Login

शेवटची इच्छा

His Last Wish
एप्रिल'२६, लघुकथा स्पर्धा
कथा शीर्षक -अंतिम इच्छा
लेखिका - स्वाती बालूरकर, सखी
"जेलमध्ये फाशी देण्यापूर्वी कैद्याला विचारतात ना, शेवटची इच्छा? अंतिम इच्छा काय आहे, तशी मला कुणी विचारावी?मी काय सांगेन माहित आहे का?"
आज श्रीकांतचा हा मेसेज येऊन तासभर झाला होता आणि अन्वेषा ने तो आता पाहिला. अबोल्यानंतर दहाव्या दिवशी आलेला हा त्याचा एकमेव मेसेज होता. तिचा फोन स्विच ऑफ झाला होता आणि तिला मेसेजबद्दल कळलंच नव्हतं. कामात व्यस्त होती.
गेल्या आठ दिवसात त्याचा गुड मॉर्निंग मेसेज नव्हता. दोन चार दिवस खूपच काळजी वाटली. त्याचा मेसेज नाही, तिच्या मेसेजला उत्तर नाही. सहा महिन्यांपासून न चुकता तो सकाळी गुड मॉर्निंग , शुभ सकाळ असेच काही सुंदर विचार पाठवत असायचा. एरवी उगीच कोणीतरी तिला गुड मॉर्निंग टाकलेलं आवडायचं नाही पण याचे विचारच वेगळे होते आणि का कुणास ठाऊक पण सवय लागली होती. प्रेम, ओलावा या सगळ्या गोष्टींपेक्षा एका विशिष्ट वयात एखाद्या माणसाची, निरोपाची किंवा फोनची सवय लागली आणि तसे एखाद्या दिवशी घडले नाही तर त्रास होतो. तशीच आज सकाळी तिला काळजी वाटायला लागली होती. आज त्याचा मेसेज न येता पूर्ण आठ दिवस झाले होते आणि सकाळी त्याचा विचार करण्यापासून स्वतःला थांबवू शकली नाही. त्याचा मेसेज येणं म्हणजे त्यांची खुशाली आणि मेसेज आला नाही म्हणजे नक्की खुशाली नाही. नक्कीच काहीतरी झालं आहे, असं वाटलं. इतका विश्वास निर्माण झाला होता त्याच्याबद्दल.
ती अशा एका माणसाची काळजी करत होती ज्याला तिने पाहिलेही नव्हतं, पण एक आत्मिक नातं तयार झालं होतं. का ? माहित नाही.
सामाजिक माध्यमांत मेसेंजर वर बोलणारा तो तिचा समदुःखी मित्र होता, आयुष्यात तिला भेटलेला पहिला सज्जन पुरुष! का कुणास ठाऊक गेल्या काही वर्षात तिचे असे मत तयार झाले होते की पुरुष मुळी मैत्रीच्या लायकीचे नसतात. म्हणजे प्रेम दिले तर ते सांभाळता येत नाही. . . हे तिच्या परदेशात राहणाऱ्या नवऱ्याकडून कळलेच होते. तो तिकडे गेला आणि डिस्टन्स रिलेशन राहील असं म्हणाला, पण ते टिकलं नव्हतं. ती एकाकी पडली होती तो मात्र रंगला होता तिकडे.
गेल्या दोन वर्षात स्वतःचा वेळ घालवण्यासाठी ते सामाजिक माध्यमावर ऍक्टिव्ह राहायला सुरुवात केली होती. रांगोळी खूप छान काढायची. रोज काढलेल्या रांगोळीची पोस्ट टाकायची. खूप संपर्क वाढले कितीतरी मैत्रीण झाल्या. एक अनुभव तिला असा आला की स्त्रीची प्रोफाइल दिसली की फेसबुक असो की इंस्टाग्राम, फ्रेंड रिक्वेस्ट चा पाऊस पडतो. डीपी सुंदर आहे या कॉम्प्लिमेंट पासून सुरू झालेला संवाद इन बॉक्स मध्ये कधी फोननंबर मागण्या पर्यंत येतो कळत नाही. आणि चुकून फोन नंबर दिला तर मग कॉल सुरू होतात. अगोदर साधे कॉल आणि मग नंतर व्हिडिओ कॉल. या सगळ्याची तिला जाणीव नव्हती असं नाही पण ती यात जास्त पडली नाही. मेसेजेस कडे दुर्लक्ष करत राहिली.
कसा कोण जाणे हा श्रीकांत एकटा तिला हजारो मध्ये वेगळा पुरुष मित्र म्हणून भेटला होता. आयुष्यात एकटी असणाऱ्या तिला फेसबुक हा विरंगुळा होता. वाचनात आणि पोस्ट पाहण्यात बराच वेळ चांगला जायचा. हळूहळू मेसेज मधून ओळख वाढली सवय झाली त्याने कधीच तिचा फोन नंबर मागितला नाही. एक दिवस तिलाच टाईप करण्याचा कंटाळा आला म्हणून तिने त्याचा फोन नंबर मागितला आणि त्याच्याशी कॉलवर बोलली.
इतका सौम्य, शांत आणि संभावित माणूस , स्त्रियांचा आदर करणारा. . . अस्तित्वात आहे. जगात असेही पुरुष असतात याचं तिला आश्चर्य वाटून गेलं. तिला नेहमी दुय्यम दर्जा देऊन भोग वस्तू मानणाऱ्या नवऱ्यापेक्षा या ऑनलाइन मित्राबद्दल तिला प्रचंड आदर वाटत होता.
आवडीची गाणी सारखी, जुन्या सिनेमांची चर्चा, कॉलेजमधले काही किस्से सांगणे, अशा गोष्टी व्हायच्या गप्पांमध्ये आठवड्यात दोन-तीन वेळा तरी बोलणं व्हायचं. निखळ आनंद मिळायचा. तिलाही हलक वाटायचं. कुठेतरी तिच्यावर आधारित झालेला आहे, भावनिकरित्या गुंतत आहे हे कळत होतं. पण तिने त्यालाही थांबवलं नाही आणि स्वतःलाही नाही. कबूल कधीच काही केलं नाही पण तो जेव्हा तिची मनसोक्त स्तुती करायचा, ती आदराने ऐकून घ्यायची.
तो देखील कधीच वावग्या शब्दात काही बोलला नाही आणि तिचं हे मर्यादित राहणं त्याच्या मनाला खूप भावत होतं. चित्रपट मायानगरीत कशा प्रकारच्या स्त्रिया असतात आणि थोडी तारीफ केली त्या गळ्यात पडतात हे अनुभव त्याला आलेले होते. त्याने ते क्षेत्र सोडले होते. त्याने सौम्य शब्दात प्रशंसा केली की ती ऐकून घ्यायची. अशी हळू हळू सोनचाफ्यासारखी सुगंधित होणारी मैत्री आणि मंद प्रेमाची भावना. अगदीच अपेक्षारहित.
त्याचा मेसेज नाही आला तरीही ती मात्र रोज मेसेजमधून चौकशी करत होती, कॉल करायचा नाही असा नियम तिनेच बनवला होता. तिच्या त्या मेसेज चे उत्तर नवव्या दिवशी आले.
" आता बरा आहे , तब्येत थोडी अशी. . , बिघडली होती."
" अरे एक मेसेज टाकायचा न? काय झालं होतं?" ती चिंतेत होती.
" काळजी करू नको, सगळ्या टेस्ट केल्या, रिपोर्ट मध्ये. . . म्हणजे. . . कॅन्सर निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडा घाबरलो आहे."
काहीच बोलली नाही. मनात विचार आला- देव चांगला माणसांचेच परीक्षा का बघतो? आता यांना कसं जाऊन सांग घाबरू नका. कॅन्सर म्हटल्यावर तर कोणालाही भीती वाटणारच ना!
"या जन्मात आपले भेट होईल असं वाटत नाही." त्याच्या या वाक्याने ते खूप दुःखी झाली. त्याच्याशी खंबीरपणे बोलायचं भावनिक व्हायचं नाही असा विचार करून तिने मेसेज टाकला,
"मला एकदा भेटल्याशिवाय तुम्ही कुठे जाऊ शकणार नाही ट्रीटमेंट घ्या, पत्ता पाठवा मी भेटायला येते."

" आपण कधीच एकमेकांना भेटायचं नाही हे तूच ठरवलं होतंस मग आता नियम का मोडते आहेस?" त्याने आठवण करून दिली.

" नियम गेले चुलीत! तुम्ही पत्ता पाठवा ट्रीटमेंट सुरू करा, मी तुमच्यासोबत आहे शरीराने तिथे नसले तरी मनाने तुमच्या सोबतच आहे."
"आता आयुष्याचा भरोसा वाटत नाही म्हणून सांगून टाकतो त्याला सहा महिन्यांपासून तू माझ्यासोबतच आहेस , तुझ्यासोबत मी एक आभासी आयुष्य जगतो आहे. डोळे उघडतो तेव्हा सकाळी तू बाजूलाच असतेस, लवकर उठतेस आणि माझ्या अंगावर ब्लॅंकेट टाकून उठून निघून जातेस. माझ्या दारात तुझ्या हाताने काढलेली सुंदर रांगोळी असते. अपार्टमेंटमधील सगळे लोक जाता येता पाहत असतात रांगोळीला. चहा कॉफी वगैरे वेळेत असतं तुझं. जेवणात ताट वाढणे किती साग्र संगीत , स्वच्छता फार आवडते तुला. पसारा केला की मलाही रागावतेस. देवपूजा करायला लावतेस मला, आणि मी बाहेर पडताना चांदण्याचा टिळा लावतेस माझ्या कपाळी. जगून घेतलं आहे मी तुझ्यासोबत कल्पनेचं आयुष्य. . . आता काही झालं तरीही चालेल."
त्याने लिहिला इतका मोठा मेसेज वाचून आयुष्याच्या डोळ्यात अश्रू आले. काय बोलावं या माणसाला?
"मी येणार आहे तुमची सेवा करीन, वेळेवर जेव्हा वेळेवर औषध घ्या. आता पाठवा बरं तुम्ही! कशी मी तुम्हाला इतक्या मोठ्या शहरात?"
दिवसभर तिने वाट पाहिली त्याचा मेसेज आला नाही की त्याने पत्ता पाठवला नाही, त्याची उगीचच घाबरा घबरा होत होता.

तिच्या मेसेजने जणु संजीवनी चे काम केले होते. येते म्हणाली हेच त्याच्यासाठी खूप होतं.

आणि आता हा आलेला मेसेज पाहून ती खूपच विचारात पडली. "जेलमध्ये फाशी देण्यापूर्वी कैद्याला विचारतात ना, शेवटची इच्छा? अंतिम इच्छा काय आहे, तशी मला कुणी विचारावी?मी काय सांगेन माहित आहे का?"
" श्रीकांत हे काय, असा मेसेज पाठवतो का कुणी? बोला ना? काय झालं?"
"ऐकून घेशील माझी शेवटची इच्छा?" त्याने विचारलं.
" सांगा तर खरं."
"आयुष्याच्या या वळणावर मला आता कशातच रस राहिला नाही. कॅन्सरने जर माझं काही बरं वाईट झालं तर एकच इच्छा आहे. . . मी तुला पहावं . अगदी शेवटचा श्वास घेताना तुझा चेहरा माझ्यासमोर असावा, इतकच काय तुझ्या कुशीत मरण आलं तर माझ्यासारखा भाग्यवान मीच!"
" श्रीकांत, नका ना बोलू असं. . ! तुम्हाला काही होणार नाही! मी येते आहे."
आता त्याने पत्ता पाठवला.
दुसऱ्या दिवशीच सगळी तयारी करून ती त्याच्या शहरात जाण्यासाठी निघाली, त्याच दिवशी तिचे सासू-सासरे तिला भेटण्यासाठी आले. अक्षय ने आलेल्या त्या म्हातार्‍यांना नाराज करून तिला निघता आलं नाही ते आठवड्यावर तिच्यासोबत राहिले. त्यांनी त्यांच्या मुलाचं आणि अन्वेषाचं लग्न वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण त्या नात्यात काहीच राम राहिला नव्हता त्यामुळे नाईलाजाने त्यांनी घटस्फोटासाठी परवानगी दिली आणि ते परत गेले.
ती सोबत येऊन राहणार या एका विचाराने तो खूप सकारात्मक झाला. मुळात त्याच्या नंतर केलेल्या टेस्टमध्ये कॅन्सर निघालाच नाही. तिच्या येण्याच्या विचारानेच जणू औषधांनी संजीवनीचे काम केले आणि तो महिन्याभरात ठीक झाला.
तू पूर्णतः व्यवस्थित आहे असे शेवटचे रिपोर्ट आले आणि रिपोर्ट पाहत असतानाच दरवाजा लोटून ती आत आली.

ती दारात त्याला पहात तशीच उभी होती, पहिल्यांदा दोघे एकमेकांना पहात होते. ती समोर आली आणि तो तिला एकटक तसाच पाहत राहिला.

पलंगावर पडल्या पडल्याच म्हणाला," हकीकत ख्वाब से भी हसीन है! हे भगवान ,! काश ये मेरी आखरी सांस होती. . . काश ये मेरी अंतिम इच्छा पुरी हो जाती!"
न राहून ती पुढे आली आणि तिने त्याच्या तोंडावर आपला तळवा ठेवला. त्या दोघांच्या डोळ्यातले भाव पाहून केअर टेकर खोलीच्या बाहेर निघून गेला.
दोघेही काहीच बोलत नव्हते, डोळ्यात आनंदाश्रु होते. कुठल्यातरी जन्मी दुरावलेले दोन जीव या जन्मी भेटत होते असे ते दृश्य होते.

©® स्वाती बालूरकर देशपांडे, सखी

दिनांक २८. ०४.२०२६
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →