Login

शेवटचा कॉल भाग 6

एक भयकथा
भाग 6

"काय लोक आहेत हे! काहीही बोलतात. काळी जादू म्हणे? ही स्क्रिप्ट आता बॉलिवूडवाल्यांनी पण सोडून दिलीये," तो स्वतःशीच पुटपुटला आणि तिरस्काराने हसला.

त्याला त्या काकांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या गंभीर चेहऱ्याचं जास्त हसू येत होतं. आजच्या काळात, विज्ञानाच्या युगात अशा गोष्टींवर कोण विश्वास ठेवणार? त्याने एक उपरोधिक सुस्कारा सोडला आणि इमारतीच्या गेटमधून आत शिरला. त्याच्या लेखकी डोक्याला आता हे सगळं एक 'ओव्हर-ड्रामॅटिक' सिनेमा वाटू लागलं होतं.

५ व्या मजल्यावर पोहोचल्यावर तो आपल्या फ्लॅटमध्ये शिरला. घरात शिरल्यावर त्याने सहज सवयीप्रमाणे लाईट लावले. घर अगदी तसंच होतं जसं तो सोडून गेला होता. काळ्या जादूच्या नावाखाली त्याने जे काही ऐकलं होतं, त्यापैकी एकही खुण तिथे नव्हती. ना कसला वास, ना काही विचित्र वस्तू.

त्याने पुन्हा आपला लॅपटॉप उघडला आता मात्र त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह होता.

त्याने लिहिलं:
'आणि शेवटी त्या जागेचा भूतकाळ त्याला समजला. पण आजच्या काळात त्यावर कोण विश्वास ठेवणार? त्याला हे माहीत नव्हतं की काही गोष्टी अशा असतात, जिथे मानवी तर्क चालत नाहीत. निसर्गाच्या आणि विज्ञानाच्या पलीकडेही एक जग असतं, जे फक्त जाणवून घेता येतं'

रात्री तो शांतपणे झोपला होता. त्या गूढ शांततेत कसलातरी आवाज आल्याचा भास झाला. काहीसा कुबट वास त्याच्या नाकात शिरला'

इतकं लिहून त्याचे हात कीबोर्डवरच थांबले. लॅपटॉपचा तो निळसर प्रकाश त्याच्या डोळ्यांत रिफ्लेक्ट होत होता. त्याने एक दीर्घ श्वास घेतला, पण त्याच क्षणी त्याचे डोळे विस्फारले.

कोणीतरी नखांनी भिंतीवर ओरखडल्यासारखा आवाज त्याच्या अगदी जवळून आला. त्याने दचकून मान फिरवली आणि आवाजाच्या दिशेने पाहिलं, पण तिथे फक्त पांढरीशुभ्र भिंत होती. आवाज एकदम बंद झाला.

"भास व्हायला लागलेत तुला पण... बहुतेक काकांचं बोलणं डोक्यात जास्त शिरलंय," तो स्वतःशीच हसत म्हणाला. त्याने स्वतःला समजावलं की अतिलेखनामुळे आणि त्या जुन्या कथा ऐकल्यामुळे डोकं थकलं असावं.

"एक कडक चहा घेतला पाहिजे, म्हणजे फ्रेश वाटेल," असं म्हणून तो किचनच्या दिशेने चालू लागला.

किचनमध्ये शिरताच त्याने लाईट लावला. गॅसवर पातेलं ठेवून त्याने पाणी ओतलं. पाणी उकळू लागल्यावर त्याने चहापत्ती टाकली. चहाचा सुगंध सुटल्यावर त्याला थोडं बरं वाटलं.

तो गॅसकडे पाठ करून कप काढायला वळला आणि एक थंड हवेची झुळूक त्याला स्पर्शून गेली तसं त्याच्या अंगावर काटाच आला.

क्रमशः

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →