Login

शेवटचा कॉल भाग 3

एक भयकथा
भाग 3

दुसऱ्या दिवशी सकाळी तो थोडा फ्रेश होण्यासाठी बाहेर गेला होता.
सामान घेऊन इमारतीच्या आवारात शिरलाच होता, तितक्यात समोरून येणाऱ्या एका काकूंनी त्याला थांबवलं.

त्यांच्या हातात पूजेचं ताट होतं आणि त्या मंदिरातून येत असाव्यात असं वाटत होतं. त्यांनी त्याला वरून खाली न्याहाळलं आणि विचारलं, "काय रे बाबा, नवीन राहायला आलास होय या बिल्डींगमध्ये?"

"हो काकू, कालच आलो," त्याने हसून उत्तर दिलं.

"कुठल्या मजल्यावर?" काकूंचा पुढचा प्रश्न तयारच होता.

"पाचव्या मजल्यावर... ५०२ मध्ये," त्याने सांगितलं.
हे ऐकताच त्यांच्या हातातलं ताट थोडं थरथरल्यासारखं झालं.

त्यांनी आजूबाजूला पाहिलं आणि अगदी जवळ येऊन विचारलं, "अरे पोरा, कालची रात्र नीट गेली ना? काही अजब-गजब आवाज वगैरे नाही ना आले?"
"नाही काकू, एकदम शांत होतं सगळं. उलट मला खूप छान झोप लागली," तो म्हणाला.

"अरे, ते घर कित्येक महिन्यांपासून बंद होतं. तिथल्या लोकांबाबत जे ऐकलंय ते चांगलं नाहीये. काल तुला कोणी सांगितलं नाही का? तिथे राहणं धोक्याचं आहे."

तो पुन्हा एकदा मनातल्या मनात हसला. त्याला वाटलं, 'काल ते काका आणि आज या काकू... हे लोक म्हणजे माझ्या कथेसाठी चालते-बोलते संदर्भच आहेत.'

त्याने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, "काकू, मी लेखक आहे. अशा अफवांनी मी घाबरत नाही, उलट मला लिहायला नवीन विषय मिळतात. तुम्ही काळजी नका करू."

काकू मात्र समाधानी नव्हत्या. त्या निघताना पुटपुटल्या, "तुला वाटतंय तसं हे सोपं नाहीये बाळा. देवाला हात जोडत जा आणि शक्य होईल तितक्या लवकर दुसरी सोय बघ. तिथे काहीतरी असं आहे, जे कोणालाच सुखाने राहू देत नाही."

कालपासून तिसऱ्यांदा त्याच गोष्टी कानावर पडल्यामुळे आता मात्र त्याच्यातील लेखकाची जिज्ञासा जागी झाली होती. भीतीपेक्षाही, 'या अफवांचं मूळ नेमकं काय आहे?' हे शोधून काढण्याची ओढ त्याला लागली होती.

तो आपल्या फ्लॅटमध्ये परतला आणि सामान ठेवून शांतपणे विचार करू लागला. जर ५०२ नंबरच्या फ्लॅटबद्दल पूर्ण परिसरात इतकी चर्चा आहे, तर या इमारतीचा वॉचमन किंवा जुने रहिवासी नक्कीच काहीतरी ठोस सांगू शकतील.

त्याने ठरवलं की माहिती काढण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. तो खाली आला आणि पार्किंगच्या कोपऱ्यात असलेल्या सिक्युरिटी केबिनपाशी गेला. तिथे एक मध्यमवयीन वॉचमन खुर्चीवर बसून वर्तमानपत्र वाचत होता.

"राम राम काका" त्याने सुरुवात केली.

वॉचमनने चष्म्याच्या वरून त्याच्याकडे पाहिलं, "राम राम साहेब... बोला, काही काम होतं?"

"नाही, सहज विचारत होतो... मी कालच ५०२ मध्ये शिफ्ट झालोय. पण येता-जाता लोक त्या फ्लॅटबद्दल काहीतरी बोलतायत. काय प्रकरण आहे नक्की?"

क्रमशः

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →