Login

शेवटचा कॉल भाग 2

एक भयकथा
भाग 2

५ व्या मजल्यावर पोहोचल्यावर लिफ्टचा दरवाजा उघडला. समोर पूर्ण अंधार होता, फक्त त्याच्या फ्लॅटच्या दारापाशी एक छोटा झिरमिरीत प्रकाश दिसत होता.
त्याने खिशातून चावी काढली आणि कुलूप उघडलं. आत पाऊल टाकताच त्याला जाणवलं की बाहेरच्या वातावरणापेक्षा इथलं तापमान खूपच कमी होतं.

त्याने आपलं आधीच नीट लावलेलं सामान एकदा नीट न्याहाळलं आणि थोडी साफसफाई करून तो लिहायला बसला. खिडकीतून बाहेर आता पूर्ण अंधार झाला होता आणि शहरापासून दूर असल्याने तिथे भयाण शांतता होती.

काकांच्या बोलण्यामुळे त्याच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू झालं होतं. त्याला त्याच्या नवीन भयकथेसाठी एक जबरदस्त प्लॉट सापडला होता. त्याने उत्साहाने लॅपटॉप उघडला आणि त्याचे बोटं कीबोर्डवर चालू लागली.

थोड्या वेळात त्याने लॅपटॉपवर ते शेवटचं वाक्य टाईप केलं 'आणि तो शांतता शोधत अजानतेपणी त्या ठिकाणी आला पण त्याला कल्पनाही नव्हती की ज्या घरात तो राहतोय तिथे त्याला शांतता मिळणार होती कायमची!'

"चला, हा भाग लिहून झाला. बाकी पुढे लिहिता येईल, आता भूक लागलीय," तो स्वतःशीच पुटपुटला आणि लॅपटॉप बंद करून किचनकडे वळला.

त्याने पटकन गॅस पेटवला आणि मॅगी बनवायला घेतली त्या वासाने त्याला थोडं रिलॅक्स वाटलं.

किचनच्या खिडकीतून बाहेर पूर्ण काळोख दिसत होता. लांबवर कुठेतरी एका कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता, पण घरात मात्र एकदम शांतता होती. तो मनातल्या मनात विचार करू लागला, 'काका तर बोलत होते ती जागा चांगली नाहीये वगैरे वगैरे, पण इथे तर असं काही वाटत नाही. हे म्हातारे लोक पण काहीही बोलतात. एखाद्या जुन्या गोष्टीचा उगीच बाऊ करून ठेवतात आणि नवीन आलेल्या माणसाला घाबरवतात.'

त्याने गरमागरम मॅगी एका प्लेटमध्ये काढली आणि हॉलमधील डायनिंग टेबलवर आणून ठेवली. मॅगी खाताना तो फोनवर एखादा व्हिडिओ पाहण्याचा विचार करत होता, पण इथे नेटवर्कची रेंज जरा कमीच होती. त्याने विचार केला की आजची रात्र जरा लवकरच झोपावं, सकाळी फ्रेश झाल्यावर कथेचा पुढचा भाग अधिक वेगाने सुचेल.

त्याने बेडरूममध्ये जाऊन बेड नीट केला आणि लाईट बंद केली. खिडकीतून पडणाऱ्या चंद्राच्या प्रकाशात खोली थोडी उजळून निघाली होती. त्याने डोळे मिटले आणि झोपेची वाट पाहू लागला आजचा दिवस प्रवासाचा असल्याने त्याला लगेच झोप लागली.

क्रमशः


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →