Login

शेवटचा कॉल भाग 4

एक भयकथा
भाग 4

हे ऐकताच वॉचमनच्या हातातील वर्तमानपत्र खाली पडलं त्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले.


"नाही साहेब,मला काही माहिती नाही. तुम्ही सुखाने रहा तिथे काही होणार नाही," वॉचमन अडखळत म्हणाला आणि आपली नजर चोरू लागला.

"काका,तुमची नजर सांगतेय की तुम्हाला काहीतरी माहिती आहे. मला भीती वाटत नाहीये, फक्त सत्य जाणून घ्यायचंय" त्याने पुन्हा विचारलं.

"साहेब, मला तोंड उघडायची परवानगी नाहीये. तशी कडक सूचना आहे आम्हाला नोकरीचा प्रश्न आहे हो"तो दबक्या आवाजात म्हणाला आणि बाजुला गेला.

तो पुन्हा आपल्या फ्लॅटच्या दिशेने निघाला. त्याच्या डोक्यात एकच विचार होता, 'काहीही झालं तरी त्या काकांना गाठलं पाहिजे. ते या बिल्डिंगमधले जुने रहिवासी वाटतात, त्यांना सगळं नक्कीच माहित असणार.' संध्याकाळी ते खाली फिरताना दिसले की त्यांना बोलतं करायचं, असं त्याने मनोमन ठरवलं.

तो विचार करत घरात शिरला काल रात्रीपासून आतापर्यंत जवळपास अठरा वीस तास झाले होते, पण त्याला घरामध्ये एकदाही काही अजब किंवा भयावह जाणवलं नव्हतं. उलट त्याला तिथे खूप शांत आणि प्रसन्न वाटत होतं. तो मनातल्या मनात हसला, "कधीकधी लोकांच्या अफवाच कथेपेक्षा जास्त भयानक असतात."

त्याने पुन्हा लॅपटॉप उघडला. स्क्रीनच्या उजेडाने त्याच्या चेहऱ्यावर एक चमक आली. कथेचा पुढचा भाग सुचवण्यासाठी त्याने डोळे मिटले आणि कालच्या अनुभवांना शब्दांत गुंफायला सुरुवात केली.

"त्याला सांगण्यात आलं होतं की या घरात राहणं धोक्याचं आहे, पण त्याला मात्र तिथे एक वेगळीच शांतता लाभली होती. लोकांच्या नजरेत जे भीतीचं सावट होतं, ते कदाचित त्यांच्या स्वतःच्या कल्पनेचा खेळ असावा... किंवा कदाचित ते 'काहीतरी' योग्य वेळेची वाट पाहत होतं."

लिहिता लिहिता त्याचं लक्ष लॅपटॉपच्या बाजूला असलेल्या खिडकीकडे गेलं. दुपारची वेळ होती, पण अचानक बाहेरून ढग दाटून आले आणि घरातला उजेड थोडा कमी झाला. हवेत एक विचित्र गारवा भरून राहिला.

'असो, संध्याकाळी काकांशी बोलल्यावर कथेला खरा क्लायमॅक्स मिळेल,' असं पुटपुटत त्याने एक दीर्घ श्वास घेतला. पण त्याच क्षणी त्याला घराच्या कोपऱ्यातून, जिथे त्याचं सामान रचून ठेवलं होतं, तिथून एक हलकासा आवाज आला. जसं कोणीतरी कागद चुरगळतंय.

त्याने लॅपटॉपवरून नजर हटवली आणि त्या कोपऱ्याकडे पाहिलं. तिथे काही जुने वर्तमानपत्रं आणि त्याचे रफ पेपर्स ठेवलेले होते. वारा तर नव्हता, मग ते कागद कसे हलले? त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा लिहायला सुरुवात केली. पण आता त्याचं लक्ष कथेपेक्षा जास्त 'संध्याकाळ कधी होतेय' याकडे लागलं होतं.

क्रमशः



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →