Login

धोंड्याच्या अंगठीचे रहस्य - भाग १

धोंड्याच्या अंगठीचे रहस्य आणि स्वतःला शोधलेला मार्ग
“ कुठे गेली पण माझी अंगठी?”

“ काय हे चेतन? अंगठी सापडत नाही म्हणून इतका आरडा ओरडा?” आई म्हणाली.

“ हिच्या घरच्यांनी यावर्षी धोंड्यासाठी म्हणून दिली होती सोन्याची अंगठी.. इतक्या वर्षांत पहिल्यांदा काहीतरी चांगलं दिलं त्यांनी..” चेतन तावातावाने बोलला.

“ काय? नक्की सोन्याची होती ना ती अंगठी? नाही म्हणजे हिच्या घरी अठरा वर्षे दारिद्र्य.. म्हणून विचारलं! बाकी काही नाही.” आई म्हणाली..

“ हो. सोन्याचीच होती ती अंगठी..” आरती म्हणाली.
आपल्या नवऱ्याचं असं वागणं आरतीला काही नवीन नव्हतं.

“ हम्म.. स्वतःच्याच माहेरच्या लोकांचीच बाजू घेणार तू.. जसं काही मोठं घबाड आणते दरवेळी तिकडून येताना..” सासूबाई म्हणाल्या.

सासूबाईंचे बोलणे आता आरतीच्या मनाला खूप लागले.

“ का? दरवेळी आणत नाही मी बरंच सामान तिकडून? भाजीपाला, किराणा सामान आणि काय काय..”

“ए जास्त बोलू नकोस. हल्ली फारच जीभ चरचर करते आहे तुझी.. त्या फोनवर काय करत असते कोणास ठाऊक? ए नीट ऐकुन घे, माझ्यासोबत नीट राहायचं. मी सांगेन ते करायचं आणि मला पाहिजे ते तेव्हा तेव्हा द्यायचं.. नाही तर तुला माहितीये मी काय करू शकतो ते..”

चेतनची ही एकच धमकी ऐकून ऐकून आरती पुरती खजील व्हायची आणि रात्रीचा तो शहारा आणणारा कार्यक्रम तिला आठवू लागे; त्यामुळे ती पुन्हा गप्प बसत असे.

“ पण मी म्हणते, नक्की आठव ना तू, कुठे ठेवली ते?” सासूबाई आपल्या मुलाला समजुतीच्या सुरात विचारू लागल्या कारण त्याही चेतन इतक्याच लोभी होत्या.

“ आई, मी व्यवस्थित ठेवली होती अंगठी. नक्कीच त्या फोनवाल्या हिरोला देऊन टाकली असेल हिने..” चेतन आरतीकडे तिरस्काराने बघत म्हणाला.

“ फोनवाला हिरो? आरती काय भानगड आहे ही?” सासूबाईंचा पारा आता आणखीनच चढला.

“ आई, ही ना बराच वेळ फोनवर कोणाशी तरी चॅटिंग करत असते.” चेतन म्हणाला.

“ अच्छा! तरीच म्हणते आजकाल हिची जीभ एवढी चरचर का करते ते.. काय गं ए भवाने, कोण शिकवतं तुला असं वागायला? खरंच दिली का तू त्या फोनवाल्याला अंगठी?”

आरतीच्या संयमाची हद्द आता पार झाली.तिला फोन वरील ते चॅटिंग आठवू लागले,
" अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. आरती,तू तुझे कंट्रोल स्वतःच्या हातात घे. तू काही मेणाचा पुतळा नाहीस किंवा दुसऱ्याच्या हातातली खेळणीतील बाहुली देखील नाहीस. तुझी स्वतःवर सत्ता ठेवून रहा. उठ,उभी राहा.."

कोण असेल असे आरतीला सांगणारे? खरंच आरतीने ती अंगठी याच चॅटिंग करणाऱ्या व्यक्तीला दिली असेल का?
पाहुया पुढील भागात..

क्रमशः

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →