Login

शेवटचा कॉल

एक भयकथा
भाग 5

संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले होते. सूर्यास्त झाल्यामुळे वातावरणात एक प्रकारचा धूसरपणा पसरला होता. तो मुद्दामच हातातील मोबाईलमध्ये काहीतरी पाहत, 'मी सहज फेरफटका मारायला आलोय' असा आव आणत खाली आला.

त्याने नजर फिरवली, तर तेच काका एका बाकावर एकटेच बसलेले दिसले.

तो हळूच त्यांच्या दिशेने सरकला आणि त्यांच्या शेजारी जाऊन बसला. काकांनी त्याच्याकडे पाहिलं, पण ते काही बोलले नाहीत.

"काय काका, आज हवा कशी शांत आहे ना?" त्याने संवादाची सुरुवात करण्यासाठी विचारलं.

काकांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्याकडे न पाहताच म्हणाले, "ही शांतता वादळापूर्वीची असते रे बाबा अजूनही वेळ गेली नाहीये, सोड ते घर"

तो थोडा गंभीर झाला आणि म्हणाला, "काका, तुम्ही कालपासून मला घाबरवताय. पण नेमकं तिथे झालंय काय? मला खरं काय ते सांगा. मी लेखक आहे, मला सत्य समजून घ्यायची सवय आहे."

काकांनी दीर्घ श्वास घेतला आणि आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून घेतली. ते दबक्या आवाजात सांगू लागले, "अरे पोरा, तो फ्लॅट नाही, ते एक जिवंत नरक आहे. काही वर्षांपूर्वी तिथे एक स्त्री एकटीच राहायची. दिसायला साधी, पण तिचं वागणं अजब होतं. असं म्हणतात की तिला 'काळी जादू' करायची सवय होती."

हे ऐकताच त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. तो एकाग्रतेने ऐकू लागला.

काका पुढे म्हणाले, "रात्रीच्या वेळी त्या बंद खोलीतून कसले तरी मंत्रोच्चार ऐकू यायचे. लिंबाचा, कुंकवाचा आणि जळलेल्या केसांचा वास पूर्ण मजल्यावर पसरायचा. लोक तक्रार करायला घाबरायचे. पण एके दिवशी अचानक ती गायब झाली. कोणी म्हणतं तिने स्वतःचाच बळी दिला, तर कोणी म्हणतं ती आजही तिथेच आहे फक्त आपल्याला दिसत नाही. तेव्हापासून तिथे जो कोणी राहायला आला, त्याला 'ती' सुखाने राहू देत नाही. कुणाचा अपघात झाला, तर कुणी झोपेतच कायमचं शांत झालं!"

हे सगळं ऐकताना त्याला सकाळी आपल्या घरात झालेला तो 'कागद चुरगळण्याचा' आवाज आठवला.

"पण काका, आता तर तिथे काहीच नाहीये. घर साफ आहे," तो स्वतःची समजूत काढत म्हणाला.

काका त्याच्या खांद्यावर हात ठेवून गंभीरपणे म्हणाले, "दिसतं तसं नसतं रे! काळी जादू करणाऱ्या व्यक्ती गेल्या तरी त्यांच्या पाऊलखुणा आणि त्यांनी मागे सोडलेली 'शक्ती' तिथेच असते. तू लेखकाच्या जोशात तिथे गेलायस खरा, पण जपून रहा कारण तिला नवीन शिकार खूप आवडते."

काका उठून निघून गेले, पण त्यांचं ते शेवटचं वाक्य त्याच्या डोक्यात एखाद्या खिळ्यासारखं ठोकलं गेलं.

क्रमशः

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →