योम तिच्या जवळ जात म्हणाला.

त्याच्या जवळ येण्याने तिच्या हृदयाची धडधड वाढली होती.

"व्योम, ती रात्र... मालदीवमधले ते क्षण आपण ते विचारात नाही घेऊ शकत... दे डोन्ट मेक एनि सेन्स..." पदर हातात घट्ट पकडून ती बोलली.

"आपल्यात जे झालं ते त्या रात्रीपुरतं मर्यादित नव्हतं कधीच, हे तू का समजून घेत नाहीयेस अभिध्या? तुलाही मी आवडलो होतो पाहताक्षणीच निदान त्या रात्री... माझ्याकडे तू अट्रॅक्ट झालीस. एवढे पुरुष होते तिथे, सगळेच अनोळखी पण तू माझ्याच हातात हात का दिलास डांससाठी? कारण तुलाही कुठेतरी आपल्यात केमिस्ट्री जाणवत होती. हो ना?" तिला पाठीमागून मिठी मारत तो म्हणाला.

"नाही व्योम, तू गैरसमज करून घेतोयस. असं काहीच नव्हतं... आपल्यात जे घडलं ते माझ्यासाठी त्या रात्रीपुरतंच होतं. त्या रात्री मी विसरले होते की मी कोणाची तरी बायको आहे, कोणाची तरी सून आहे... नशा चढली होती मला आणि त्यातच मी वाहत गेले, नैतिक-अनैतिकचा विचार न करता..." ती डोळ्यातले पाणी डोळ्यात अडवत म्हणाली.

"कोणती बायको आणि कोणती सून? सगळी कर्तव्ये, सर्व भूमिका तूच पार पाडायच्या? तू विसरलीस कनिष्क कसा वागलाय तुझ्याशी... त्याने एकतर खोटं बोलून तुझ्याशी लग्न केलं, लग्नानंतरही त्याने तुला एकटं सोडलं अनेक वर्षं, त्याचं अफेअर त्याच्या कलिगशी होतं लग्नाच्या आधीपासून, त्याने तुलाच काय त्याच्या आईलाही अंधारात ठेवलं पण तुझी सासू तुलाच दोष देत होती सलग पाच वर्षं... तू जर तुझ्या मैत्रिणीला शोध घ्यायला सांगितला नसता, तिने तुला पुरावे दिले नसते तर तुझ्या नवऱ्याने कधीच त्याचे पितळ उघडे केले नसते... तुझी सासू तुलाच बोलत राहिली असती आयुष्यभर आणि एवढं होऊनही तू त्यांचा विचार करतेय? जो माणूस आयुष्यभर तुझ्याशी खोटं बोलत राहिला, ज्याने गेल्या पाच वर्षांत कोणतंच सुख लिहिलं नाही तुझ्या आयुष्यात, उलट दुःखं दिलं... ज्या नात्याची सुरुवात खोटं बोलून झाली आणि खोटं बोलूनच पाच वर्षांचा संसार रेकला, असं नातं वाचवायचा प्रयत्न करतेयस तू? ज्यांनी कधी तुझा विचार केला नाही त्यांच्यासाठी तू तुझं अवघं आयुष्य पणाला लावतेय? का आणि कशासाठी हा अट्टाहास? कोणाला दाखवतेय तुझा हा खोटा खोटा सुखी संसार? तू आय.व्ही.एफ. थ्रू त्याच्या बाळाची आई होणार आहेस? त्यांच्या घराण्याचा वंश वाढवायला तू स्वतःच्या भावनांचा का गळा घोटतेय? का स्वतःची ओढाताण करतेय अभिध्या? का?" त्याने चिडूनच त्याच्या मनात असणारे सगळे प्रश्न तिला एकदाच विचारले.

अभिध्या त्याला नाकारत होती यापेक्षा ती स्वतःची घुसमट करतेय, हे व्योमला सहन होत नव्हते. एकवेळ तिचा नकार पचवला असताही; पण तो नकार तिने त्याला कमी आणि तिच्याच सुखांना दिल्यासारखे वाटत होते.

"कारण मी देवा-ब्राम्हणांच्या साक्षीने, सप्तपदी घेतल्या आहेत कनिष्कबरोबर व्योम. त्यांनी खोटं बोलून सुरुवात केली होती असेल; पण मी प्रामाणिक होते आणि मी जो निर्णय घेतलाय ना तो मी सगळा विचार करून घेतलाय. माझे आजी-आजोबा ते कसे सहन करतील हा एवढा मोठा धक्का? त्यांना लोक काय काय म्हणतील मी नाही कल्पना करू शकत. म्हातारवयात मी त्यांना एवढा मोठा ताण नाही देऊ शकत... माझा आनंद त्यांच्या आनंदात आहे. त्यांनी खूप लाडात वाढवलं मला, कधी कशाची कमी पडू दिली नाही. भरभरून प्रेम केलं माझ्यावर आणि त्यांनीच माझं लग्न करून दिलं कनिष्कसोबत... खूप विश्वास आहे त्यांचा कनिष्कवर, तो जर तुटला तर ते कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही आणि मला त्यांना हे कळूच द्यायचं नाही; म्हणून आपण इथेच थांबायला हवं." ती त्याच्यापासून दूर होत निर्धारानिशी म्हणाली.

"हे विचार त्या रात्री नव्हते केलेस तू... त्या रात्रीसारखी वाग ना मनमोकळी... स्वतःसाठी जग ना एकदा." तो अजूनही तिला कळकळीने सांगत होता.

"मी नाही जगू शकत स्वार्थी होऊन व्योम. मी कधीच नाही वागणार तशी म्हणून म्हणतेय मी की तुला जी अभिध्या हवी ती कधीच तुझी नव्हती. प्लीज आता तू जा इथून. मला नाही बोलायचं आणखी काही..." तिला आणखी नकार देता येणार नव्हता. प्रेम तिचेही होते त्याच्यावर पण समाजाच्या बंधनापेक्षा काही नाती तिला तिच्या सुखापेक्षा वरचढ होती.

"जातो मी पण माझ्या डोळ्यात बघून सांग, तुला मी आवडत नाही... माझ्या डोळ्यात बघून सांग ती रात्र तुझ्या स्मरणात नाही, माझ्या डोळ्यात बघून सांग की ती रात्र कधी उगवली नसती तर बरं झालं असतं... माझ्या डोळ्यात बघून सांग तू माझ्यावर प्रेम करत नाहीस." त्याने तिला स्वतःकडे वळवले आणि म्हणाला.

"मी... मी... मी..." मोठमोठे श्वास घेत तिने एक नाही, दोन नाही, सलग तीन वेळा प्रयत्न केला पण नाही. तिला जमले नाही.

ती नाही म्हणू शकली काहीच आणि तिच्या अबोल्यातही त्याला त्याचे उत्तर मिळाले.

"नाही म्हणू शकणार तू, कारण मला माहीत आहे तुझं हृदय सध्या कुठे आहे... तुझं हृदय माझ्यात गुंतलंय, तू मान्य केलं नाहीस तरी..." तो म्हणाला.

त्याचे शब्द ऐकून तिच्या डोळ्यातून एक थेंब ओघळला आणि क्षणात तिला कळायच्या आत त्याचे ओठ तिच्या ओठांत मिसळले होते. तिचे डोळे वाहत होते पण त्याच्या ओठांवर हसू होते. तिच्या मानेत हात घालून त्याने आणखी त्यांच्यातले अंतर कमी केले. तिच्या देहाचा त्याच्या देहाला स्पर्श होत होता आणि त्याला ऊब जाणवायला लागली. त्याच्या स्पर्शात तीही हळूहळू विरघळत होती अन् पाहता पाहता कधी तिचे हात त्याच्या पाठीवर रुळायला लागले तिलाही कळले नाही.

क्रमशः
........
© सेजल पुंजे.

अभिध्याचा नकार होकारात बदलेल का? ती स्वतःच्या हृदयाचं ऐकून व्योमला निवडेल का? जाणून घेण्यासाठी वाचत राहा... धन्यवाद.


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →