जलद लेखन स्पर्धा- फेब्रुवारी-२०२६
विषय:- खरा गुन्हेगार
शीर्षक:- तपास
भाग:- ५ (अंतिम)
प्रधान हाॅस्पिटलमध्ये आल्यावर मोहिते दांपत्य लगेच त्यांना जितूला भेटण्यासाठी आर्जव करू लागले. त्यांना आश्वासन देऊन ते त्याला भेटायला गेले.
त्याला राजेंद्रचा मित्र आहे असे सांगून हसून त्याची विचारपूस केली. बोलतं झाल्यावर त्याला खरी ओळख सांगून त्यांनी त्याला किडनॅपरबद्दल विचारले.
तो म्हणाला,"पोलीस अंकल, ते खूप वाईट अंकल होते. त्यांनी मला बांधून ठेवले होते. काल रात्री मी शू शूचे निमित्त करून बाहेर आलो. मग त्याची नजर चुकवून पळत सुटलो. मग एका ठिकाणी माझा पाय अडकला आणि मी पडलो. पुढचे मला काही आठवत नाही."
"अच्छा, बेटा तू तर खूप ब्रेव्ह बच्चा आहेस. तू त्यांचे वर्णन सांगशील, ते कसे दिसत असतील ते? म्हणजे आम्ही त्याला पकडू शिक्षा देऊ." प्रधान त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले.
"साॅरी, अंकल. ते मला सांगता येणार नाही. त्यांनी चेहऱ्यावर मास्क घातला होता." तो चेहरा बारीक करून म्हणाला.
"ओके, डोन्ट वरी. आम्ही पाहू. तू आधी हे खाऊन घे आणि आराम कर." ते त्याला बिस्कीट पुढे करत म्हणाले.
"नको अंकल, माझे पप्पा आल्याशिवाय मी काही खाणार नाही. मला पप्पांना भेटायचं आहे." तो इवले तोंड करून त्यांना म्हणाला.
त्यांच्या काळजात चर्र झालं. त्यांनी घारेकडे एक नजर पाहिले. त्यांनाही वाईट वाटत होतं. ते कसेबसे त्याला समजावत म्हणाले,"बेटा, तुझे पप्पा अर्जंट कामासाठी बाहेरगावी गेलेत. तिथे रेंजचा इश्यू असल्याने त्यांचा फोनही लागत नाही. ते लवकर येतील. तू ब्रेव्ह आणि स्ट्राॅंग बच्चा आहेस ना. तुझे पप्पा येईपर्यंत तुलाच जादूचे प्रयोग करायचे आहेत ना. मग त्यासाठी तुझी तब्येत चांगली असायला हवी ना. चल थोडे खाऊन घे."
"हो ..हो, अंकल. मला पप्पांसारखा मोठा जादूगार व्हायचे आहे. स्ट्राॅंग आहे मी. तुम्ही खूप चांगले आहात, अंकल." तो त्यांना बिलगत म्हणाला.
ते मायेने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत होते.
एव्हाना रिटा, केतन आणि राघवही तिथे आले होते. प्रधान यांनी नजरेने त्यांना खुणावले. त्यांनी सर्वांनी मान डोलावली.
त्यांच्या मागोमाग माहिते दांपत्य आले. जितूला पाहून त्यांना गहिवरून आले.
"कसा आहेस, जितू बाळा?" मिसेस मोहिते मायेने म्हणाल्या.
"पोलीस अंकल, हे अंकल-आंटी खूप वाईट आहेत. माझ्या पप्पांशी हे भांडले होते. यांना बाहेर काढा." जितू रागाने त्यांना पाहत म्हणाला.
"नाही बेटा, हे चांगले अंकल-आंटी आहेत. तुझ्या पप्पांचा काहीतरी गैरसमज झाला होता." प्रधान समजावत म्हणाले.
त्याच्या डोळ्यांत खरेच का हे भाव होते. त्यांनी डोळे मिचकावले.
मिसेस मोहित्यांचे डोळे पाण्याने भरलेले होते, ते पाहून तो त्यांना म्हणाला,"ही आंटी का रडत आहे?"
"तुला पाहून भावूक झाल्या ना म्हणून." रिटा त्याला म्हणाली.
दुसऱ्या दिवशी चाकू वरील बोटांच्या ठश्यांचे रिपोर्ट आले. त्या रिपोर्टवरून खूनी कोण आहे हे त्यांनी समजले. फक्त ते त्याने कोणाच्या सांगण्यावरून केले हे कळणे बाकी होते. सगळे पुरावे समोर केल्यावर त्यांनी त्याच्याकडून कबुली मिळवली. जेव्हा त्यांना खरा गुन्हेगार कोण? हे कळले. त्यांचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. त्या व्यक्तीचा हात असेल असे त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हते. तो खरे सांगतो का अशी एकदा शहानिशा करून घ्यावी म्हणून त्यांनी थोडं शांत राहायचं ठरवले व त्या व्यक्तीवर बारीक नजर ठेवायला सांगितली. ही बातमी बाहेर कोणालाही कळता कामा नये अशी सक्त ताकीद आपल्या सहकाऱ्यांना दिली.
दोन दिवसांनी जितूला घरी सोडण्यात आले. त्याने लगेच जादूची प्रॅक्टिस सुरू केली. दोन दिवसांनी त्यांचा प्रयोग होता. तूर्तास तरी त्याला अजूनही राजेंद्र ह्या जगात नाही हे माहिती नव्हते.
आदल्या दिवशी संध्याकाळी प्रधान त्याला भेटायला आले. तर तो त्यांना थोडा घाबरलेला दिसला. त्यांनी काळजीने विचारले,"काय झाले जितू, तू एवढा घाबरलेला का दिसतोस?"
तो त्यांच्या कमरेला विळखा घालून रडत विचारू लागला,"अंकल, चोरी करणे पाप असते ना!"
"हो, पण तू रडत का आहेस आणि असे का विचारत आहेस? काय झालं?" त्यांनी गोंधळून त्याला विचारले.
"अंकल, हे पाहा मला मेसेज आला आहे. मला एका एक्सबिनशमधून एका हिऱ्याच्या हाराची जादूने चोरायला सांगितली आहे. मी जर असे नाही केले तर ते माझ्या पप्पांना मारून टाकतील." रडत रडत फोनमधील मेसेज दाखवत म्हणाला.
"जितू, मी आता जे सांगणार आहे ते नीट ऐक. तू स्ट्राॅंग बाॅय आहेस ना." ते त्याचा चेहरा ओंजळीत पकडून म्हणाले.
त्याने मान डोलावली.
"तुझे पप्पा या जगात नाहीत." हे सांगताच तो धाय कोलमडून रडू लागला.
ते त्याला सावरत म्हणाले,"हे बघ बेटा, तुला तुझ्या पप्पांसाठी सावरावं लागेल. त्यांचा खून झालाय. खऱ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी तू हो बोल. बाकी शो संपल्यावर सगळं करेल. तोपर्यंत तू काही कोणाला बोलू नकोस."
त्याने डोळे पुसत होकार भरला.
दुसऱ्या दिवशी शो संपल्यावर प्रधान स्टेजवर येत सर्वांवर एक नजर टाकत म्हणाले,"सर्व जण थांबा. राजेंद्र यांचा खूनी सापडला आहे. तो आता आमच्या ताब्यात आहे. त्याची मदत घेणारा खरा गुन्हेगार तुमच्यापैकी एक आहे."
असे म्हणताच रिटा लगेच तेथून पळ काढू लागली. तसे सगळे आश्चर्याने तिला पाहू लागले. लेडी इन्स्पेक्टर मिस कामतने तिच्यामागे जाऊन तिला पकडून आणले आणि प्रधान यांच्या समोर आणले.
"सांगा, मिस रिटा का केलेत तुम्ही राजेंद्र यांचा खून?" प्रधान रोखून पाहत विचारले.
"मी.. मी काही नाही केले. तो रजत खोटं बोलतोय." हातांची बोटे एकमेकांत गुंफून आवंढा गिळत रिटा ततपप करून म्हणाली.
"पण मी रजतचे नाव घेतलेच नाही." प्रधान म्हणाले तसे तिने मान खाली घातली, तिने काय माती खाल्ली ते तिला लक्षात आले.
मिस कामतने एक जोरदार चापट गालावर ठेवून दिली तशी ती खालीच पडली. तिच्या डोळ्यांसमोर दिवसा तारे चमकले.
तिचा जबडा चिमटीत पकडून कामतने जबर आवाजात विचारले,"आता चुपचाप सांग, काय ते? नाही तर दुसराही गाल रंगवेन."
"नको, नको. सांगते मी. जादूचे खेळ करून पुरेसा पैसा मिळत नाही म्हणून सरांना एक्सबिनशमधील लाखोंच्या हिऱ्याच्या हाराची हातचालाखीने चोरायला सांगितली होती. पण ते नेहमीच नकार देत होते. त्या दिवशी ही मी फोन केला होता. ते रागाने आले होते. रजत अशी सुपारी घेण्यात पटाईत आहे हे मला माहित होते. म्हणून मी त्यांची मदत घेतली. त्यांना खूप समजावले पण ते ऐकले नाहीत. तेव्हा मी त्यांना मारलं आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आम्ही मुद्दाम जितूला किडनॅप केलं आणि नंतर त्याला जाऊही दिले. माझी चूक झाली." असे म्हणून ती चेहरा ओंजळीत पकडून रडू लागली.
"रिटा आंटी, तुम्ही तर माझ्यावर किती प्रेम करत होतात आणि तुम्हीच माझ्या पप्पांना मारलत!" जितू रडत तिला म्हणाला.
"आय एम साॅरी, बेटा. चुकले मी." मान खाली घालून रडत ती म्हणाली.
"आता चूक झाली म्हणून काय उपयोग?पैशांच्या लालसेपोटी तू एका मुलाला पोरक केलेस, रिटा. आता जेलमध्ये खडी फोडायला जा. घेऊन जा हिला." प्रधानने कामतला सांगितले.
नंतर त्यांनी जितूला त्याच्या खऱ्या आईवडिलांबद्दल सांगितले. त्याने आधी त्या दोघांकडे पाहिले आणि नंतर प्रधानकडे पाहून विचारले,"हे मला जादू करू देतील ना."
प्रधान काही बोलण्याआधी मिसेस मोहिते हळव्या स्वरात म्हणाली,"हो, बेटा तुला आम्ही कधीच अडवणार नाही."
"हा, तू मोकळेपणाने तुला आवडेल ते कर आमची काही हरकत नाही." मिस्टर मोहितेही पत्नीच्या सुरात सूर मिसळला.
तो आनंदाने त्यांच्याजवळ गेला. त्या दोघांनी त्याला प्रेमाने कवटाळले.
त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याने पाहत प्रधान समाधानाने हसत म्हणाले," याला तुमच्या स्वाधीन केले आहे. जपा त्याला. चल जितू, बाय काळजी घे."
"हो, सर. आम्ही आता याला जीवापेक्षा जास्त जपू, काळजी घेऊ. खूप धन्यवाद, सर आमचा मुलगा परत मिळवून देण्यासाठी." मिस्टर आणि मिसेस मोहित्यांनी त्यांचे मनस्वी आभार मानले.
ते हसून निघून गेले.
समाप्त-
पैशाचे लोभाने माणूस चूकीचे पाऊल उचलतो. नंतर चूक कळते; पण तेव्हा पश्चात्ताप करण्यासाठीही वेळ उरत नाही.
गुन्हेगार कितीही चालाख असला तरी तो सापडतोच.
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा