Login

तरतूद भाग .. १

भविष्याची तरतूद करण्यासाठी स्वतःत केलेल्या बदलाची कथा.
“नोकरी करते म्हणजे काही उपकार करत नाही. कोणी तिला नोकरी कर म्हणून जबरदस्तीही केली नाही. बरं जे कमवते त्यातला एक छदामही घरी देत नाही. तरी तू तिला इतकी का दबून असतेस तेच कळत नाही.” दिवेलागणीची वेळ होताच सुमित्राची घरी जाण्यासाठीची चाललेली चुळबूळ बघून उषाताई कडाडल्या.

“हो ना! सुमित्रा अजूनही सासुरवाशीण असल्यासारखीच वागते.” नंदा म्हणाली तश्या सगळ्या मैत्रिणी टाळ्या देत एकमेकींकडे बघत खुदुखुदु हसू लागल्या.

“अशाने ती तुझ्या डोक्यावर बसेल.” अनिताने नंदाची री ओढली.

“बसेल काय ऑलरेडी बसलीच आहे. बसून चांगली मिऱ्या वाटत आहे.”.

“इतक भोळभाबड वागून चालत नाही. कधी कळणार तुला?”

एकामागोमाग सगळ्या मैत्रिणी सुमित्रावर तुटून पडल्या.

अरिहंत सोसायटीतील समवयस्क महिलावर्गाचा संध्याकाळी तास दोन तास सोसायटीच्या आवरत गप्पाटप्पा करण्याचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा शिरस्ता होता. तो त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातील विरंगुळ्याचा भाग होता.

पण सुमित्राताईंच्या एकुलत्या एक मुलाच संकेतच लग्न झाल्यापासून ताईंनी मैत्रिणींच्या गप्पात सामील होणं, संध्याकाळी खाली येऊन बसणं, बोलणं जवळजवळ बंदच करून टाकलं होतं. आल्यातरी “उशीर झाला, साडेसहा होत आले, चला निघते मी” हे त्याचं नित्याचं पालुपद झालं होतं.

सुमित्राताईंच्या सुनेच्या अर्पिताच्या माहेरी सगळ्यांना रात्री लवकर जेवायची सवय होती. तिचे बाबा कामावरून यायच्या आत आईचा स्वयंपाक तयार असायचा. बाबा आले की साडेआठ नऊच्या आत सगळ्यांची जेवण व्हायची.

सुमित्राताईंच्या घरी याच्या अगदी विरुद्ध स्थिती होती. अर्पिताचे सासरे बापू चहाचे प्रचंड भोक्ते. कामावरून यायला कितीही उशीर झाला तरी घरी आल्यावर त्यांना चहा लागायचा म्हणजे लागायचाच. रिटायर्ड झाले तरी त्यांच्या सवयीमध्ये किंचितही फरक पडला नव्हता.

“अर्धा कप आल्याचा फक्कड चहा कर सुमा.” ते संध्याकाळी फिरून आल्यावर सुमित्राताईंकडे फरमाईश करायचे.

“निघताना तर घेतला होतात. जरा चहा कमी करा आता.” सुमित्राताई लटक्या रागाने त्यांच्यावर डोळे वाटरायच्या आणि थोड्यावेळाने घोटभर का होईना चहा पुढ्यात आणून ठेवायच्या.

संकेतसुद्धा बापूंसारखा चहाबाज. त्यालाही ऑफिसमधून आल्यावर चहा प्यायची सवय जडली होती. चहा बरोबर आपसूकच बिस्कीट, टोस्ट, चिवडा काहीतरी खाणं व्हायचं. लगेच भूक नाही या सबबीखाली जेवायला साडेदहा अकरानंतर बसलं तरी चालायचं. त्यामुळेच सुमित्राताईना मैत्रिणीच्या कंपूत आठ वाजले तरी रेंगाळता यायचं. पण लेकाच लग्न झालं आणि सगळ चित्रच बदललं.

माहेरी अर्पिताला ऑफिसमधून घरी आल्या आल्या हातात आयतं ताट मिळायचं. सासरी मात्र ती घरी यायची त्यावेळी चहाच आधण ठेवलेलं असायचं.

“किती उशिरा जेवता रे तुम्ही?” ऑफिसमधून आल्यावर चहा घ्यायच्या ऐवजी आपण लागलीच जेवायला बसत जाऊ ना.” एकदा वैतागून अर्पिता संकेतला म्हणाली.

“चल काहीतरीच काय? चहा घेतल्याशिवाय तरतरी येणार नाही. प्रवासाचा थकवा जाणार नाही. समजा मी आठला जेवलो तर रात्री बारा वाजता परत भूक लागेल मला.” संकेतने हसत हसत अर्पिताच बोलणं धुडकावून लावलं.

“मला सवय नाही रे उशिरा जेवायची.” अर्पिता काकुळतीला येऊन बोलली.

“मग तू जेऊन घेत जा की लवकर. तुला कोण नाही म्हणतंय? नवऱ्याआधी, सासू सासऱ्यांआधी जेवायचं नाही इतक्या बुरसटलेल्या विचारांच आपल्या घरात कोणीच नाही. तुला कोणी काही बोलणार नाही.” संकेतने आपल्यापरीने विषय संपवला.

‘स्वयंपाकाच तयार नसतो. जेवणार काय कपाळ? तुझी आई खाली गप्पा छाटत बसलेली असते.’ ओठावर आलेले शब्द मोठ्या प्रयासने अर्पिताने मागे फिरवले.

“आपण संध्याकाळच्या स्वयंपाकाला कमीत कमी पोळ्याना बाई लावायची का? तुम्हाला आराम पडेल.” स्वयंपाक तयार असेल तर लवकर जेवता येईल या उद्देशाने अर्पिताने सासूबाईंना चाचरत विचारले.

“काय गरज आहे? इन मीन चार माणसांचा तर स्वयंपाक असा कितीसा वेळ लागतो. काही नको.” अर्पितला काय म्हणायचे ते समजून न घेता सुमित्राताईंनी तिचे बोलणे धुडकावून लावले.

याच मातीत रुजायच, इथेच आपली पाळंमुळ घट्ट रोवायची म्हंटल्यावर इथल्या चालीरिती आत्मसात करायला हव्या म्हणत अर्पिताने वाद घालण्यापेक्षा आपली सवय बदलायच ठरवलं.

काहींच शरीर बदल पटकन स्वीकारतं तर काहींच नाही. अर्पिताच तेच झालं. उशिरा जेवल्यामुळे ॲसिडिटी वाढली. अपचन व्हायला लागलं, डोकं दुखू लागलं.

क्रमशः

©®मृणाल महेश शिंपी.


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →